उत्तरकांशी – केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह हे आपला नववर्षाच्या स्वागताचा दिवस चीन सीमेवरील इंडोतिबेट बॉर्डर पोलिसांच्या पथकाबरोबर घालवणार आहेत. भारताने आपल्या लष्करी तुकड्यांवर कडक नियंत्रण ठेवावे अशी सुचना चीन सरकारने भारताला दिल्याच्या दुसऱ्या दिवशीच राजनाथ सिंह यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. राजनाथ सिंह यांनी उत्तराखंडमधील सीमा भागाला गेल्या सप्टेंबर महिन्यात चार दिवसांची भेट दिली होती. त्यानंतरची त्यांची ही या भागाची दुसरी भेट आहे.
उद्या 11700 फूट उंचीवर असलेल्या नेलॉंग बार्डर पोस्टवर गृहमंत्री नववर्ष स्वागत दिन साजरा करतील. चीन सीमेवरील हा अतिशय दुर्गम भाग असून तेथील तापमान सध्याच उणे पंधरा अंश इतके खाली गेले आहे. आज संध्याकाळी राजनाथसिंह हे आयटीबीपीच्या बटालियन मुख्यालयात मुक्कामी जाणार आहेत. हे मुख्यालयही भागीरथी नदीच्या किनारी समुद्र सपाटीपासून 3400 फूट उंचीवर वसले आहे. आपल्या भेटीत ते चीन सीमेवरील आयटीबीपीच्या अन्यही पोस्टना भेटी देऊन तेथील जवानांशी संपर्क साधणार आहेत. आयटीबीपीच महासंचालक आर के पचनंदा हेही त्यांच्या समवेत असणार आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा