गुन्हेगारी टोळ्या पुन्हा “अॅक्टीव्ह’

शर्मिला पवार
पिंपरी – उद्योगनगरीत ज्याप्रमाणे उद्योग वाढत गेले तसेच गुन्हेगारीचे जग देखील वाढू लागले ते आता इतके वाढले आहेत की, शहरात गुन्हेगारी टोळ्या पुन्हा एकदा “अॅक्टीव्ह’ झाल्याचे मागील काही घटनांवरुन दिसून येत आहे. यामध्ये अल्पवयीनांचा सहभाग वाढत आहे. वर्चस्ववाद, आगामी निवडणुका, जुनी भांडणे यातून टोळ्या सक्रीय झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. “मेट्रो सिटी’ची पायाभरणी होत असताना गुन्हेगारी टोळ्यांचा वाढूू लागलेला उच्छाद चिंताजनक आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या गुन्हेगारीला थोपविण्यासाठी पोलीस स्वतंत्र आयुक्तालयाची मागणी होत होती. लोकसंख्येच्या आणि शहर विस्ताराची ती गरज देखील होती. आयुक्तालय शहरात कार्यरत झाल्यापासून गुन्हेगारी टोळ्या थोड्या दबल्या होत्या, मात्र वर्चस्ववाद, आगामी निवडणुका, जुनी भांडणे या साऱ्यामुळे टोळ्या शहरात पुन्हा सक्रीय झाल्याची भीती शहरात व्यक्त केली जात आहे. रावण टोळीचा म्होरक्‍या अनिकेत जाधव याचा 20 नोव्हेंबर रोजी महाकाली आणि सोन्या काळभोर टोळीने खून केला होता. त्याच्या स्मृतिदिनी कार्यक्रमाच्या नावाखाली दहशत निर्माण करण्याचा रावण टोळीचा डाव होता. मात्र पोलिसांनी त्यांचा हा डाव उधळून लावला.

गेल्या महिन्यात रावण टोळीचा म्होरक्‍या अनिकेत जाधव याचा वाढदिवस होता. त्यावेळी रावण गॅंगच्या सदस्यांनी तलवारीने केक कापत परिसरात दहशत निर्माण केली होती. मात्र त्यावेळी पोलिसांना वेळेवर माहिती मिळाली नाही. पोलिसांना माहिती मिळाल्यावर वाढदिवस साजरा करणारेही पळून गेले होते. तेव्हापासून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. या टोळीतील काही सदस्य इतर राज्यात पळून गेले आहेत. पोलीस आपल्यापर्यंत पोहचणार असल्याची माहिती त्यांना आधीच मिळाली होती. त्यामुळे त्यांना ही माहिती दिली कोणी हा देखील एक प्रश्‍न आहे. भोसरी परिसरात जितू पुजारी व महेश डोंगरे यांच्या वादातून साक्ष देण्यासाठी एका व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारी डोके वर काढू पाहत आहे. यावर उपाय म्हणून आयुक्तांनी संबंधीत टोळीवर कडक कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत. शहरात 43 जिवंत काडतुसे सापडणे किंवा व्यावसायिकाच्या घरातून सात पिस्तूल जप्त करणे यामुळे पिंपरी-चिंचवडचा युपी -बिहार तर होत नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

वाकडमध्ये पहिली कारवाई
गंगाराम उर्फ संदीप शंकर तांबे आणि त्याचा वाढदिवस साजरा करणाऱ्या 13 जणांना पोलिसांनी गुरुवारी (दि. 22) मध्यरात्री ताब्यात घेतले. शहरात मध्यरात्री रस्त्यावरच केक कापण्याचे “फॅड’ाढले आहे. तलवारीचा वापरही त्यासाठी होतो. राजकीय कार्यकर्ते त्यात आघाडीवर आहेत. मध्यरात्री जोरजोरात फटाके फोडले जातात. याचा सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. शिवसेना आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार यांच्या पुत्रानेही असाच “प्रताप’ केला होता. त्याला हटकणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याला राजकीय दबावानंतर कारवाईला सामोरे जावे लागत होते. मात्र, माध्यमांमधून टीकेची झोड उठल्यानंतर ही कारवाई मागे घेण्यात आली. त्यामुळे अशांवर कारवाई करताना पोलिसांचीही गोची होते. परंतु, आता आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन यांनी आदेश काढत रात्री दहानंतर सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार वाकडमध्ये पहिली कारवाई झाली असून यामध्ये सातत्य राहण्याची अपेक्षा शहरवासियांमधून व्यक्त होत आहे.

“मुळशी पॅटर्न’ पाहण्यासाठी गुन्हेगारांची रिघ
पुण्यातील गुन्हेगारी प्रकाशझोत टाकणारा “मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट पहिल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात आहे. या चित्रपटात तडीपार गुन्हेगारांचा समावेश असल्याची चर्चा आहे. हा चित्रपट प्रदर्शित होताच गुन्हेगारी जगतातील अनेकांनी “फर्स्ट डे फस्ट शो’ पाहण्यासाठी हजेरी लावली. सोशल मीडियावरही चित्रपटाची तिकीटे गुन्हेगारांनी “सेल्फी’सह झळकावली. अंगावर भरगच्च सोने, पांढरे शुभ्र कपडे, मागे पुढे तरुणांचा ताफा अशा फौजफाट्यात गुन्हेगारांनी शहरातील चित्रपटगृहांमध्ये लागलेली हजेरी शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांच्या पोलिसांची करडी नजर आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)