गुळवेलीचे औषधी उपयोग

गुळवेलला संस्कृतमध्ये अमृता म्हणतात कारण खरोखरच ही अमृतासारखी गुणकारी आहे.
तापात उपयोगी – गुळवेलीचे चूर्ण कोमट पाण्यातून घेतले असता घाम येऊन ताप बरा होतो. कोणत्याही ज्वरात गुळवेलीचा काढा द्यावा. काढा करताना ओली गुळवेल घ्यावी. त्याचा अर्धा लिटर पाण्यात एक अष्टमांश काढा उरवावा व तो द्यावा. तसेच सर्व प्रकारच्या वात-पित्त-कफाच्या तापात पंचभद्राचा काढा गुणकारी आहे. गुळवेल, पित्तपापडा, नागरमोथा, सुंठ व काडेकिराईत ही पंचभद्राची पाच औषधे प्रत्येकी समप्रमाणात घेऊन अर्धा लिटर पाण्यात एक अष्टमांश काढा उरवावा व सर्व प्रकारच्या तापांवर पंचभद्राचा हा काढा उपयुक्‍त आहे.
पित्तज्वरावर – पित्तज्वरात अंगाची लाही लाही होते तसेच तहान खूप लागते आणि ताप येतो. अशा वेळी गुळवेल गुणकारी आहे. गुळवेलीच्या पानांच्या रसात खडीसाखर घालून द्यावा. पित्तज्वर बरा होतो.
मलेरियावर तसेच मुदतीच्या तापात – गुळवेल मलेरियावर अतिशय उपयुक्‍त आहे. मलेरियात थंडी वाजून ताप येतो. तो काही केल्या हटत नाही, महिना दोन महिन्यांनी वरचेवर येत रहातो. अशावेळी गुळवेलीचा काढा द्यावा. गुळवेलीच्या तुकड्याचा काढा रोज घेतल्याने पंधरा दिवसात बरे वाटू लागते व 40 दिवस घेतल्याने ताप साफ निघतो; पुन्हा म्हणून येत नाही. पुष्कळ दिवस घेतल्याने गुण कमी होत नाही.
शक्तिवर्धक – प्लीहा वाढली आहे, भूक लागत नाही, अंगात शक्ती नाही, अशावेळी गुळवेल हे अमृतदायी औषध आहे. हा काढा 6-6 महिने ताप बरा होईतो घ्यावा.
टायफॉईडमध्ये गुणकारी – विषमज्वर म्हणजे हल्ली ज्यास टायफॉईड म्हणतात. या तापात गुळवेलीच्या काढ्यात गुळवेलीचे सत्त्व घालावे. या औषधामुळे ताप फार चढत नाही व अंगात असला तरी तापाची बाधा फार होत नाही.
काविळीवर – काविळीवर गुळवेलीचा अंगरस 20 ग्रॅम खडीसाखर घालून प्यावा. कावीळ एका आठवड्यात बरी होते.
संधिवातात व आमवातात गुणकारी – संधिवात, आमवातात गुळवेलीचा व सुंठीचा काढा घ्यावा. पेराएवढा तुकडा व एक लहान सुंठ ठेचून त्याचा अर्धा लिटर पाण्यात एक अष्टमांश काढा उरवावा. हा काढा रोज संधिवात व आमवात झालेल्यांनी सांजसकाळ 2 वेळा घेतल्यास आराम मिळतो.
क्षयावर उपयुक्‍त – गुळवेलीचे सत्व क्षयातील ताप बरा करते. हे सत्त्व दोन ग्रॅम, 4 ग्रॅम तूप, 8 ग्रॅम खडीसाखर व 12 ग्रॅम लोणी असे एकत्रित घ्यावे. रोज घेतल्याने क्षय रोग्याचा ताप कमी होतो. भूक वाढते, शक्‍ती वाढते. क्षयरोगातील ताप अनेक औषधे घेऊन बरा होत नसल्यास गुळवेलीच्या काढ्यात चपटी अतिविषकळी टाकावी. दहा मिनिटे ठेवून नंतर गाळून दिवसातून 3 वेळा हे औषध घ्यावे.
गुळवेलीचे सत्व – हे फार गुणकारी आहे. सत्त्व काढण्याची कृती फार सोपी आहे. गुळवेल चांगली जाड मिळाल्यास निंबावरची, आंब्यावरची अगर दुसरे कोणत्याही झाडावरची असेल तर उत्तमच. ती आणून साफ धुवून त्याचे लहान लहान तुकडे करावे. नंतर ते तुकडे चांगले ठेचून भांड्यात ठेवून त्यावर राहील एवढे पाणी घालून भिजत ठेवावे. चांगले 10-12 तास भिजले असता हाताने कुस्करावे अथवा रवीने घुसळावे व ते पाणी गाळून घेऊन ते भांडे उन्हात ठेवावे. थोड्याच दिवसात सर्व पाणी आटून जाते व सत्त्व शिल्लक राहते. ते सत्त्व फार मोठे औषध आहे.
मूत्रविकारांवर उपयुक्‍त – गुळवेलीचा रस, ओल्या हळदीचा रस, आवळ्याचा रस, समप्रमाणात घेतला असता लघवीला आग होणे, लघवी थांबत होणे वगैरे सर्व मूत्रविकार बरे होतात.
मधुमेहींना उपयुक्‍त – गुळवेलीचे चूर्ण कोमट पाण्यातून रोज घेतले असता मधुमेहींची शर्करा नियंत्रित व्हायला मदत होते.
हृदयरोगाला अटकाव – गुळवेलीचा काढा किंवा चूर्ण नियमित घेणाऱ्यांचे हृदय बळकट होते. अशा व्यक्‍तींना हृदयरोग होत नाहीत.
आहारात गुळवेलीचा समावेश केला असता आपले आरोग्य चांगले रहाते म्हणून गुळवेलीच्या पानांची भाजी महिन्यातून एकदा खावी. अशा प्रकारे गुळवेल ही आरोग्याच्या दृष्टीने अमृतवेल आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)