गुळाणी जमीन प्रकरणात पोलीस महानिरीक्षकांची उडी

खेड पोलीस ठाण्यात दोन्ही तक्रारदारांची तीन ते चार तास चौकशी


गावात जाऊन केली जमिनीची पाहणी

दावडी – गुळाणी (ता. खेड) येथे 65 एकर जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी लष्करी कर्नलने 30 ते 40 सशस्त्र जवानांना आणून दहशत केल्याच्या प्रकरणाची कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी मंगळवारी (दि. 25) तीन ते चार तास चौकशी केली. यावेळी जमिनीच्या वादातील दोन्ही बाजूचे तक्रारदार व दरोड्यासह इतर गुन्हा दाखल असलेले 13 महिला-पुरुष तसेच जवान घेऊन येणारे लष्करातील कर्नल केदार विजय गायकवाड हे सर्व जण खेड पोलीस ठाण्यात हजर होते. चौकशीनंतर महानिरीक्षक वारके यांनी घटनास्थळी सुद्धा भेट दिली.

या घटनेत वादग्रस्त आरोप झालेले कर्नल केदार गायकवाड व त्यांचे कुटुंबीय वाफगाव येथील संस्थानिक महाराजा सयाजीराव फत्तेसिंह गायकवाड यांचे वंशज आहेत. त्यांची गुळाणी गावात जमीन आहे. यातील गट क्र. 244 ची इतर वारसांनी दीड वर्षापूर्वी विक्री केली असून सुनील नामदेव भरणे (रा. माण, ता. मुळशी) यांनी ती खरेदी केली आहे. यावरून गायकवाड व भरणे यांच्यात जमिनीच्या ताब्यावरून वाद असून न्यायालयात खटला सुरू आहे. जमिनीच्या मशागती व पेरणी वरून शुक्रवारी (दि. 14) दोन परिवारात वाद होऊन त्याचे पर्यावसान भांडण, मारामारीत झाले. दोन्ही बाजूनी तक्रारी दाखल आहेत, त्यात शिवीगाळ, दमदाटी, जमाव जमवून मारहाण, दरोडा, विनयभंग अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. जमीन खरेदीदार भरणे यांच्यासह नऊ जणांवर तर गायकवाड यांच्या चार जणांवर हे गुन्हे दाखल आहेत. असे असताना शनिवारी (दि. 22) लष्करात कर्नल असलेले केदार गायकवाड यांनी गुळाणी येथे 30 ते 40 सशस्त्र लष्करी जवान आणून गावात दहशत माजवली. मात्र, भरणे परिवाराने सोयाबीन, भुईमुग पेरणी केलेल्या जमिनीत ट्रॅक्‍ट्ररच्या सहाय्याने नांगरणी केल्याचा आरोप आहे. यावरून बेकायदा शस्त्र बाळगणारे जवान आणून दहशत माजविल्याने कर्नल केदार गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा नोंदवल्याचे निरीक्षक अरविंद चौधरी यांनी सांगितले.

चार दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्‍वभूमीवर नेमकी माहिती जाणून घेण्यासाठी व त्या प्रकारे कारवाई करण्याच्या दृष्टीने महानिरीक्षक सुहास वारके यांनी मंगळवारी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत खेड पोलीस ठाण्यात ठाण मांडले. या प्रकरणाची माहिती घेऊन दोन्ही बाजूचे तक्रारदार व आरोपी यांची चौकशी केली. खेड पोलीस ठाण्याला या तीन तासंत छावणीचे रूप आले होते. शांतता पण पोलिसांची गजबज, धावपळ यावेळी पाहायला मिळाली. मात्र यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी माध्यमांशी बोलणे टाळले. पोलीस अधीक्षक संदीप पाटील, खेडचे विभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, प्रांत अधिकारी संजय तेली, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहनिरीक्षक निलेश बडाख, पोलीस व वाहनांचा मोठा ताफा यावेळी उपस्थित होता. चौकशीनंतर या अधिकारी वर्गाकडून गुळाणी येथे स्थळ पाहणी करण्यात आली. यावेळी गावात तणावपूर्ण शांतता होती.

दीड वर्षापूर्वी ही जमीन माझ्यासह 9 जणांनी विकत घेतली असून, जमिनीचे वडिलोपार्जित मालक असलेले आणि लष्करात उच्चपदस्थ अधिकारी असलेले कर्नल केदार गायकवाड यांनी गावात बेकायदा सैन्य दलाचे जवान आणत शेताची नासाडी केली आहे.
– सुनील भरणे, तक्रारदार


ही जमीन आमची वडिलोपार्जित जमीन असून माझ्या वडिलांची आणि नातेवाईक यांची फसवणूक करून ही जमीन काही वर्षांपूर्वी भरणे व इतर 8 जणांनी खरेदी केली आहे. गुळाणी गावात आपण व आपल्या सैनिकांनी कोणतीही दहशत केली नाही हे जवान नाशिक येथे जात असताना जेवण करण्यासाठी माझ्या गावी आले होते. ते शेतामध्ये असलेल्या घरी जेवण करून पुन्हा नाशिककडे रवाना झाले.
– कर्नल केदार गायकवाड, तक्रारदार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)