गुळुंचे गायरान गटाची अखेर हद्दनिश्‍चिती

नीरा- गुळुंचे (ता. पुरंदर) येथील सरकारी गायरान जागा गट क्रमांक दोनच्या हद्दनिश्‍चितीचे भिजते घोंगडे अखेर मार्गी लागले. माजी सरपंच रत्नमाला जगताप तसेच ग्रामस्थांच्या पाठपुराव्याने सोमवारी (दि.29) मोजणी अधिकाऱ्यांनी या गटाची हद्दनिश्‍चित केली. मात्र, या हद्दीत येणाऱ्या वस्तीतील घरे नेमकी गायरान जागेत आहेत की गावठाण जागेत यावर खुद्द हद्दनिश्‍चित करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मौन धारण केल्याने प्रश्‍न सुटला की नवीन प्रश्‍न निर्माण झाला याविषयी संदिग्धता निर्माण झाली आहे.
गुळुंचे येथे गायरान जागांचे तीन गट असून पैकी गट क्रमांक दोनचे क्षेत्र सातबारा उताऱ्याप्रमाणे 6 हेक्‍टर 55 आर इतके आहे. या गटात ज्योतिर्लिंग माध्यमिक विद्यालय, पशुवैद्यकीय दवाखाना, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र या शासनाच्या वास्तू तर जवळपास 101 कुटुंबांचे वास्तव्य आहे. जागा गायरान आहे की गावठाण याविषयी अनेकदा संभ्रम निर्माण झाला होता. महसूल विभागाने 2015 मध्ये अतिक्रमणाची यादी तयार केली होती. या यादीत येथील 101 कुटुंबांचा समावेश अतिक्रमणात करण्यात आला. मात्र, येथील काही कुटुंबाकडे मालमत्ता पत्रके असल्याने जागेच्या प्रकाराबाबत असलेली संदिग्धता कायम राहिली. येथील नरवीर राजे उमाजी नाईक सामाजिक विकास संघटनेचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी महसूल विभागाच्या दि. 4 एप्रिल 2002च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून येथील कुटुंबांना मालकी हक्कांचे उतारे देण्याची मागणी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. परंतु, येथील अतिक्रमणाची नोंद गाव नमुना 1-ई या रजिस्टरला नसल्याने मालकी हक्कांचा प्रश्‍न तसाच रेंगाळला. यानंतर ट्रस्टने गायरान जागेची मोजणी करून हद्दनिश्‍चित करण्याची मागणी ग्रामसभा व मासिकसभेत केली. मोजणीचा ठराव दोन्ही सभेत मंजूर झाल्यानंतर सरपंच रत्नमाला जगताप यांनी मोजणी शुल्क (फी) भरून मोजणीसाठी पाठपुरावा केला. दरम्यान, हद्दनिश्‍चितीचे घोंगडे काही काळासाठी भिजत राहीले व अखेर सोमवारी (दि.29) हद्दनिश्‍चित करण्यात आली.
यावेळी सरपंच संभाजी कुंभार, ग्रामसेवक पुंडलिक म्हस्के, राजेंद्र निगडे, ट्रस्टचे अध्यक्ष संजय चव्हाण, अक्षय निगडे, किशोर गोरगल, जितेंद्र निगडे, दशरथ निगडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
याविषयी ग्रामसेवक पुंडलिक म्हस्के म्हणाले की, गट क्रमांक दोनमधील वस्तीतील घरे गायरान जागेत असल्याचे मोजणी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मोजणी अधिकारी कोकरे म्हणाले की, क्षेत्र बरोबर जुळले असून हद्दनिश्‍चित करण्यात आली आहे. परंतु, या वस्तीतील घरे गायरान जागेत आहेत का याबाबत सांगण्यास त्यांनी टाळाटाळ केली.

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)