गुणगौरव समारंभातील उपस्थितीच बबनराव ढाकणेंच्या कर्तृत्वाची साक्ष

पाथर्डी – वांबोरी चारी, ऊस तोडणी कामगार, दुष्काळी भागातील जनता, खेड्यापाड्यातील अडचणी अशा विविध प्रश्‍नांसाठी संघर्षाची भूमिका घेत बबनराव ढाकणेंनी आपले उभे आयुष्य वेचले. त्यांच्या गुणगौरव समारंभाला या ठिकाणी उपस्थित असलेले हजारो लोक ही त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष असल्याचे गौरवोद्‌गार माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काढले.

एकलव्य शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधत संस्थेचे संस्थापक थोर स्वातंत्र्यसेनानी पाथर्डी विधानसभेची प्रथम सदस्य स्वर्गीय माधवराव निऱ्हाळी यांच्या पुतळ्याचे अनावरण व संस्थेचे विद्यमान अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या गौरव समारंभात माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सदाशिव लोखंडे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, उपाध्यक्षा राजश्री घुले, आ. अरुण जगताप, मा. आ. चंद्रशेखर घुले, जि. प. सदस्या प्रभावती ढाकणे, मा. आ. दादाभाऊ कळमकर, उषाताई दराडे, साई संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, जि. प. सदस्या हर्षदा काकडे, सुशीला मोराळे, माजी जि. प. अध्यक्ष विठ्ठल लंघे, जि. प. सदस्या शिवाजी गाडे, अशोक बाबर, सोमनाथ धूत, युवानेते ऋषीकेश ढाकणे, मा. आ. पांडुरंग अभंग, तोताराम कायंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पवार म्हणाले की, पाथर्डीसारख्या दुष्काळी भागात पंन्नास वर्ष स्व. माधवराव निऱ्हाळी यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानदानाचे काम सुरू आहे. ऐन उमेदीच्या काळात स्व. निऱ्हाळीनी रावसाहेब पटवर्धन व अच्युतराव पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यचळवळीत भाग घेवून स्वातंत्र्य प्राप्त करून दिले. त्यांना तुरूंगवास भोगावा लागला. 1952 च्या विधानसभेचे प्रथम सदस्य होण्याचा मान त्यांना मिळाला. त्यांचा पुतळा उभारून संस्थेने त्यांच्या कार्याची आठवण करून दिली आहे. बबनराव ढाकणे हे आगळेवेगळे, अवलिया व्यक्तिमत्त्व होते. प्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी ते कुठल्या टोकाची भूमिका घेतील हे सांगता येत नव्हते. पाथर्डीसारख्या दुष्काळी तालुक्‍यातील ढाकणेसारख्या सर्वसामान्यांच्या नेतृत्वाने शिक्षण मर्यादित असतानाही व कुठलीही राजकीय पार्श्‍वभूमी नसताना संघर्षांच्या जोरावर जिल्हा परिषदेपासून केंद्रीय मंत्रिपदापर्यंत काम करण्याची संधी मिळवली.

यामागे त्यांचे कर्तृत्व व मोठेपणा दडलेला आहे. वांबोरी चारी, ऊस तोडणी कामगार, दुष्काळी भागातील जनता आदींच्या प्रश्‍नांसाठी त्यांनी संघर्ष करत उभे आयुष्य वेचले. त्यांच्या गुणगौरव समारंभ प्रसंगी आपण सर्व उपस्थित हजारो लोक त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देत असल्याचे पवार यांनी शेवटी सांगितले.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, शरद पवारांच्या हस्ते बबनराव ढाकणे यांचा गौरव होतोय. देशात यापेक्षा मोठा गौरव नाही. कुठलीही राजकीय पार्श्‍वभूमी नसताना सेवा सोसायटीपासून केंद्रात मंत्री होणं एवढं सोपं काम नाही. जनतेच्या आशीर्वादाने नगर जिल्ह्याबरोबरच बीड जिल्ह्याचे नेतृत्व त्यांनी केले. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांचा राजकीय झंझावात सुरू असताना मी खूप लहान होतो. त्यांनी बीडमधून लोकसभा लढवली तेव्हा मला मतदानाचा हक्कही नव्हता. तेव्हा बबनराव ढाकणे जिंदाबाद म्हणणारा मी एक कार्यकर्ता होतो. आज त्यांच्या गुणगौरव समारंभानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हा गौरव फक्‍त ढाकणे यांचा नसून पाथर्डी, अहमदनगर व बीड जिल्ह्यातील चळवळीचा जीवन गौरव सभारंभ आहे.

आपल्या सर्वांना बळीचं राज्य आणावं असं वाटत असेल तर आपणा सर्वांना बबनराव ढाकणे यांच्या संघर्षाचा वारसा चालवावा लागेल. गेल्या तीन वर्षांत राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या याची माहिती सरकारला मागविल. अद्यापर्यंत खरी आकडेवारी मिळत नाही. मात्र मंत्रालयात किती उंदीर मारले याची यादी मिळते, असे सांगत ना. मुंडे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली.

विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, बबनराव ढाकणे यांनी आयुष्यभर जी कामे केली त्याची नोंद जनता जनार्दनात आहे. या गौरव समारंभासाठी मुख्यमंत्री आले असते तर बरे झाले असते आम्हाला विधानसभेत प्रश्न मांडता येत नाहीत. निदान या सोहळ्यानिमित्त राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडता आले असते, असे म्हणत वळसे यांनी राज्य शासनाच्या मनमानी कारभारावर टीका केली.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांनी सत्काराला उत्तर देताना आपला संघर्षमय जीवन पट उपस्थितांसमोर उलगडला. नगर दक्षिण दुष्काळी भागाच्या विकासासाठी जिल्हा विभाजन होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करून पवार यांनी विभाजनासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती यावेळी त्यांनी केली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या संघर्षमय राजकीय जीवनावर आधारित चित्रफितीचे अनावरण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. केदारेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऍड. प्रतापराव ढाकणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. राजेंद्र टाक यांनी सूत्रसंचालन तर डॉ. दीपक देशमुख उपस्थितांचे आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)