गुंतवणूक छोटी; कमाई मोठी ! (भाग-१)

स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी प्रॉपर्टी विकत घ्यावी लागते आणि त्यासाठी मोठी रक्कम लागते; परंतु आरईआयटी ट्रस्ट स्थापन होण्याची शक्‍यता वाढल्यामुळे आता म्युच्युअल फंडाच्या धर्तीवर प्रॉपर्टीत गुंतवणूक करणे छोट्या गुंतवणूकदारांना शक्‍य होणार आहे. तयार प्रॉपर्टीच्या मूल्याचे युनिट्‌स करून शेअर बाजारात त्यांची विक्री शेअर्सप्रमाणेच करण्यात येणार असून, अशा प्रकारच्या गुंतवणुकीतून छोट्या गुंतवणूकदारांना कमी पैशात अधिक परतावा मिळविण्याची संधी प्राप्त होणार आहे.

स्थावर मालमत्तेत पैसा गुंतवणे नेहमीच सुरक्षित आणि अधिक नफा मिळवून देणारे ठरते. सामान्यतः स्थावर मालमत्तेत गुंतवणूक मोठी करावी लागते. बाजारपेठेतील बदलांनी स्थावर मालमत्तेत पैसा गुंतविण्याच्या पद्धतीही बदलल्या आहेत. कमीत कमी गुंतवणुकीच्या माध्यमातून कोट्यवधींच्या मालमत्तेत पैसा गुंतविणे लवकरच शक्‍य होणार आहे. रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेन्ट ट्रस्ट (आरईआयटी) स्थापन झाल्यानंतर गुंतवणूकदार ज्याप्रमाणे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात, तशीच गुंतवणूक रिअल इस्टेटमध्ये करता येणार आहे. या माध्यमातून छोटी गुंतवणूक करून अधिक परतावा कमावण्याची संधी गुंतवणूकदारांना उपलब्ध होणार आहे.

आरईआयटी हे म्युच्युअल फंडासारखेच गुंतवणुकीचे माध्यम असेल. या माध्यमातून रिअल इस्टेटमध्ये पैसा गुंतवता येईल. फरक इतकाच की, म्युच्युअल फंडांमधून रियाल्टी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यात येते, तर आरईआयटीच्या माध्यमातून थेट मालमत्तेत म्हणजे ऑफिस, शॉपिंग सेंटर, कमर्शियल इमारतींमध्ये गुंतवणूक केली जाईल. या माध्यमातून प्रॉपर्टीत गुंतविण्यासाठी फार मोठ्या रकमेची गरज नाही. त्याचप्रमाणे खरेदीसाठी लांबलचक कागदोपत्री प्रक्रियेचीही गरज असणार नाही. केवळ दोन लाख रुपयांची गुंतवणूक करून मोठ्यात मोठ्या प्रॉपर्टीमधील एक हिस्सा खरेदी करू शकेल. याखेरीज प्रॉपर्टी बाजाराप्रमाणे या गुंतवणुकीत पारदर्शकतेचा अभाव नसेल.

आयपीओच्या धर्तीवर आरईआयटी आपले युनिट्‌स जारी करतील. त्यांना नंतर शेअर बाजारामध्ये अधिसूचित करण्यात येईल.त्यानंतर शेअर बाजारात त्या युनिट्‌सच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार शेअर्सप्रमाणेच केले जातील. जगातील अनेक विकसित देशांमध्ये आरईआयटी हे मॉडेल भलतेच लोकप्रिय आहे. या मॉडेलमुळे एकीकडे विकासकाला पैशांची कमतरता भासत नाही, तर दुसरीकडे छोट्या गुंतवणूकदारांनाही या क्षेत्रात पैसा गुंतविण्याची संधी मिळते. आरईआयटीच्या माध्यमातून गुंतवणूकदार थेट रिअल इस्टेट प्रॉपर्टीत म्हणजे निवासी संकुले, व्यापारी संकुले, कार्यालयीन इमारती, हॉटेल्स आणि शॉपिंग मॉल्समध्ये गुंतवणूक करू शकतात.

आरईआयटीच्या माध्यमातून आपली युनिट्‌स गुंतवणूकदारांना विकायची असतील, तर संबंधित विकसकांसाठी विविध नियमांची तरतूद केली आहे. याअंतर्गत आयपीओ आणण्यासाठी कोणत्याही रिअल इस्टेट कंपनीजवळ एक हजार कोटींची संपत्ती असणे गरजेचे मानण्यात आले आहे. आयपीओची ऑफरसुद्धा कमीत कमी 250 कोटी रुपयांची असेल. यात गुंतवणूक करण्यासाठी कमीत कमी दोन लाख रुपये असावे लागतील आणि एका युनिटची किंमत एक लाख रुपये असेल. भांडवल बाजार नियामकांनी आरईआयटी आणण्यास 2014 मध्येच मंजुरी दिली होती. परंतु करप्रणालीतील गुंतागुंतीमुळे आतापर्यंत आरईआयटी स्थापन होऊ शकले नव्हते. परंतु आता हे ट्रस्ट सुरू होण्याची शक्‍यता वाढली आहे. यामुळे छोट्या गुंतवणूकदारांना प्रॉपर्टी बाजारात गुंतवणूक करण्याचे मार्ग खुले होणार आहेत. वास्तविक, प्रॉपर्टीत केलेल्या गुंतवणुकीमुळे गुंतवणूकदारांना दीर्घ कालावधीत मोठा नफा मिळण्याची संधी असते. त्याचप्रमाणे नुकसान होण्याची शक्‍यताच नसते.

नियमांनुसार, आरटीआयला 90 टक्के पैसा काम पूर्ण झालेल्या तसेच भाड्याने दिलेल्या इमारतींमध्ये गुंतवावा लागेल. गुंतवणूक केलेली प्रॉपर्टी याच देशातील असणे अनिवार्य आहे. याव्यतिरिक्त त्यातून आरईआयटीला जी कमाई होईल, त्यातील 90 टक्के हिस्सा गुंतवणूकदारांना वाटला पाहिजे, असा नियम करण्यात येईल. याचाच अर्थ, आरईआयटीअंतर्गत केलेली गुंतवणूक केवळ पूर्ण झालेल्या इमारतींमध्ये तसेच भाड्याने देण्यात आलेल्या इमारतींमध्येच केली जाणार असल्यामुळे गुंतवणूकदाराला कोणतीही जोखीम पत्करावी लागणार नाही.

गुंतवणूक छोटी; कमाई मोठी ! (भाग-२)

तज्ज्ञांच्या मतानुसार, आरईआयटी हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय ठरण्यासाठी करामधूनही सवलत दिली पाहिजे. यासंबंधीच्या नव्या मसुद्यातही करविषयक गुंतागुंत कमी झालेली नाही. ही गुंतागुंत सोडविणे आवश्‍यक आहे. असे असले तरी आरईआयटी गाइडलाइन्स प्रत्यक्षात आल्यानंतर भारतात रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणूक वाढेल. याअंतर्गत व्यावसायिक रिअल इस्टेट प्रकल्पांना फायदा होईल. चांगल्या डिस्क्‍लोजरमुळे पारदर्शकता वाढेल आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांवर कर्जाचा भार वाढणार नाही.

– कमलेश गिरी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)