“गृहलक्ष्मी’ झालीय पैसा कमविण्याचे साधन?

शर्मिला पवार

पिंपरी – माहेराहून पैसे आणण्यासाठी विवाहितांचे होत असलेले छळ ही बाब नवीन नाही. यामध्ये अनेकजणींचे बळी गेले. काहींनी स्वतःहून आपले आयुष्य संपवत स्वतःची छळातून मुक्‍तता करुन घेतली. आधुनिकीकरणाच्या कितीही गप्पा झडत असल्या तरी महिला अत्याचाराचे प्रमाण कमी होण्याचे नाव घेत नाही. शुक्रवारी (दि. 30) एकाच दिवशी विवाहितांच्या छळाच्या तीन घटना उघड झाल्या. त्यात हुंड्यातील पैसे मिळत नसल्याने पतीने चक्‍क पत्नीला सलाईनमधून एचआयव्हीचे इंजेक्‍शन दिल्याची घटना समोर आली. महिला अत्याचाराची परिसीमा गाठणाऱ्या या प्रकारामुळे “गृहलक्ष्मी’ पैसे कमविण्याचे साधन झालीय का, असा सवाल उपस्थित होत आहे.

शनिवारी (दि. 1 डिसेंबर) जागतिक एडस्‌ दिन साजरा होत आहे. त्याच्या एक दिवस आधीच थेरगावमधील एका 27 वर्षीय विवाहितेला माहेराहून पैसे आणण्यासाठी सलाईनमधून एचआयव्हीचे इंजेक्‍शन दिल्याचा धक्‍कादायक प्रकार उघड झाला. पोलिसांनी याप्रकरणी पती, सासरा आणि सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराबाबत उलट-सुलट चर्चा असल्या तरी पोलीस तपासात सर्व सत्य समोर येईलच. वाकड पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 27) दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये महिलेला माहेरून 20 लाख रुपये घेऊन ये म्हणत पतीने पिडीतेशी थेट शरीर संबंधच नाकारल्याचा आणखी एक गंभीर प्रकार समोर आला. मागील पाच दिवसांत दाखल झालेल्या महिलांच्या छळांच्या घटना व त्याचे स्वरुप स्त्री सबलीकरणाचे वाभाडे काढणाऱ्या आहेत. जानेवारी ते ऑक्‍टोबर 2018 या दहा महिन्यांच्या काळात शहरात छळाला कंटाळून 10 नवविवाहितांनी आत्महत्या केल्या आहेत.

माहेराहून पैसे आणण्यासाठी होत असलेल्या छळाच्या घटना पाहता “मुलगी म्हणजे धनाजी पेटी’ हे वाक्‍य वधु पित्यासाठी नव्हे तर तिच्या सासरच्यांसाठी सार्थक ठरत आहे. आम्हाला हुंडा नको, फक्‍त लग्न लावून द्या, असा आग्रह धरत वधु पित्याकडून थाटामाटात लग्न लावून घेतले जाते. लाखो रुपयांचा चुराडा या लग्नावर होतो. वधु पित्यावर कर्ज बाजारी होण्याची वेळ येते. मुलीला रिकामेच कसे सासरी पाठवायचे म्हणून दागिने, संसारोपयोगी साहित्य दिले जाते. “वॉशिंग मशिन’पासून ते “एसी’पर्यंत असा सर्व संसार दिला जातो. लग्न झाल्यानंतर धोंड्याचा महिना, पहिली दिवाळी अशा सणोत्सवाच्या नावाखाली “जावईबापुंना’ खुष करण्यासाठी वधु पित्याला खिसा रिकामा करावा लागतो. त्यानंतरही नोकरी लावण्यासाठी, फ्लॅट, वाहन घेण्यासाठी मदत म्हणून पैशांचा रतीब सुरूच राहतो. मुलीच्या बाळंतपणासाठीचा खर्चही पित्यालाच उचलावा लागतो. एवढे सगळे करूनही मुलगी सासरी सुखात नांदेल याची शाश्‍वती मिळत नाही. मुलीने जीवाचे बरे-वाईट केल्यानंतर माहेरची मंडळी पोलीस ठाणे गाठतात. मुलीच्या सुखासाठी तिच्या सासरच्यांचे चोचले किती पुरवायचे याचा विचार करणे गरजेचे आहे. छळाला कंटाळून महिलांनी आत्महत्येचे पाऊल उचलण्याऐवजी कायद्याचा आधार घ्यायला हवा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
———————–
10 महिन्यांतील नवविवाहितांच्या आत्महत्या
वाकड – 2
सांगवी -3
देहूरोड -1
———-
एकूण – 6


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)