पोलिस दादा तुमचा वाल्या होतोय

प्रशांत जाधव

गेले काही दिवस पोलिसांबाबत चर्चा सुरु आहे.दोष कोणाचा हा भाग वेगळा. पण खरे सांगू पोलिस दादा तुम्ही निलंबित व्हावे म्हणून आम्हीच काय कोणतेच माध्यम काम करत नाही. पण तुम्ही ज्यांच्यासाठी हे देण्याघेण्याचे धंदे करता ते मात्र वेळ आल्यावर हात वर करायला मागे पुढे पहात नाहीत. पण बदनाम मात्र तुम्ही होता. एकंदरीत काय तर पोलिस दादा तुमचा वाल्या होतोय.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दादा तुम्ही चोवीस तास ड्युटी करता. तुमच्याइतके कष्ट खरंच या महाराष्ट्रात कोण करत असेल असे मला वाटत नाही. तरीही बदनामीच्या तोफेची दिशा तुमच्यावरच का, हा तुम्हाला पडलेला प्रश्‍न आम्हाला पण पडला आहे. तुटपुंजा पगार,अपेक्षेनुसार मिळत नसलेल्या सोयी सुविधा यावर मात करत संसाराचा गाडा चालवायचा म्हणजे कसरत आलीच. त्यात सतत होणारे मोर्चे, आंदोलने म्हणजे तुमच्या डोक्‍याला हेल्मेट असूनही ताप ठरलेलाच.

अशावेळी कायदा सुव्यवस्थेची घडी बसवणाऱ्या तुमच्या हातांना दगड झेलावे लागतात तेव्हा आमच्या तोंडुनही निषेधाची भाषा निघते. पण तुम्ही जेव्हा समाजाला मान्य नसणारी गोष्ट करता तेव्हा सगळेच तुमच्यावर तुटुन पडतात. ज्यांच्या तोंडुन कधी सलग दोन वाक्‍ये निघाली नाहीत ते सुध्दा तुमच्याबद्दल लेक्‍चर झाडायला लागतात.

खरे सांगतो दादा, तेव्हा आम्हालाही वाईट वाटते. पण आमचाच काय  चांगले सांगणाऱ्या इतर कुणाचा ही आवाज तुमच्यापर्यंत पोचतच नाही. दादा,वाल्याची गोष्ट माहीत असेलच तुम्हाला  तरीही तुम्हाला सांगतो. कारण ती गोष्ट आपल्याला तंतोतंत लागू आहे. पुराण काळात वाल्या नावाचा वाटमाऱ्या  होता.

तो जंगलात येणाऱ्या प्रत्येकाला अडवून लुटमार करायचा. लुटमार झाली की, एक खडा त्याच्याकडे असणाऱ्या रांजणात टाकायचा. रांजण भरत आलाच होता. मात्र एके दिवशी वाल्याने नारदमुनींनाच अडवले. तेव्हा नारदमुनींनी त्याला तू हे कुणासाठी करतो असा सवाल केला. मी माझ्या घरातील लोकांना सांभाळण्यासाठी हे करतो असे वाल्या बोलला. त्यावर नारदांनी सांगितले ज्यांच्यासाठी करतो त्यांना विचार ते तुझ्या पापात भागीदार होतील का? वाल्या घरी गेला .

प्रत्येकाला विचारले तेव्हा उत्तर आले नाही. पुढे काय झाले सांगत नाही. पण पोलिस दादा, तुमचा ही वाल्याच होतोय हे मात्र नक्की. शाहूपुरीचे हंकारे दादा पैसे मागत होते. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्या व्हिडीओत, साहेबांचे पैसे दिलेत का? असे संभाषण आहे. पण आज निलंबित  कोण झाले ? म्हणजे तुम्ही ज्यांच्या सांगण्यावरून किंवा ज्याच्यांसाठी काम करता ते तुमच्या पापात सहभागी नाहीत हे सांगण्यासाठीचा आमचा खटाटोप, तुमच्या लक्षात कसे येत नाही.

तुम्ही निलंबित होता ही काही आनंदाची बाब नाही . उलट निलंबनानंतर तुमची होणारी मानहानी आम्हालाही सहन होत नाही. पण काय करणार तुन्ही चुकलात तर भविष्यातील मोठा धोका टळावा म्हणून ,माध्यमांना बोलावे लागते. कारण निलंबनानंतरच्या वेदना काय असतात त्या आम्हालाही माहिती आहेत. असो आपले देशमुख साहेब खरोखर आपल्या सहकारी,कर्मचाऱ्यांची काळजी घेतात .

आपल्या कर्मचाऱ्याला कोणी बोट दाखवले तरी ते त्यांना सहन होत नाही. तुम्ही फक्त चुकीचे काही करू नका. बाकी चांगले दिवस येतील. राजकारण्यांनी,बाहुबलींनी, आपल्याच काही भ्रष्ट मंडळींनी पोलिस दलाची अब्रु पार वेशीवर टांगली आहे. तरी प्रमाणिक काम करणाऱ्या दादा, ताईंनो तुमचा विश्‍वास नाही बसणार तरी सांगतो. या पोलिस दलातही खुप चांगली माणसे आहेत,ज्यांच्यामुळे दिवस बदलतील कायद्याने व माणुसकीने वागणाऱ्या पोलिसाचे निश्‍चितच कौतुक होईल.त्यामुळे वाईट वाटून घेऊ नका. आम्ही फक्त वाल्याच्या कथेतील नारदाची भुमिका बजावतो आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)