गेवराई सशस्त्र दरोडा प्रकरण; एक आरोपी जेरबंद

गेवराई – येथील गणेशनगरातील सरस्वती कॉलनीतील सशस्त्र दरोडा प्रकरणाचे धागेदोरे शोधण्यात सोमवारी अखेर पोलिसांना यश आले. घाडगे दाम्पत्याची हत्या दरोडेखोरांनीच केल्याचे उजेडात आले असून एका संशयिताला जेरबंद करण्यात आले. त्याची कसून चौकशी सुरु आहे. त्याच्या इतर साथीदारांच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.

अधिक माहिती अशी की, 23 ऑगस्ट ररोजी पहाटे सरस्वती कॉलनीतील बॅंक अधिकारी आदिनाथ घाडगे यांच्या घरावर दरोडेखोरांनी हल्ला चढविला होता. आदिनाथ घाडगे यांच्यासह पत्नी अलका यांची हत्या करुन त्यांच्या दोन्ही मुलींवरही दरोडेखोरांनी हल्ला चढविला होता. यापैकी स्वातीला डिस्चार्ज मिळाला असून विवाहित कन्या वर्षा जाधव हिच्यावर औरंगाबादेतील खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. दरम्यान, या गुन्ह्याचा छडा लावण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. तपासाकामी नियुक्त केलेल्या पथकांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती सुुरु होती. मात्र, नेमका क्‍ल्यू हाती लागत नसल्याने तपास पुढे सरकत नव्हता. विशेष म्हणजे त्यांच्या घरातील दागिने व पैसे शनिवारी सुरक्षित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हे प्रकरण कौटुंबिक कारणावरुन घडल्याचा तपास यंत्रणेला संशय होता.

सोमवारी मात्र पोलिसांनी वेगवान तपास करत गेवराईतील एका संशयित आरोपीला जेरबंद केले. त्याला बीड येथे आणून अधीक्षक कार्यालयात त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याला घेऊन पोलीस गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे जप्त करण्यासाठी गेवराई परिसरात गेले. मात्र, तांत्रिक अडचणी आल्याने तपासाबाबतची अधिकृत घोषणा पोलिसांनी केली नाही. मात्र, अधीक्षक जी. श्रीधर यांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताची गोपनीय चौकशी करण्यात आली. यात त्याने आणखी चार साथीदार असल्याचे सांगितले. मद्याच्या नशेत ते दरोड्याच्या उद्देशाने घाडगे यांच्या घराजवळ गेले. दरवाजा खटखटला. अलका घाडगे यांनी दरवाजा उघडताक्षणी त्यांच्यावर धारदर शस्त्राने वार केला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर आदीनाथ घाडगे यांना जाग आली. त्यांच्यावरही हल्ला चढविला. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर त्यांच्या दोन्ही मुली जाग्या झाल्या. त्यांच्यावर हल्ला केल्यानंतर घाडगे दाम्पत्य गतप्राण झाल्याचे लक्षात आल्यावर ते भयभीत झाले. त्यांनी तेथून काढता पाय घेतला. त्यामुळे स्वयंपाकघरातील ऐवज सुरक्षित राहिल्याची सूत्रांची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)