गुंड श्‍याम दाभाडे एन्काऊंटरची चौकशी होणार

तक्रार, माहिती देण्याचा आजचा अखेरचा दिवस, प्रांत गाढे चौकशी अधिकारी

महाळुंगे इंगळे – पुणे जिल्ह्यातील वरसुबाई डोंगरावर खेड व मावळ तालुक्‍यातील तळपेवाडी हद्दीत आंभुच्या निर्जन जंगलात कुख्यात गुंड श्‍याम रामचंद्र दाभाडे (मूळ रा. कोठेश्वरवाडी, ता. मावळ) आणि त्याचा साथीदार धनजंय प्रकाश शिंदे उर्फ तांबोळी (मूळ रा. वारंगवाडी आंबी, ता. मावळ) या दोघांचा दि. 29 नोव्हेंबर 2016 रोजी पोलीस चकमकीत मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी होणार आहे. ज्यांना कोणाला श्‍याम दाभाडे याच्या विरोधात तक्रारी अथवा माहिती द्यावयाची असल्यास त्यांनी शनिवारी (दि. 20) सायंकाळी पाच वाजेपर्यंत देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याकामी खेडचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत सुनील गाढे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या श्‍याम दाभाडे याच्याभोवती तळेगाव दाभाडेचे माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे माजी तळेगाव शहराध्यक्ष सचिन शेळके यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन तसेच गोळ्या झाडून खून करण्यात आल्यानंतर पोलिसांनी दाभाडे याच्यावर फास आवळला होता. शेळके हत्या श्‍याम दाभाडे याने केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले होते. त्यामुळे पोलीस श्‍यामचा कसून शोध घेत होते. खेड तालुक्‍यातील वरसुबाई देवी डोंगर परिसरात श्‍याम दाभाडे असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने त्याचा पाठलाग करून श्‍याम यास शरण यायला सांगितले. यावेळी दाभाडेने पोलिसांवर 9 राऊंड फायर केले. त्यानंतर प्रत्युत्तरा दाखल पोलिसांनी पाच राऊंड फायर केले. त्यात गुंड श्‍याम दाभाडे याच्यासह त्याचा साथीदार धनंजय शिंदेही ठार झाला होता. श्‍याम दाभाडेकडे 4 पिस्तूल, एक कट्टा आणि 42 राऊंडस आणि अनेक मोबाईल मिळून आले होते.

श्‍याम दाभाडे व धनंजय शिंदे यांच्या मृत्युबाबत चौकशी करण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी पुणे यांनी खेडचे प्रांत सुनील गाढे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. या दोघांच्या मृत्यू कारणासंबधी, पोलीस चकमक गोळीबारासंदर्भात चौकशी कामी ज्यांना कोणाला अथवा संघटनेस किंवा संस्थेस तक्रार अथवा माहिती द्यावयाची असेल त्यांनी राजगुरुनगर (ता. खेड) येथे वाडा रस्त्यावरील खेडचे उपविभागीय (प्रांत) कार्यालयात शनिवारी (दि. 20) सायंकाळी 5 वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी कार्यालयीन वेळेत लेखी अथवा तोंडी माहिती द्यावी. किंवा समक्ष हजर राहून सादर करावी, असे आवाहन चौकशी अधिकारी तथा उपविभागीय न्यायदंडाधिकारी सुनिल गाढे यांनी केले आहे.

* अशी आहे श्‍याम दाभाडे याची पार्श्वभूमी –
तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या हत्या प्रकरणात गुंड श्‍याम दाभाडे मुख्य आरोपी होताच. मात्र, शेळके यांच्या हत्येसह श्‍याम दाभाडे याच्यावर आणखी 3 हत्येचे गुन्हे, 3 हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे, तसेच अपहरण, खंडणी आणि दरोडा असे एकूण 22 गुन्हे पुणे जिल्ह्यात आणि अन्यत्र अनेक पोलीस ठाण्यात दाखल होते. तळेगाव, मावळ, चाकण परिसरात गुंड श्‍याम दाभाडे याची प्रचंड दहशत होती. सुडाने पेटलेल्या दाभाडे याने काही जणांना संपविण्याचा विडा उचलला होता. दिवसा ढवळ्या खुनाचे थरारक प्रकार करून तो वेषांतर करून पुढील काही महिने जंगलात वास्तव्य करायचा. त्यामुळे सहजपणे तो पोलिसांना गुंगारा देत असे. चाकण एमआयडीसीतील काही कारखानदारांना खंडणी मागितल्याचे दाभाडे याच्यावर चाकण पोलिसांत गुन्हे दाखल होते. चाकण पोलिसांनी त्याच्यावर 2015मध्ये मोक्का अंतर्गत कारवाईही केली होती. अखेरीस पुण्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) व चाकण पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष गिरीगोसावी, उपनिरीक्षक महेश मुंडे आदींच्या पोलीस पथकाने वरसुबाई जंगलात त्याला दि. 29 नोव्हेबर,2016 रोजी पहाटे घेरले;.मात्र, त्याने पोलिसांवर तब्बल 9 राउंड फायर केल्याने उडालेल्या चकमकीत श्‍याम दाभाडे याच्यासह त्याचा साथीदार धनंजय शिंदे हे जागीच ठार झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)