गुरू आडवाणी यांचा मोदींकडून अवमान – राहुल गांधी

मुंबई – वैयक्तिक जीवनात गुरू अतिशय महत्वाची व्यक्ती असल्याची शिकवण हिंदू धर्म देतो. मात्र, हिंदू धर्माविषयी बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे गुरू लालकृष्ण आडवाणी यांचाच अवमान करत आहेत, असे टीकास्त्र आज कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोडले.

आडवाणी हे मोदींचे राजकीय गुरू असल्याचे सर्वच जाणतात. मात्र, मोदी सरकारी कार्यक्रमांतही आडवाणींचा आदर करताना दिसत नाहीत. मोदींपेक्षा कॉंग्रेस पक्ष आडवाणींचा अधिक आदर करतो. थोरा-मोठ्यांचा आदर करणे ही कॉंग्रेसची संस्कृती आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांची प्रथम भेट घेणाऱ्यांमध्ये माझा समावेश होता. वाजपेयींनी देशासाठी योगदान दिल्याचे आम्ही मानतो, असे राहुल येथे कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना म्हणाले. मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा राष्ट्रीय राजकारणात उदय झाल्यानंतर आडवाणींसारखे ज्येष्ठ नेते त्या पक्षात दुर्लक्षित झाल्याच्या मुद्‌द्‌यावर नेहमीच चर्चा होते. आता हा मुद्दा राहुल यांनीही उचलल्याचे मानले जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी राहुल यांनी इतर मुद्‌द्‌यांवरूनही मोदी यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. दरवर्षी 2 कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्‍वासन मोदींनी पाळलेले नाही. चीन हा शेजारी देश दर 24 तासांना 50 हजार युवकांना रोजगार पुरवतो. तर तेवढ्याच कालावधीत मोदी सरकारकडून केवळ 450 रोजगार उपलब्ध केले जातात, अशी खिल्ली त्यांनी उडवली. मोदी सरकारकडून देशातील 15 ते 20 श्रीमंतांचे 2.5 लाख कोटी रूपयांचे कर्ज माफ केले जाते. मात्र, कर्जमाफीबाबतच्या शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जाते. शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज माफ करण्याचे आमचे धोरण नसल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली म्हणतात, असा शाब्दिक टोलाही त्यांनी लगावला.

राहुल यांच्याकडून खालच्या स्तराचे राजकारण – भाजप 

आडवाणी आणि मोदींबाबतच्या वक्तव्यावरून भाजपने राहुल यांच्यावर पलटवार केला. कॉंग्रेस अध्यक्ष खालच्या स्तराचे राजकारण करत आहेत. सामाजिक आणि राजकीय निकषांचा ते भंग करत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यावरून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर कॉंग्रेस नेत्यांनी टीका केली. कॉंग्रेस नेत्यांनी काही वर्षांपूर्वी स्वपक्षाचेच तत्कालीन अध्यक्ष सीताराम केसरी यांचे कपडे फाडले. माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांना कॉंग्रेसकडून चुकीची वागणूक देण्यात आली, असा आरोप भाजपचे प्रवक्ते अनिल बालुनी यांनी केला. राजकीय मुल्यांची शिकवण राहुल यांनी आम्हाला देऊ नये, असा पलटवारही त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)