31 वर्षीय महिलेच्या पोटातून काढला चार किलो वजनाचा गोळा
नारायणगाव- 32 वर्षीय आदिवासी महिलेच्या पोटातील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून पोटातील चार किलो वजनाचा गोळा काढण्यात नारायणगाव येथील जनरल सर्जन डॉ. हनुमंत भोसले आणि त्यांच्या वैद्यकीय टीमला यश मिळाले आहे.
नीलम जीवन मधे (वय 32, रा. कोतुळ, ता. अकोला, जि. अहमदनगर) या आदिवासी भागातून आलेल्या महिलेच्या पोटात अनेक दिवसांपासून दुखत होते. संगमनेर येथील एका हॉस्पिटलमध्ये तपासणी केली असता पोटात गोळा असून, ऑपरेशन करून काढावा लागेल आणि त्यासाठी 60 हजार रुपये खर्च येईल, असे सांगितल्याने मधे कुटुंबीय चिंतेत होते. हे दाम्पत्य मोलमजुरी करून उपजीविका चालवत असल्याने एवढा खर्च करणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे एका नातेवाइकाने त्यांना नारायणगाव येथील भोसले हॉस्पिटल पत्ता दिला. मधे परिवारांनी डॉ हनुमंत भोसले यांना भेटून सर्व माहिती सांगितली. डॉ भोसले यांनी प्राथमिक तपासणी करून सोनोग्राफी पाहून, ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. डॉ भोसले यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती कळताच त्यांनी पोटाचे ऑपरेशन अल्प दरात करण्याचे ठरवल्याने मधे कुटुंबियांना दिलासा मिळाला. त्यानंतर मधे यांच्यावर डॉ. भोसले आणि त्यांचे सहकारी डॉ. रामदास उदमले, डॉ. मोनाली शिंगोटे,डॉ प्राजक्ता जाधव, वैशाली गवंडी, स्वाती सोनावणे, विकास गायकवाड, संजय कांबळे या टीमने हे गुंतागुंतीचे ऑपरेशन यशस्वीरीत्या केले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा