गुंतवणूक करण्यास उशीर केला तर उद्दीष्ट गाठणे कठीण…(भाग-१)

गुंतवणूकदार आपल्या उद्दीष्टानुसार गुंतवणुकीचे नियोजन करतात परंतु गुंतवणूक करण्यास विविध कारणांमुळे विलंब होते. असा विलंब उद्दीष्ट गाठण्यासाठी जादाची रक्कम खिशातून घेऊन जातो.

गुंतवणूक करण्यासाठी जर कोणत्याही कारणास्तव विलंब झाला तर त्याची किंमत निश्चितच जास्तीची मोजावी लागेल. जर योग्य कालावधीत व लवकरात लवकर गुंतवणुकीस सुरवात केली तर उद्दीष्टांची पूर्तता करणे वेळेत व कमी रकमेत शक्य होते. दीर्घकालीन उद्दीष्ट जसे की, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, निवृत्तीसाठी किंवा मुलांच्या लग्नासाठी मोठी रक्कम उभी करण्याची गरज अशा प्रकारच्या अनेक उद्दीष्टांसाठी गुंतवणुकीची सुरवात शक्य तितक्या लवकर व योग्य गुंतवणूक प्रकारात करणे आवश्यक आहे. जर तसे केले नाही तर वरील उद्दीष्टांसाठी लागणारी आवश्यक रक्कम उभारण्यासाठी गुंतवणुकदाराला स्वतःच्या बचतीतून जादाची रक्कम गुंतवणुकीसाठी द्यावी लागेल.

आपण याबाबतचे एक उदाहरण पाहू…

जर पालकांनी आपल्या दोन वर्षे वयाच्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी गुंतवणुकीचे नियोजन ठरवले आणि त्यासाठी लागणारी रक्कम रु. दहा लाख आज द्यावी लागत असेल आणि जर महागाईचा दर १० टक्के प्रतिवर्ष या वेगाने वाढत असेल तर मुलाच्या वयाच्या १८ व्या वर्षी म्हणजेच (सोळा वर्षानंतर) याच शिक्षणासाठी साधारणपणे ४६ लाख रुपयांची गरज भासणार आहे. पालकांकडे १६ वर्षे म्हणजेच १९२ महिने गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत. या काळामध्ये ४६ लाखांची रक्कम उभी करण्यासाठी दरसाल दरशेकडा या दराने किमान १२ टक्के परतावा जर गुंतवणुकीतून निर्माण होणार असेल तर मासिक रु. ८,४१६ ची गुंतवणूक पालकांना मुलासाठी करावी लागणार आहे. जेणेकरून त्यांची आवश्यक रक्कम या गुंतवणुकीतून उभी राहणार आहे.

जर वरील उदाहरणात पालकांनी तीन वर्षाचा उशीर केला म्हणजेच मुलगा पाच वर्षाचा झाल्यानंतर गुंतवणुकीला सुरवात केली तर पालकांकडे फक्त १५६ महिने एवढाच कालावधी गुंतवणुकीसाठी शिल्लक राहतो. या काळात ४६ लाख रुपयांची उभारणी करण्यासाठी दरमहा १२,८४१ रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. हाच गुंतवणुकीचा निर्णय आणखी पुढे ढकलला गेला तर मुलाच्या वयाच्या १२ व्या वर्षी गुंतवणुकीला सुरवात केली तर पालकांना रु. ४४,३५१ प्रति महिना गुंतवणूक करावी लागेल. हीच गुंतवणूक मुलाच्या वयाच्या १५ व्या वर्षी सुरु केली तर रू. १,०६,००० प्रतिमाह गुंतवल्यानंतर रू. ४६ लाखांची रक्कम जमा होईल.

गुंतवणूक करण्यास उशीर केला तर उद्दीष्ट गाठणे कठीण…(भाग-२)

चक्रवाढ व्याजाचे सर्वोत्तम फायदे गुंतवणुकीसाठी जास्तीत जास्त कालावधी दिल्यावर निश्चित मिळतात. वर उल्लेख केलेल्या सर्व दीर्घकालीनउद्दीष्टांसाठी गुंतवणूकदाराने लवकरात लवकर गुंतवणुकीचे नियोजन करून गुंतवणुकीस सुरवात करणे आवश्यक आहे. आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मदतीनेच पैशांची योग्य बचत, योग्य गुंतवणूक प्रकारात करणे हे मात्र अत्यंत आवश्यक आहे. मोठ्या रकमेची उभारणी करण्यासाठी मोठ्या कालावधीपर्यंत गुंतवणूक करत राहणे व सातत्याने शिस्तबद्ध पद्धतीने त्यात भर घालत राहणे आवश्यक असते. असे करताना छोट्या छोट्या रकमेतून आवश्यक असणाऱ्या मोठ्या रकमेची निर्मिती दीर्घकालीन गुंतवणुकीतील नियोजनातून सहज शक्य होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)