गृहिणी सचिव: सखी मिथ: ……स्मार्टफोन!

मोबाईल म्हणजे आजची एक अत्यंत गरजेची गोष्ट झाली आहे. पूर्वी माणसाच्या अन्न-वस्त्र-निवारा या तीनच मुख्य गरजा मानल्या जायच्या. आता त्यात कितीतरी गोष्टींची भर पडली आहे. आणि या नव्याने भर पडलेल्या गोष्टींपुढे अन्न वस्त्र निवारा या पूर्वीच्या मुख्य गरजा दुय्यमपेक्षाही दुय्यम बनल्या आहेत. या नव्या गरजांमध्ये कानामागून आला आणि तिखट बनला या उक्तीप्रमाणे सर्वात अधिक महत्त्व आले आहे ते मोबाईलला.
केवळ संपर्काचे एक ‘पोर्टेबल; साधन एवढेच मोबाईलचे वर्णन करण्याचे दिवस पार मागे पडले आहेत, इतिहासजमा झाले आहेत. आता मोबाईल म्हणजे सारे काही झाला आहे-सर्वस्व बनला आहे. एक मोबाईल हाती असला, की बाकी कोणाचीही साथ नको, “हात तुझा हाती’ ही नको असे म्हणण्याइतके मोबाईलचे महत्त्व वाढले आहे. आणि गेल्या काही वर्षात आलेल्या या स्मार्टफोनने तर मानवी जीवनात आमूलाग्र क्रांती घडवून आणली आहे, क्रांती.! बघा ना, रस्त्यातून जाताना, बसमध्ये, ट्रेनमध्ये हातात मोबाईल असलेलेच दिसतात सारे जण. मंदिरात गेल्यावर देवाला हात जोडतानाही जोडलेल्या हातात मोबाईल असतोच. कोणी सांगावे, काही दिवसांनी देवाशी थेट कॉंटॅक्‍ट करून देणारीही एखादी लाईन वा एखादा डॉटकॉम येईल.
आता लोक इतर कोणाशी (मोबाईलवर ) बोलत नसले, तरी कानात हेडफोन लावून मोबाईलमध्ये हरवलेले असतात. पूर्वी केवळ ऑडियो होता, तेव्हा गाणी-संगीत ऐकत असत. आता व्हिडियो आल्यापासून तर हिंदी-मराठी-इंग्रजी चित्रपट, नाटके, गाणी वा अन्य बरेच कार्यक्रम बघत असतात. क्रिकेटची मॅच असली तर तिच्यात डोके घालून बसतात. मग आजूबाजूला काय चालले आहे याचे भानच राहत नाही. आणखी एक गमतीची गोष्ट म्हणजे आता बहुतेकांकडे एकापेक्षा अधिक स्मार्टफोन असतात. त्यात 2जी, 3जी, 4जी असे सारे जी जी जी असते. हातातील मोबाईल्समध्ये घरासाठीवेगळा, ऑफिसच्या कामासाठी वेगळा आणि अन्य कारणासाठीही वेगळा असे प्रकार असतात, घरवाली-बाहरवालीप्रमाणे.
“गृहिणी सचिव: सखी मिथ: प्रियशिष्या ललिते कलाविधौ ।’ असे महाकवी कालिदासाने “रघुवंश’ मध्ये म्ह्टले आहे. अर्थात. अज राजा आपली प्रियपत्नी इंदुमती मरण पावल्यावर तिचे वर्णन करताना असे म्हणतो. इंदुमती ही अज राजाची गृहिणी होती, सचिव होती, एकांतातील सखी होती आणि ललितकलांचा आस्वाद घेत असताना ती त्याची प्रियशिष्याही होती.
हे सारे वर्णन आपल्या मोबाईलला-स्मार्टफोनला लावता येईल. मोबाईल हे सारे काही आहेच; त्यशिवाय आणखीही खूप काही आहे. मोबाईलमध्ये नेटबॅंकिंगसह आणखी अनेक वैशिष्ठे आहेत. तो बॅंकेप्रमाणे पैशाचे पाकिट (वॉलेट) बनला आहे. ऑफिस बनला आहे. संपर्काचे साधन हा त्याचा दुय्यम-तिय्यम नव्हे, त्याहूनही कमी प्रतीचा उपयोग बनला आहे. आता तो प्रचंड अशा बऱ्यावाईट ज्ञानाचे भांडार आहे. अलीबाबाची गुहाच आहे म्हणा ना ती. त्या गुहेत शिरलेल्या साध्यासुध्या माणसाचा कासीम व्हायला वेळ लागत नाही. अलीबाबा 40 चोर मधला अलीबाबाचा भाऊ कासीम चोरांच्या खजिन्याच्या गुहेत “खुल जा सिम सिम’ म्हणून शिरल्यानंतर आतील खजिना पाहून आनंदाने वेडाच व्हायचा बाकी राहिला होता. सारे काही, अगदी परतीचा परवलीचा शब्दही विसरून गेला तो, आणि चोरांच्या हाती सापडून स्वत:चे प्राण गमावून बसला.
स्मार्ट फोनच्या आंतरजालाची-इंटरनेटची परिस्थितीही वेगळी नाही. उलट त्या पेक्षाही भयानक आहे, चोरांच्या गुहेत फक्त हिरेमाणके, धनदौलत होती. येथे त्यापलीकडे खूप खूप काही आहे. फक्त या आंतरजालात शिरल्यानंतर आपल्याला काय पाहिजे याची आठवण राहिली पाहिजे. येथे तुम्हाला भुलवणारे असंख्य सापळे असतात. खुणावत असतात, नुसते खुणावत नाहीत, तर भुरळ घालत असतात, मोहवत असतात. अगदी गळेपडूपणा करत असतात. आणि मग भूलभुलैयात अडकवून टाकतात. तुम्ही नुसता मोबाईल ऑन करायची खोटी, संदेशांवर संदेश येत राहतात. अगदी पैसे वाचविण्याच्या स्कीमपासून ते मोबाईल डाटा ऑफर, कॉल 25 मिनिट ऑफर, 50-100 रुपयांचा “मुफ्त रिचार्ज’, फ्री सॉंग्ज, फ्री व्हिडियोज, वजन कमी करणे-वाढवणे, घर रंगवणे, केस रंगवणे, गेलेले केस परत आणणे, विविध वस्तूंचे सेल, तुमचा नंबर लाख-कोटी रुपयांच्या बक्षिसासाठी निवडला गेल्याची अभिनंदनासह खुशखबरी देणारा संदेश……. आणि चुकून एखादे बटन दाबले गेले, की संकटच!
या आंतरजालात शिरल्यानंतर आपला चक्रव्युहात शिरलेला अभिमन्यू होण्याचीच शक्‍यता मोठी. आत जाण्याचा उघडा, पण परतीचा मार्ग मात्र बंद. तेव्हा आंतरजालाच्या जाळ्यात न अडकता परत फिरण्याचे भान राहिले पाहिजे. स्वत:ची जाणीव राहिली पाहिजे. त्यात माणसे-स्वत:ला हरवून बसलेली दिसतात. जातायेता, बसताउठता, घरातप्रवासात, सर्वत्र मोबाईला हाती असतोच. तो गर्दीतही माणसाला एकटा करतो. खरं तर एकाकी करतो. पण त्याची जाणीव होऊ देत नाही, एवढेच.
आता एवढे सगळे वर्णन करण्याचे कारण काय विचाराल, तर उत्तर आहे काहीच नाही. एवढे सगळे सांगायचे काही कारणच नाही. या जगजाहीर गोष्टी आहेत. सर्वांना माहीत आहेत, मात्र त्यावर उपाय कोणाकडेही नाही. वेड्यांच्या जगात वेडे व्हावे, तसे मोबाईलमध्ये हरवलेल्यांच्या जगात आपणही हाती मोबाईल धरून स्वत:च हरवणे हा एक सोपा उपाय आहे. मात्र तो सोयीचा नाही.
मात्र मोबाईल हरवल्यानंतर त्यातील सर्व डाटा, कॉंटॅक्‍ट नंबर्स, फोटो, व्हिडियो, व्हाट्‌सऍप चॅट वगैरे हरवल्यावर मोठे दु:ख होते, आणि
गृहिणी सचिव: सखी मिथ: प्रियशिष्या ललिते कलाविधौ
या रघुवंशमधील ओळींचा पुढचा भाग आठवल्याविना राहत नाही. “रघुवंश’मध्ये अज राजा पुढे म्हणतो,
करुणाविमुखेन मृत्युना हरता बत किं न मे हृतम।।
म्हणजे मृत्यूने इंदूमतीच हरण करून नेल्यावर, सर्वस्वच गेले. या अजराजाचे काय हरण करायचे बाकी ठेवले आहे?असे अज राजा म्हणतो, तसे स्मार्टफोन हरवल्यावर, सर्वस्वच गेले. आणखी काय हरवायचे बाकी राहिले आहे ? असे म्हणायची वेळ येते.

 

सौ. अश्‍विनी दीपक महामुनी,
एम.ए., बी.एड. हडपसर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)