गुंठामंत्र्यांना पाहिजे शस्त्र परवान्याचा ‘घोडा’

File Photo

स्वसंरक्षण की क्रेझ ?


पोलिसांकडे शेकडोने येतात अर्ज

पुणे- शहरात शस्त्र परवान्यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या शेकडोच्या घरामध्ये आहे. यामध्ये सर्वाधिक मागणी ही गुंठा मंत्र्यांकडून होताना दिसते. गुंठा मंत्र्यांनी एखादी नवीन बांधकाम साईट सुरू केली, की ते बांधकाम व्यावसायिक म्हणून शस्त्र परवान्यासाठी अर्ज करतात. मात्र, गरज असेल अशा व्यक्तींनाच पोलीसांकडून शस्त्र परवाना देण्यात येतो. मागील वर्षी 43 जणांना शस्त्र परवान्याचे वाटप करण्यात आले. यापैकी 19 जण खेळाडू होते.

स्वसंरक्षणासाठी पाहिजे परवाना
शस्त्र बाळगणे ही संरक्षणाची गरज असण्यापेक्षा क्रेझ म्हणून त्याकडे जास्त कल आहे. बडे व्यापारी, सराफ, बांधकाम व्यावसायिक, राजकीय नेते यांच्याकडून स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवान्याला जास्त मागणी आहे. तर दुसरीकडे खेळाडू जे रायफल शुटिंग क्रीडा प्रकाराशी संबंधित आहेत, त्यांच्याकडून परवान्यासाठी अर्ज केले जातात. खेळाडूंची गरज लक्षात घेऊन त्यांना शस्त्र परवाना दिला जातो. मात्र इतरांना तो देताना सर्व बाबींची तपासणी केली जाते.

सर्व बाजूंनी होते चौकशी
संबंधित व्यक्तीला खरंच स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवान्याची गरज आहे का, हे तपासले जाते. यापूर्वी त्याला कोणाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे का? त्याच्यावर हल्ला झाला आहे का? किंवा हल्ला होण्याची शक्‍यता आहे का? शस्त्राचा गैरवापर केला जाणार नाही ना? अशा अनेक बाबींचा विचार केला जातो.

सहजासहजी मिळत नाही शस्त्रपरवाना
शस्त्र परवान्याची फाईल पोलीस स्टेशन, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणी त्यानंतर पोलीस आयुक्त कार्यालयात एक दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शेरे मिळाल्यावर पुढे पोलीस आयुक्तांच्या टेबलवर जाते. शस्त्र परवान्यासाठी आलेल्या फाईलवर निर्णय घेण्यासाठी पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होते. यानंतर शस्त्र परवाना मंजुरीचा निर्णय होतो. यासर्व प्रक्रियेतून एखाद-दुसऱ्या व्यक्‍तीच शस्त्र परवाना मिळण्यास लायक ठरतो. यामुळे शेकडोने अर्ज येत असले, तरी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्‍याच व्यक्तींना शस्त्र परवाना दिला जातो.

बांधकाम साइट सुरू होताच अर्ज
उपनगरांमध्ये जमिनींना मोठा दर मिळू लागला आहे. यामुळे ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत, अशा व्यक्ती स्वत: बांधकाम व्यावसायिक झाल्या आहेत. हे छोटे-मोठे बांधकाम व्यावसायिक हातात पैसा खुळखुळू लागल्यावर उंची गाड्या, दागिने घेण्याबरोबरच राजकारणातही सक्रीय होतात. सार्वजनिक जीवनात वेगळे दिसावे म्हणून गरज नसतानाही त्यांच्याकडून शस्त्र परवान्यासाठी अर्ज केले जातात. ज्यांच्याकडे शस्त्र परवाना आहे, अशा व्यक्ती तर हे शस्त्र मुद्दाम लोकांच्या नजरेस पडेल अशा पद्धतीने बाळगतात. तर युवा पिढीतील गुंठामंत्री किंवा राजकीय कार्यकर्ते चारचाकी वाहनाच्या बोनेटवर शस्त्र ठेऊन त्याचे प्रदर्शन करतात.

शस्त्र फक्त मिरवण्यापुरतेच
शस्त्र परवाना घेऊन शस्त्र घेतलेल्यांपैकी अनेकांना शस्त्र वापरताही येत नाही. परवान्यासाठी बंधनकारक म्हणून दोन दिवसांचे ‘ट्रेनिंग’ घेतलेले असते. त्यानंतर वर्षानुवर्षे शस्त्र फक्त देखावा म्हणूनच मिरवले जाते. शस्त्र वापरण्याची गरजही कधी पडत नाही. यामुळे शस्त्र फक्त मिरवण्यापुरतेच वापरले जाते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)