गुंतवणूक क्षेत्रातील काही नवे दखलपात्र बदल

जगाची अर्थव्यवस्था सुधारत आहे, अशी काही लक्षणे दिसत असल्याने जगभरातील भांडवली बाजार गेले काही दिवस वाढत आहेत. आशियातील भांडवली बाजार तर गेल्या शुक्रवारअखेर सतत 11 दिवस वाढत होते.
पभारतीय शेअरबाजारही सतत सहा दिवस चढता राहिला. मात्र गुरुवारी तो खाली आला. अर्थात त्याच आठवड्यात सेन्सेक्‍सने36 हजारांचा उच्चांक केला तर निफ्टीने 11 हजारांचा उच्चांक केला.


बॅंकांचे एनपीए सतत वाढत असल्याने काळजी व्यक्त केली जात आहे, कारण ते 9.5 लाख कोटींवर गेले आहेत. हे प्रमाण जून 2017 अखेर एकूण कर्जांच्या 12.6 टक्के होते. मात्र आता अनेक उपाययोजना हाती घेतल्यामुळे सप्टेंबरअखेर ते 12.2 टक्के इतके खाली आले आहे.


व्हॉटस अॅप या अतिशय लोकप्रिय अॅपच्या माध्यमातून डिजिटल व्यवहार शक्‍य होणार आहेत. त्याची अधिकृत घोषणा फेब्रुवारीअखेर होण्याची शक्‍यता आहे. फेसबुक कंपनीच्या मालकीचे असलेले व्हाटस अॅप सध्या 20 कोटी भारतीय नागरिक वापरतात, त्यामुळे डिजिटल व्यवहाराच्या दृष्टीने ही मोठी झेप असेल.


बिटकॉईनच्या खरेदी विक्री व्यवहाराला सरकारची मान्यता नसल्याने आणि त्याचा वापर हवाला व्यवहारांसाठी केला जात असल्याचे लक्षात आल्याने स्टेट बॅंक ऑफ इंडिया, एचडीएफसी, आयसीआयसीआय, एक्‍सिस, येस बॅंक या प्रमुख बॅंकांनी बिटकॉईन एक्‍स्चेंजचे व्यवहार थांबविले आहेत. भारतात असे 10 एक्‍स्चेंजेस असून त्यांनी अशा व्यवहारातून 40 हजार कोटी रुपये कमावले, असा अंदाज आहे.


निफ्टीने अवघ्या सहा महिन्यांत 10 हजार वरून 11 हजारवर झेप घेतली, यात पाच कंपन्यांचा वाटा प्रमुख आहे. त्यात टीसीएस, एचडीएफसी बॅंक, रिलायन्स इंडस्ट्री, मारुती सुझुकी आणि ओएनजीसी या कंपन्याचा समावेश आहे. या कंपन्यांच्या शेअर किंमतीत अनुक्रमे 34.48, 56.77, 93.57, 64.80 आणि 3.73 टक्के वाढ झाली आहे. या सर्व कंपन्या यापुढेही चांगली कामगिरी करतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.


म्युच्युअल फंडांत वाढलेली गुंतवणूक लक्षात घेता एलआयसी म्युच्युअल फंड आणि एचडीएफसी सेक्‍युरिटीने दररोज गुंतवणूक करण्याची योजना सुरू केली आहे. एसआयपी म्हणजे महिन्याला विशिष्ट रक्कम म्युच्युअल फंडात गुंतविणे, असे म्हटले जाते; पण आता ही सुविधा दररोज उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुट्टी नसलेले 22 दिवस गुंतवणूकदार म्युच्युअल फंडात दररोज गुंतवणूक करू शकतील. दररोज किमान 300 रुपयांची गुंतवणूक त्यासाठी करावी लागेल आणि एलआयसीचे पाच फंड त्यासाठी उपलब्ध असतील.एलआयसी म्युच्युअल फंडाकडे सध्या 23 कोटी रुपये दर महिन्याला एसआयपीच्या मार्गाने येतात, त्यात या नव्या सोयीमुळे वाढ होईल, असा अंदाज आहे.एचडीएफसी सेक्‍युरिटीच्या फंडांत मात्र दररोज किमान 500 रुपयांची एसआयपी करावी लागेल. या सोयी ऑनलाईन पद्धतीने गुंतवणूक करणाऱ्यांच्या सोयीच्या आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)