गृहकर्ज आणि प्रॉपर्टी कर्ज यात काय फरक असतो?

– शैलेश धारकर

गृहकर्ज हे नावाप्रमाणे घर खरेदी करण्यासाठी दिले जाते. अनेकांना मालमत्ता खरेदी करण्यासाठीचे कर्ज आणि गृहकर्ज यातील फरक कळत नाही. आपण तयार घर खरेदी करण्यासाठी किंवा प्लॉटवर घर बांधण्यासाठी जे कर्ज बॅंक अथवा वित्त संस्थांकडून घेत असतो त्याला गृहकर्ज असे म्हणतात. प्रॉपर्टी लोन हा वेगळा प्रकार आहे.

आयकर सवलत:

गृहकर्ज आणि प्रॉपर्टी लोन यातला मुख्य फरक म्हणजे आपल्याला प्रॉपर्टी लोनवर आयकरातून सूट मिळत नाही. गृहकर्ज घेतल्यास आपल्याला आयकर कायदा कलम 80 सी नुसार सूट मिळत असते. गृहकर्जाच्या मुद्दलाच्या रकमेवर दीड लाख रुपयापर्यंतची आयकर सवलत मिळू शकते. त्याचबरोबर गृहकर्जावरचे दोन लाख रुपयांपर्यंतचे आयकरमुक्‍त असते. प्रॉपर्टी लोनला आयकरातून अशी सूट मिळत नाही.

कर्जासाठीचे कारण:

प्रॉपर्टी लोन कोणत्याही कारणासाठी घेता येते. गृहकर्ज हे फक्‍त घरबांधणी अथवा घर खरेदी करणे या कारणासाठीच घेता येते. आपण आपल्याकडील मालमत्ता गहाण टाकून मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न यासाठी कर्ज काढू शकतो. तसेच तुम्ही समजा व्यवसाय, व्यापार करत असाल आणि अशा व्यवसायाचा, व्यापाराचा विस्तार करण्यासाठी तुम्हाला खेळते भांडवल जरूरी असेल तर असे भांडवल आपण मालमत्ता तारण ठेऊन बॅंकेच्या कर्जाद्वारे उभे करू शकतो.

कर्जाची रक्‍कम:

प्रॉपर्टी लोनची रक्‍कम कर्जदाराच्या हातात मिळते. गृहकजाची रक्‍कम ग्राहक ज्या बिल्डरकडून घर खरेदी करणार असतो त्या बिल्डरला दिली जाते.

कागदपत्रांची छाननी:

गृहकर्ज आणि प्रॉपर्टी लोन देताना बॅंक आणि वित्त संस्थेकडून सर्व कागदपत्रांची छाननी केली जाते. गृहकर्ज घेताना ते घर/ फ्लॅट ज्या जमिनीवर बांधले जात आहे त्या जमिनीची मालकी संबंधित बिल्डरच्या नावाने आहे ना हे तपासून पाहिले जाते. बॅंकेकडून त्या जमिनीच्या कागदपत्रांचा सर्च रिपोर्ट मागविला जातो.

मालकी हक्‍क:

घर खरेदी करताना आपण कर्ज घेतल्यास ती मालमत्ता त्या कर्ज देणाऱ्या बॅंक अथवा वित्त संस्थेच्या नावाने होते. म्हणजे आपण घर खरेदी करण्यासाठी घेतलेले कर्ज फेडेपर्यंत त्या घरावर संबंधित बॅंकेचा / वित्त संस्थेचा मालकी हक्‍क असतो. कर्जदार कर्ज फेडण्यास असमर्थ ठरला तर संबंधित बॅंक त्या घराचा लिलाव करू शकते आणि आपली कर्जाची रक्‍कम वसूल करते. प्रॉपर्टी लोनमध्येही असाच प्रकार असतो. आपण जी मालमत्ता म्हणजे घर, प्लॉट, शेतजमीन, वाडा गहाण ठेऊन कर्ज घेतलेले असते त्या मालमत्तेचा मालकीहक्‍क कर्ज देणाऱ्या बॅंकेच्या / वित्त संस्थेच्या नावाने होतो. कर्जदार मुदतीत कर्ज फेडू शकला नाही तर ती बॅंक तारण ठेवलेली मालमत्ता विकू शकते. या दोन्ही कर्जामध्ये हे एक साम्य सांगता येते. गृहकर्ज घेताना ग्राहकाला अनेक कागदपत्रे बॅंकेकडे द्यावी लागतात.

व्याजदरात फरक:

गृहकर्ज आणि प्रॉपर्टी लोन यांच्या व्याजदरातही फरक असतो. गृहकर्जासाठीचा व्याजदर कमी असतो. गृहकर्ज देणाऱ्या बॅंकांची तसेच वित्त संस्थांची संख्या मोठी आहे. गृहकर्ज हे मालमत्ता तयार करण्यासाठी घेतले जाते. मात्र, प्रॉपर्टी लोन हे मुळातच तयार असलेल्या मालमत्तेवर घेतले जाते. खूप कमी लोक प्रॉपर्टी लोन घेतात. आपली मालमत्ता गहाण टाकण्याऐवजी ते अन्य मार्गाने पैसे उभे करण्याचा पर्याय स्वीकारतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)