गुढे गावचे ग्रामदैवत श्री अंबिका देवी

सह्याद्रि…! छ. शिवाजी महाराजांच्या अथक परिश्रमाची आणि पराक्रमाची साक्ष देणारा एकमेव साक्षीदार याच सह्याद्रिने अनुभवल्या मावळ्यांच्या “जय शिवाजी-जय भवानीच्या घोषणा, घोड्यांच्या टापांनी आस्मानी दौड, भितीने सैरावैरा धावणारे स्वराज्यद्रोही’, याच सह्याद्रिच्या हिरवळीत वसलेले पाटण तालुक्‍यातील काही मोजक्‍या समृद्ध खेड्यांपैकी एक गुढे हे गाव. कार्तिक महिन्याच्या सप्तमीला म्हणजेच शुक्रवार, दि. 30 नोव्हेंबर 2018 रोजी येथील ग्रामदैवता श्री अंबिकादेवीच्या यात्रेचा मुख्य दिवस.

यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्त घेतलेला हा अल्पसा आढावा…गाव म्हटलं की सर्वांच्याच मनात एक आपुलकीची भावना आणि उत्साह निर्माण होतो. प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्रे, गर्द हिरवी झाडी, ग्रामपंचायत कार्यालय, चौकातील गप्पांची मैफिल, बसथांबा, गावातील कमालीची स्वच्छता आदी गोष्टींबरोबर डोळ्यासमोर तरळते ती ग्रामदैवतेची मुर्ती. गुढे येथील ग्रामदैवत म्हणजे श्री अंबिकादेवी. अंबिका मातेची प्रसन्न मुद्रेतील मुर्ती, निसर्गाच्या अद्‌भुत अविष्काराच्या छायेखाली सदैव गावावर कृपादृष्टी बरसत ठेवणारी ग्रामजननी असल्याचे भासते.

गुढे, ता. पाटण येथील ग्रामदेवता श्री अंबिका मातेचा इतिहास अतिप्राचीन काळातील आहे. तो कोणी बनवलेला नाही. तो स्वयंभू आहे. तिच्यापासून गुढे गावाला अखंडपणे सुख-शांती-वैभव मिळत आहे. गावच्या पश्‍चिमेला कुलदैवत श्री जोतिबाचे मंदिर, दक्षिणेला उंच डोंगरावर काळंबादेवीचे मंदिर तर पूर्वेला शांत निवांत ठिकाणी श्री अंबिका मातेचे मंदिर आहे. हे मंदिर हेमांडपंथी शिल्पकलेचा सुंदर असा नमुना आहे.

पूर्वी गुढे, ता. पाटण गावातील बाबाजी कुंभार हे मडकी बनवत होते. ते नेहमीप्रमाणे मडकी बनविण्यासाठी, माती आणण्यासाठी गेले असता कुदळीने उकरताना खण-खण असा आवाज आला, त्यांना आश्‍चर्य वाटले. त्यांनी आणखी खोलवर खोदले असता त्या ठिकाणी स्वयंभू अंबिका देवीची मुर्ती आढळून आली. त्याच ठिकाणी त्याच जागेवर सर्व ग्रामस्थांनी मिळून अंबिका मातेचे भव्य असे मंदिर बांधले. अशारितीने ग्रामदैवत अंबिकेचे मंदिर पूर्ण झाले. या मुर्तीची मूळ वैशिष्ट्ये तशीच आहेत.

भारतातील एकमेव अद्वितीय युद्ध मुद्रेतील विजयी चेहऱ्याची ही मुर्ती आहे. तिच्या हातात तलवार, ढाल, वाद्य आहे. महिषासुराचा वध केलेल्या स्थितीतील विजयी मुद्रेतील मुर्तींचे पूर्ण गावावर सदैव लक्ष असते. या देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. संपूर्ण गाव हे कदमांचे असून त्यांचे गोत्र भारद्वाज आहे. त्यानुसारच गावचे कुलदैवत तुळजापुरची अंबाबाई व मुर्तीसुद्धा अंबिकादेवीची आहे.

कार्तिक महिन्याच्या सप्तमीला म्हणजेच शुक्रवार, दि. 30 नोव्हेंबर 2018 रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून त्यादिवशी पुरणपोळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो. मानाच्या पालखीतून गावातून मिरवणूक काढून गुलाल-खोबरे उधळले जाते. देवीच्या पुजेचा मान पुजारी घराण्याकडे, देवीच्या पालखीचा मान नलवडे घराण्याकडे आणि मानाचे ताट पाटील घराण्याकडे असतो. या उत्सवात तन, मन, धन, अर्पूण सर्व गावकरी यात्रेसाठी हजर असतात. जागृत देवस्थान म्हणूनही देवीची सर्वत्र प्रसार झाला आहे. शुद्ध मनाने व विश्‍वासाने जर काही मागणे मातेला मागितल्यास त्या व्यक्‍तीची इच्छा पूर्ण होते. अंबिकादेवीला अंबाबाईदेवी म्हणूनही ओळखले जाते.

अंबिका मातेची यात्रा शुक्रवार, दि. 30 रोजी भरत असून पाटण तालुक्‍यातील गावातील यात्रांच्या पूर्वार्धातील वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबासाठी गावाकडे आनंदाने, उत्साहाने जाण्यासाठी मिळालेली एक हक्काची संधीच असते. सासुरवाशीन महिला आपल्या कुटंबासमवेत यात्रेमध्ये रमतात. एकंदरीतच या दिवशी गावातील सर्वच घरांमध्ये चैतन्याचा पाऊसच बरसतो. गावातील तरुणांनी एकमेकांच्या सहकार्याने ग्रामदैवताच्या मंदिराचा केलेला जिर्णोद्धार म्हणजे गावासाठी एक संजीवनीच भासते. वृक्षारोपण, सुसज्ज बेंचेस जागोजागी असल्याने एकमेकांच्या सुख:दुखाची देवाणघेवाण येथे नित्यनियमाने होते. यात्रेनिमित्त कुस्त्यांचा फड, करमणुकीचा कार्यक्रम, संगीतसंध्या आदी कार्यक्रमांची रेलचेल असल्याने यात्रेचा दिवस कधी संपतो हेच कळत नाही.

श्री अंबिकादेवीच्या यात्रेच्या निमित्ताने गुरुवार, दि. 29 रोजी संगती रजनी भक्‍ती संगिताचा कार्यक्रम व देवाचा नैवेद्य होईल. तसेच रात्री झी मराठी व ईटीव्हीने गौरविलेला दर्जेदार वाद्यवृंद कलाकारांचा कार्यक्रम, रात्री 11 वाजता लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी 4 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत जंगी कुस्त्यांचे मैदान होईल. तरी यात्राप्रेमी भाविक, नाट्यप्रेमी, तमाशा व कुस्ती प्रेमींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थ मंडळ, गुढे, शिबेवाडी वरची, शिबेवाडी खालची, दिंडेवाडी, दळवीवाडी, पाटीलवाडी, शिद्रुकवाडी, वायचळवाडी, मान्याचीवाडी, पाचुपतेवाडी, जाधववाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे. ग्रामजननी अंबिका मातेच्या कृपेने गाव प्रगती आणि समृद्धीच्या अत्युच्च शिखरावर पोहचावे, हीच यात्रेनिमित्त सर्वांना शुभेच्छा.

श्री. पी. जी. जंगाणी (सर)
सहशिक्षक, श्री वाल्मिकी विद्यामंदिर
तळमावले, ता. पाटण


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)