गुणवंतांना दै.’प्रभात’ची कौतुकाची थाप

‘ऑलराऊंडर’ स्पर्धेचे बक्षीस वितरण : पारितोषिक देऊन विद्यार्थ्यांसह पालकांचा सन्मान

पुणे – दैनिक “प्रभात’तर्फे दहावी गुणवंत विद्यार्थी आणि “ऑलराऊंडर’ स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. विजेत्यांना पारितोषिक देऊन विद्यार्थ्यांसह पालकांचा सन्मान करण्यात आला. गुणवंत विजेत्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीला दै. “प्रभात’तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. हा हृद्‌य सोहळा साने गुरूजी विद्यालयातील राष्ट्र सेवा दल भवनात असंख्य विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

भोई प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. मिलिंद भोई, दै. “प्रभात’चे कार्यकारी संपादक अनिवाश भट, सामाजिक कार्यकर्ते विजय शेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिकाने गौरविण्यात आले. ऑलराऊंडर स्पर्धेत पारगाव शिंगवे (ता. आंबेगाव) येथील ज्ञानेश्‍वर टाल्हरे आणि गुणवंत विद्यार्थी योजनेत शिरूरचा संदेश डफळ या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या दोघांनाही अत्याधुनिक सायकल भेट देण्यात आली.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. मिलिंद भोई म्हणाले, दहावी व बारावी ही दोनही वर्षे आयुष्याच्या दृष्टीने वळण देणारी आहेत. या दोन वर्षांत कष्ट व अभ्यास केला तर आयुष्यातील पुढील दिवस चांगले जातात. या कालावधीत विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण व नियोजनपूर्वक अभ्यास करावा. मात्र केवळ मार्क मिळविण्यापेक्षा ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. मार्कार्थीपेक्षा ज्ञानार्थी व्हा, असे सांगत चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा. आयुष्यात आपली शाळा, गुरूजंनाना विसरू नका, असेही ते म्हणाले.

अविनाश भट यांनी सर्व विद्यार्थी व पालकांचे स्वागत केले. ते म्हणाले, इयत्ता पाचवी ते नववी इयत्तेत शिकत असताना विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनावर भर द्यावा. मुलांचा कल, आवडीनुसार शिक्षण देण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा. मुलांच्या व्यक्‍तिमत्व विकासासाठी अधिकाधिक प्रयत्न व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी केली. यापुढेही गुणवंत विद्यार्थ्यांना दै. “प्रभात’कडून नवोपक्रमाद्वारे कौतुकाची थाप कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पालक व विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्‍त करीत दै. “प्रभात’विषयी कृतज्ञता व्यक्‍त केली. सचिन कापरे, नवीनकुमार गुगळेसह आदी पालकांनी दै. “प्रभात’ उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थी आदित्य महाजन म्हणाला, मला दहावीला 98 टक्‍के गुण पडले असून, सध्या फर्ग्युसनमध्ये शिकत आहे. दै. “प्रभात’ची अभ्यासमाला नेहमी वाचायचो. इंग्रजी माध्यमाचा असूनही मराठीत लेखमाला उपयुक्‍त ठरली. त्यातून माझी शब्दसामुग्री वाढली. दहावी अभ्यासमालेमुळेच मला चांगले गुण मिळाले, असेही तो म्हणाला. दुसरा विद्यार्थी आकाश घोरपडे म्हणाला, मला 97.20 टक्‍के गुण दहावीत मिळाले आहेत. संस्कृत व इंग्रजी विषयात फार मागे होतो. मात्र दहावी अभ्यासमालेचा नियमित वाचन केल्याने त्याचा मोठा फायदा झाला. परिणामी या दोनही विषयांतही चांगले गुण पडले. पुढे सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न आहे. याप्रसंगी वृत्तपत्र विक्रेता उदय सेटिया, नवीनकुमार गुगळेसह विद्यार्थी व पालकांची मोठी उपस्थिती होती. या सोहळ्याचे कल्पना शेरे यांनी सूत्रसंचालन करीत कार्यक्रमाची उंची वाढविली.

दै.”प्रभात’ची समाजाशी व कार्यकर्त्यांशी नाळ
माझ्या ऐन उमेदीच्या काळात दै. “प्रभात’ने सदराद्वारे कौतुकाची थाप दिली. आजही दै. “प्रभात’ने समाजाशी व कार्यकर्त्यांची नाळ कायम ठेवली आहे. त्यामुळे “प्रभात’ची दैदिप्यमान वाटचाल सुरू आहे. मी लहान असताना दै. “प्रभात’च्या अभ्यासमालेच वाचन करायचो आणि अभ्यास करायचो. अभ्यासमाला आम्हाला यशात उपयुक्‍त ठरली. “प्रभात’चा हा उपक्रम कौतुकास्पद असून, पालकांसाठी एखादा उपक्रम राबवावा, असे डॉ. मिलिंद भोई यांनी सांगितले.

पालकांचे मनोगत
संदेश डफळला दहावीत 98.40 टक्‍के पडले असून, तो आता लातुरमध्ये पुढील शिक्षण घेत आहे. त्याच्या यशात दहावी अभ्यासमालेचा मोठा वाटा आहे. आज सर्व गोष्टी पैशाने विकत घेता येऊ शकतात, पण विद्या धनाने घेता येत नाही. हेच विद्या धन विद्यार्थ्यांना देण्याचा “प्रभात’चा उपक्रम प्रेरणादायी आहे, असे मत संदेशच्या पालकांनी व्यक्‍त केले.

विद्यार्थ्याचे मनोगत
साधना विद्यालयाचा साहिल लांडगे म्हणाला, गेली चार वर्षे नियमितपणे दै. “प्रभात’चा वाचक आहे. सध्या वर्तमानपत्रात शेतकऱ्यांची आत्महत्या, जवान शहीद अशा बातम्या वाचताना मनाला वेदना होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेमी बनावे. सर्व जाती, धर्माच्या पलीकडे जाऊन एक सुजाण नागरिक म्हणून जगण्याचा प्रयत्न करणार आहे. याप्रसंगी साहिलने व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांना महात्मा गांधींच्या जीवनावरील पुस्तके भेट देत राजकीय क्षेत्रात जाऊन देशात परिवर्तन करण्याचा संकल्प सोडला.

ऑलरांऊडर स्पर्धेतील पाच अनुक्रमे विजेते
1) ज्ञानेश्‍वर टाल्हरे : पारगाव (ता. आंबेगाव) – सायकल
2) दशरथ पासलकर : नऱ्हेगाव – स्टडी टेबल
3) सचिन चौंधे : हिंजवडी – स्टडी टेबल
4) रेवा हळदवणकर : हडपसर -लंचबॉक्‍स
5) सिद्धी नाईक : गुरूवार पेठ – लंचबॉक्‍स


विद्यार्थी गुणवंत योजनेतील विजेते
1) संदेश डफळ : धामारी (ता. शिरूर) – सायकल
2) आकाश घोरपडे : आंबावडे (ता. भोर) – मोबाईल
3) तेजस उराडे : भोर – मोबाईल
4) भक्‍ती कुरांडले : शिरूर – लंचबॉक्‍स
5) श्रद्धा कवडे-देशमुख : इंदापूर – लंचबॉक्‍स


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)