गुंतवणूकदार 20.70 लाख कोटींनी श्रीमंत

  सरलेल्या आर्थिक वर्षात शेअर निर्देशांकांत 11.30 टक्‍क्‍यांनी वाढ

मुंबई  -सरलेल्या आर्थिक वर्षात निर्देशांकांनी अखेरच्या महिन्यात चांगलात फटका खाल्ला असला तरी या वर्षात निर्देशांक 11.30 टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. त्यामुळे भारतीय शेअरबाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या मूल्यात 20.70 लाख कोटी रुपयांची भर पडली आहे.

31 मार्च 2017 रोजी मुंबई शेअरबाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजारमूल्य 121.24 लाख कोटी रुपये होते. ते आता 142.24 लाख कोटी रुपये झाले आहे. राजकीय स्थिती स्थिर असल्यामुळे आणि सरकारने काही सुधारणा केल्यामुळे या वर्षाच्या सुरुवातीच्या काळात निर्देशांकांत भर पडत गेली होती. मात्र, या महिन्यात सुरू झालेले व्यापारयुद्ध, बॅंकांतील घोटाळे आणि तूट यामुळे निर्देशांकांत दहा टक्‍क्‍यांपर्यंत घट झाली होती. गेल्या दोन दिवसांत शेअरबाजार निर्देशांक चांगलेत वाढले होते. मात्र, सरकारने आज तूट वाढल्याची आकडेवारी जाहीर केल्यानंतर निर्देशांक कमी झाले. बुधवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 205 अंकांनी कमी होऊन 32968 अंकांवर बंद झाला तर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टीही 70 अंकांनी कमी होऊन 10113 अंकांवर बंद झाला.

काल देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 2172 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. त्याचबरोबर परदेशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 1063 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. त्यामुळे काल शेअरबाजार निर्देशांक वाढले होते. आज जरी निर्देशांकांत घट झाली तरी सरलेल्या आठवड्यात सेन्सेक्‍स 372 अंकांनी तर निफ्टी 155 अंकानी वाढला. गुरुवारी आणि शुक्रवारी बाजारांना सुट्टी आहे. त्यामुळे कामकाज सोमवारीच सुरू होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आज मोठे व्यवहार टाळल्याचे बोलले जाते.

हिंदुस्थान ऍरोनॉटिक्‍सच्या कामगिरीवर गुंतवणूकदारांना फारसा भरवसा आहे असे दिसत नाही. आज या कंपनीचे शेअर जेव्हा बाजारात नोंदले गेले तेव्हा त्यांची किमत 7 टक्‍क्‍यांनी कमी झाली. या कंपनीच्या आयपीओलाही गुंतवणूकदारांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे एलआयसीने शेवटी बाजारात उतरण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जाते. कंपनीचे बाजारमूल्य साधारणपणे 38969 कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)