गुंतवणूक मंत्र: नेहमीच पुढच्या आशेस जन्म देणारी वाढ

प्रसाद भावे

चौथ्या तिमाहीतील जीडीपीतील वाढ ही 7.7 टक्क्‌यांवर गेलीय. हीच वाढ मागील तिमाहीत 7 टक्के होती. यामागं प्रमुख तीन क्षेत्रांतील वाढ कारणीभूत ठरलीय ती म्हणजे शेती, उत्पादन आणि बांधकाम. शेतीतील वाढ ही 4.5 %, उत्पादनातील वाढ 9.1 % तर बांधकामातील वाढ 11.5 % झालीय. सेवाक्षेत्रातील वाढ ही बरी म्हणजे 6.5 % आलीय. आणि सर्वांत विशेष म्हणजे ग्रॉस फिक्‍स्ड कॅपिटल फॉर्मेशन हे 18 टक्क्‌यांनी वाढलंय म्हणजेच याचं श्रेय गुंतवणुकीस जातंय. यामुळं पुन्हा हेच अधोरेखित होतं की अर्थव्यवस्थेची प्रगती ही चालूच आहे आणि ही गोष्ट येणाऱ्या (कंपन्यांच्या) रिझल्ट्‌समध्ये परावर्तित झाल्यावाचून राहणार नाही. एका नामवंत कंपनीनं आपल्या सर्वेक्षणानुसार 2018-19 च्या शेवटास जीडीपीचा अंदाज 7.4 टक्के वर्तवलाय.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आताची शेती क्षेत्रातील वाढ ही 4.5 % आलीय जी वाढ मागील वर्षातील पहिल्या सहामाहीपेक्षा म्हणजे 2.7 टक्क्‌यांपेक्षा सुखावणारी आहे. कृषी क्षेत्रातील वाढ ही किंमतींमध्ये वाढ झाल्याने नाही तर उच्च कृषी उत्पादनामुळं प्राप्त झाली आहे. उत्पादनातील वाढ ही 9.1 % झालीय, ज्यामुळं उत्तम औद्योगिक उत्पादनासदेखील पुष्टी मिळते. मागणीत वाढ झाल्यानं व त्यामुळं उत्पादन क्षमतेचा जास्त वापर होत असल्याचा हा परिणाम आहे. त्याचबरोबरीनं बांधकाम क्षेत्रातील वाढ ही दिलासा देणारी आहे. खाणक्षेत्रातील वाढ ही कमकुवत ठरलीय परंतु सरकारची कोळसाखाणींच्या लिलावाची योजना येणाऱ्या वर्षात यात सुधारणूक घडवून आणेल अशी आशा नक्कीच बाळगता येऊ शकते. या तिमाहीत सेवा क्षेत्र जरी मंदावलेले असले तरी त्याच्यात येणाऱ्या तिमाहींत सुधारणा होण्याची आशा आहे.
आता गुंतवणुकीबद्दल बोलायचं ठरवलं तर गुंतवणूक क्षेत्राचा वाटा आपल्या जीडीपीच्या 29 टक्के इतका आहे. मागील म्हणजे तिसऱ्या तिमाहीतील वाढ जी 12 टक्के होती त्यापेक्षा या तिमाहीतील वाढ ही 18 टक्के झालीय ज्याचं श्रेय जातंय ते फोफावणारा सरकारी योजनांवर केला जाणारा खर्च. त्यामुळं येणाऱ्या तिमाहीत ही वाढ टिकणं हे जास्त महत्वाचं आहे. भारतीय अर्थव्यवसंस्थेच्या गुंतवणूक व खर्च या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

जीएसटीची योग्य प्रकारे सुधारत चाललेली अंमलबजावणी, उपभोग्य मागणी (कंझम्पशन डिमांड), सरकारची विविध सरकारी योजनांवरील खर्चाची योजना, आणि मागील दारानं होणारी व आता जोर धरलेली गुंतवणूक प्रक्रिया यां बाबी नक्कीच आपल्या अर्थव्यवस्थेतील वाढ 7 टक्क्‌यांवर ठेवण्यास हातभार लावतील. तसंच, दुसऱ्या बाजूस पाहिलं तर, आपला भारत देश हा आपल्या कच्च्या तेलाच्या एकूण मागणीच्या दोन तृतीयांश तेल हे आयात करतो त्यामुळं येणाऱ्या दिवसांत कच्च्या तेलाच्या किमती या महागाईवर किती परिणामकारी ठरताहेत व पर्यायानं रिजर्व बॅंक आपल्या ऑगस्टमधील पुढील बैठकीत काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं ठरेल. चढे व्याजदर ग्राहकांची क्रयशक्ती व कंपन्यांचे निकाल यांवर परिणाम करणारे ठरू शकतात. त्याचबरोबर, एकूणच पायाभूत सुविधांसाठी सरकार उचलत असलेली पावलं ही नक्कीच स्वागतार्ह असली तरी त्याचा ताण आधीच ताणल्या गेलेल्या बॅंकांच्या ताळेबंदांवर पडणार नाही हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरेल.

येणाऱ्या महिन्यांत, मान्सूनचं सुधारित अनुमान, सरकारी योजनांवरील खर्च, आशादायी जागतिक वाढ, जीएसटी; बॅंकरप्सी कोड यांसारख्या होत असलेल्या सुधारणा आणि व्यवसायसुकरतेसाठी सरकार उचलत असलेली पाऊलं इ. गोष्टी आपल्या अर्थव्यवस्थेच्या वाढीस योग्य अशा दिसणाऱ्या चित्रासाठी पूरक नक्कीच आहेत मात्र ते चित्र योग्यरित्या प्रत्यक्षात उमटावं व टिकावं हीच सदिच्छा.

मागील आठवड्यात फार्मा कंपन्यांनी चांगली उसळी घेतली होती. आता आयसीआयसीआयसारख्या बॅंकांची आकर्षित करणारी मूल्यांकनं, सिमेंट कंपन्यांच्या शेअर्सचे पडलेले भाव अशा गोष्टी गुंतवणूकदारांना भुरळ न पाडतील तरच नवल.

असो, येणाऱ्या आठवड्यात बाजार हा मोठ्या हालचालीच्या तयारीस लागेल असं वाटतं. दैनिक आलेखावर निफ्टी 50ला 10840-10860 च्या सुमारास अडथळा संभवतो तर खालील बाजूस 10650-10670 यां पातळ्यांदरम्यान आधार वाटतो. यां पातळ्यांच्या बाहेर निफ्टी50 बंद झाल्यास (म्हणजे साधारणपणे 10860 च्या वरती अथवा 10650 च्या खाली) मोठी वध-घट पाहायला मिळू शकते. पाहुयात प्रत्यक्षात काय घडतंय ते..

अर्थसार पुरवणीत देण्यात येणारे गुंतवणुकीचे सल्ले, लेखक अभ्यास करूनच देत असतात, पण गुंतवणुकीत नेहमीच जोखीम ही असतेच. ती लक्षात घेऊनच गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)