गेला चौकीदार कुणीकडे..

विद्यानगरीत धूमस्टाईल युवकांची दहशत : मुलींमध्ये भितीचे वातावरण

उमेश सुतार
कराड, दि. 27 (प्रतिनिधी) -रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली विद्यानगर-सैदापूर येथे कार्यरत असणारी पोलीस चौकी दीड ते दोन वर्षापूर्वीच हटविल्यामुळे महाविद्यालय परिसरात युवकांमध्ये होणार्‍या राड्यांमध्ये वाढ होवू लागली असून धुमस्टाईल जाणार्‍या रोडरोमिओचा नाहक त्रास होत आहे. अशा घटनांमुळे महाविद्यालयीन परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांवर आळा बसावा यासाठी शासकिय अभियांत्रकी महाविद्यालयाचे प्रवेशद्वारात असलेल्या चौकशी कक्षाला पोलीसचौकीचे स्वरुप देण्यात आले. मात्र या चौकीत चौकीदारच बसत नसल्याने गेला चौकीदार कुणीकडे अशीच म्हणण्याची वेळ सर्वावर आली आहे.
विद्यानगर-सैदापूर या परिसरात अनेक महाविद्यालये असून यापूर्वी या परिसरामध्ये कराड शहर पोलिसअंतर्गत पोलिस चौकी होती. यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहत होती. या पोलीस चौकीमुळे राडेबाजी व हुल्लडबाजी करणार्‍या रोडरोमिओंवर पोलिसांकरवी अंकुश ठेवला जायचा. मात्र गेली दीड ते दोन वर्षापूर्वी रस्ता रुंदीकरणामध्ये सदरची पोलीस चौकी हटविण्यात आली. ती पुन्हा लवकर कार्यान्वीत केलीच गेली नाही. या चौकीमुळे मुलींना एकप्रकारे संरक्षण मिळत होते. यावर उपाय म्हणून अभियांत्रिकी महाविद्यालयाचे आवारात असलेल्या चौकशी कक्षाला पोलिस चौकीचे स्वरुप देण्यात आले. मात्र नव्याचे नऊ दिवस या म्हणीप्रमाणे सुरुवातीला या चौकीत पोलीस कर्मचारी ड्युटीवर थांबत होते. मात्र ही परिस्थिती काही दिवसच राहिल्याने महाविद्यालयीन युवक तसेच रोडरोमिओ यांच्यामध्य पोलिसांची भितीच उरलेली नसल्याचे दिसून येते. परिणामी हे युवक महाविद्यालयीन परिसरात गटागटाने थांबत असून यातून राड्याचे प्रकार होवू लागले आहेत. त्यामुुळे मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या चौकीत कायमस्वरुपी पोलिस कर्मचार्‍याची नेमणूक करणे गरजेचे आहे. या परिसरात एखादा प्रसंग उद्भवल्यास चौकीदाराविना तक्रार कोणाकडे करायची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाविद्यालयीन परिसरात युवकांमधील मारामारीच्या गंभीर घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या परिसरात लहान शिशु पासून उच्च महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या विद्यार्थी-विद्यार्थीनींची संख्या मोठी आहे. वारंवार घडणार्‍या अशा राडेबाजीमुळे विद्यानगरीचे वातावरण असुरक्षित बनले आहे.
महाविद्यालयीन परिसरात वाढत चाललेल्या राडेबाजांवर कारवाई कोण करणार ? तसेच या परिसरात अशा किती गंभीर घटना घडल्यानंतर पोलीस अधिकारी लक्ष घालणार? असे संतप्त सवाल विद्यार्थ्यासह पालकांमधून विचारले जात आहेत. विद्यानगरीत वारंवार घडणार्‍या घटनांचा वरीष्ठांनी गांभिर्याने विचार करुन तातडीने याठिकाणी सर्व महाविद्यालयाचा मध्य साधून त्याठिकाणी पोलिस चौकी सुरु करुन हा परिसर भयमुक्त करावा, अशी मागणी नागरीकांमधून होत आहे.
आली गाडी की हुल्लडबाज गायब…
विद्यानगरीत महाविद्यालयाचे परिसरात निर्भया पथकाच्या गाडीचे पेट्रोलिंग सुरु असते. मात्र हुल्लडबाज रोडरोमिओ हे पोलिसांची गाडी की गायब होतात. तर गाडी गेली की पुन्हा तोच उद्योग करायला मोकळे असतात. या पथकाने चारचाकीविना महाविद्यालयीन परिसरात फेरफटका मारल्यास त्यांना अशा हुल्लडबाजांच्या उचापती दिसून येतील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)