गुजरातमध्ये मुदतपूर्व निवडणुकीची चिन्हे

भाजपने हाती घेतले मिशन 150
अहमदाबाद – उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपला मिळालेल्या घवघवीत यशाच्या पार्श्‍वभूमीवर गुजरातमध्ये मुदतीपूर्वीच विधानसभा निवडणूक घेतली जाईल, अशी शक्‍यता बळावली आहे. मुदतपूर्व निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने भाजपने आतापासूनच मिशन 150 हाती घेतले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची छायाचित्रे असणारे फलक गुजरातच्या काही भागांत झळकू लागले आहेत. या फलकांवर यूपीमें 325, गुजरातमें 150 अशा घोषणा छापण्यात आल्या आहेत. उत्तरप्रदेशची सत्ता काबीज करताना भाजपने जागांचे त्रिशतक पार केले. आता गुजरातमधील विधानसभेच्या एकूण 182 पैकी 150 जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने समोर ठेवल्याचे संबंधित फलकांवरून स्पष्ट होत आहे. सध्या पक्षाचे 123 आमदार आहेत. भाजप सलग 19 वर्षांपासून गुजरातमध्ये सत्तेवर आहे. त्या राज्यात चालू वर्षाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होणे अपेक्षित आहे.
गुजरातमधील यावेळची निवडणूक भाजपसाठी आव्हानात्मक असल्याचे चित्र मागील काही काळापासून आहे. राज्याच्या राजकारणातील मोदींची अनुपस्थिती, आरक्षणाच्या मागणीसाठी पटेल समाजाने केलेले आंदोलन, दलितांमधील अस्वस्थता, काहीसे राज्य सरकारविरोधी जनमत आदींमुळे भाजपला रोखण्याची चांगली संधी असल्याची विरोधकांमधील आणि प्रामुख्याने कॉंग्रेसमधील भावना आहे. मात्र, उत्तरप्रदेशातील भाजपच्या धमाकेदार विजयामुळे मोदी लाट कायम असल्याचे मानले जात आहे. त्यातून भाजपच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)