गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा- मुख्यमंत्री

जळगाव: पोलीस दलाने गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करताना संवेदनशीलतेने काम करीत जनतेच्या मनात पोलीस दलाविषयी विश्वास वाढविण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त राजाराम माने, खासदार ए.टी.पाटील, आमदार चंदूलाल पटेल, संजय सावकारे,शिरीष चौधरी, स्मिता वाघ, सुरेश भोळे, चंद्रकांत सोनवणे, उन्मेश पाटील,जि.प.अध्यक्ष उज्वला पाटील, महापौर सीमा भोळे, विशेष पोलीस महानिरीक्षक चेरिंग दोरजे आदी उपस्थित होते.

-Ads-

मुख्यमंत्री म्हणाले, गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढविण्यासाठी गुन्ह्यातील साक्षीपुरावे न्यायालयात भक्कमपणे सादर करावेत. सरकारी वकिलांसोबत चर्चा करून पोलीस आधिकाऱ्यांनी प्रलंबित प्रकरणांचा आढावा घ्यावा. अवैध धंद्यांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी. पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू, गुटखा विक्री किंवा सट्टा सुरू राहणार नाही याबाबत प्रभारी अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी.

अधिकाऱ्यांनी आपल्या कामगिरीने जनतेच्या मनात पोलीस दलाविषयी विश्वास वाढेल असा प्रयत्न करावा. जिल्ह्यातील पोलिस निवासस्थानाचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न करावा.  जिल्ह्यात पोलिसांना जास्तीत जास्त घरे उपलब्ध होण्यासाठी पीपीपी तत्वावर घरे बांधण्याचा प्रस्ताव तयार करावा. तपासात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. यापुढे पोलीस ठाण्यानिहाय गुन्ह्याबाबत आढावा घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील पोलीस स्टेशननिहाय हत्या, महिला व बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्याबाबत तसेच ऑनलाईन आलेल्या तक्रारींचाही आढावा घेतला.

बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत पोलीस दलातर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजना व उपक्रमांचे सादरीकरण केले. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)