गृहकर्जाला द्या विम्याचं कवच

सर्वसामान्य व्यक्तीसाठी घर खरेदी करणे आणि त्यासाठी गृहकर्ज घेणे हा मोठा निर्णय असतो. गृहकर्ज घेतल्यानंतर उत्पन्नाचा मोठा भाग हप्त्याच्या रूपाने द्यावा लागतो. त्याचवेळी आयुष्याची जोखीमही असते. अशा स्थितीत गृहकर्ज ज्याच्या नावावर आहे, त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर कुटुंब संकटात सापडते. एकीकडे कुटुंब चालवण्यासाठी पैशाची गरज आणि दुसरीकडे घराच्या हप्त्याचा ताण या द्विधा मनस्थितीत कुटुंब अडकते. या स्थितीपासून कुटुंबाचे संरक्षण करायचे असेल तर गृहकर्जाला विमा संरक्षण देण्याचा विचार करावा. म्हणूनच गृहकर्ज संयुक्तपणे घेण्याबाबत आग्रही असावे. कारण बहुतांशी कुटुंबात पती-पत्नी नोकरदार असल्याने बॅंकांना अशा ठिकाणी कर्ज देण्यास फारशा अडचणी येत नाहीत. भविष्यात काही अडचण आल्यास ंसंयुक्त नावामुळे ती अडचण राहात नाही. तरीही कुटुबांत आपण एकटेच कमावते असाल आणि आपण गृहकर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर त्याचा विमा घेणे श्रेयस्कर ठरेल. या निर्णयामुळे कुटुंब आर्थिक अडचणीत येणार नाही आणि बोजा पडणार नाही. या हप्त्याचा परतावा काहीच मिळत नाही, मात्र गृहकर्जाची जोखीम कमी राहते, हे निश्‍चित.

गृहकर्जाचा विमा असा घ्या : एक मध्यमवर्गीय कुटुंब 20 ते 40 लाखांपर्यंत गृहकर्ज घेते. त्याचा हप्ता हा 20 ते 50 हजारांपर्यंत असतो. होम लोन प्रोटेक्‍शन स्कीम ही एक टर्म इन्शूरन्स आहे. म्हणजेच त्याचा कालावधी आपणच निश्‍चित करू शकता. विम्याच्या कालावधीनुसार हप्ता निश्‍चित होतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हप्ता जोखमीनुसार : गृहकर्जाची रक्कम आणि कालावधी हा वय आणि उत्पन्न यावर निश्‍चित होते. त्यानुसारच विम्याचा हप्ताही निश्‍चित होतो. आपले आजचे उत्पन्न आणि भविष्यातील उत्पन्न याचाही अंदाज घेतला जातो. जर आपण 20 ते 25 लाखांचे कर्ज घेतले असेल तर आपल्याला एक किंवा दोन लाख रुपयाचां विमा घ्यावा लागेल. यासाठी टर्म इन्शूरन्सप्रमाणे एकदाच हप्ता भरावा लागतो. ही रक्कम वेगळीही देऊ शकतो किंवा गृहकर्ज हप्त्यातही त्याचा समावेश करू शकतो. कारण गृहकर्ज देणाऱ्या कंपन्याकडूनही विम्याची सुविधा उपलब्ध असते.

करसवलतीचा लाभही : आपण गृहकर्जाप्रमाणे विम्यावरही प्राप्तीकर कलम 80 सी नुसार प्राप्तीकरात सवलत मिळवू शकता. अर्थात आपण होम लोन प्रोटेक्‍शन कव्हरचा हप्ता देखील बॅंकेकडून कर्जरूपात घेतला असेल तर त्याचा फारसा लाभ मिळणार नाही.

बॅंकाकडूनही ऑफर : आपण ज्या बॅंकेकडून गृहकर्ज घेतो, त्या बॅंका कर्जमंजुरीच्या वेळी आपल्याला प्रोटेक्‍शन कव्हरची ऑफर देतात. अर्थात त्याच बॅंकेकडून आपण विमा कवच घ्यावे, असे बंधन नाही. अन्य कंपन्यांकडूनही कमी हप्त्यात विमा कवच घेऊ शकता.

टर्म इन्शूरन्सपेक्षा महाग : गृहकर्ज विमा कवच हे टर्म इन्शूरन्सपेक्षा महाग आहे. जर आपण पाच वर्षाचे टर्म इन्शूरन्स करत असाल तर होम लोन प्रोटेक्‍शन प्लॅनच्या तुलनेत 30 ते 40 टक्‍क्‍यांपर्यंत स्वस्त आहे. मात्र दोन्ही योजनांचे वेगवेगळे फायदे आहेत.

विम्याचे तीन प्रकार
रिड्युसिंग कव्हर प्लॅन: जसजसी कर्जाची रक्कम कमी होत राहील, तसतसे विम्याचे संरक्षण कमी होत राहते.
लेवल कव्हर प्लॅन: संपूर्ण विम्याच्या कालावधीदरम्यान विमा कवच हे समान राहते.
हायब्रिड कव्हर प्लॅन: पहिल्या वर्षी संपूर्ण कवच राहते आणि नंतर कर्जाच्या रकमेप्रमाणे त्यात घट होत राहते.

हेही लक्षात ठेवा : गृहकर्ज आपण दुसऱ्या बॅंकेत ट्रान्सफर करत असाल, प्रिपेमेंट किंवा रिस्ट्रक्‍चर करत असाल तर गृहकर्जाच्या विम्यावर कोणताही प्रभाव पडत नाही. गृहकर्ज कोणत्याही नावावर बदल करताना किंवा वेळेच्या अगोदरच कर्जखाते बंद करत असाल तर विमा कवच संपतो.
आत्महत्येचे प्रकरण प्रोटेक्‍शन प्लॅनला लागू नाही.

– मानसी जोशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)