गुंजवणी प्रकल्पाची निविदा एका आठवड्यात : विजय शिवतारे

पुणे- शेतीसाठी बंद पाईप लाईनद्वारे धरणातून पाणी उपलब्ध करून देणारा गुंजवणी प्रकल्पाला अंतिम मान्यता प्राप्त झाली असून, एका आठवड्यात निविदा काढण्यात येणार आहे. तर, निविदा काढल्यानंतर दोन वर्षांत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. हा प्रकल्प केंद्र सरकारच्या पीआयएन (पाइप इरिगेशन नेटवर्क) या धोरणानुसार साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 1 हजार 313 कोटी रुपये खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाने घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.
गुंजवणी हा पावणेचार टीएमसीचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाद्वारे भोर, वेल्हा, पुरंदर या तीन तालुक्‍यांमधील 21 हजार 392 हेक्‍टर क्षेत्राला पाणी मिळणार आहे. वर्षातील 365 दिवस चोवीस तास विजेशिवाय उच्चदाबाने प्रत्येक शेतकऱ्याला सहा एकरच्या क्षेत्रापर्यंत या प्रकल्पातून पाणी मिळणार आहे. या प्रकल्पाला केंद्र शासनाने तत्त्वत: मंजुरी दिली असून अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय जल आयोगाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. आयोगाकडे दोनवेळा सादरीकरण करण्यात आले असून प्रकल्पाला अंतिम मंजुरी प्राप्त झाली आहे. त्यानुसार येत्या आठवड्यात निविदा प्रक्रिया राबवून दोन वर्षांत प्रकल्पाचे काम पूर्ण करू, सांगून ते म्हणाले, केंद्र सरकारच्या पीआयएन (पाइप इरिगेशन नेटवर्क) या धोरणानुसार हा प्रकल्प साकारल्याने केंद्राकडून त्याला 90 टक्के अनुदान मिळणार आहे. गेली सतरा वर्षे हा प्रकल्प प्रलंबित होता. केवळ आठ टक्के एवढेच काम झाले होते. प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर गेल्या दीड वर्षात पाणी अडवून कमीत कमी वेळेत धरणाचे काम दरवाज्यांसह पूर्ण करण्यात आले आहे. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे. धरणातून पारंपरिक पद्धतीने पाणी कालव्याद्वारे वितरित करण्यात येते. मात्र, शासनाच्या नव्या धोरणानुसार कालवे रद्द करून बंद जलवाहिनीच्या माध्यमातून पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातून सर्व निकषांवर आधारित ही पहिली योजना असून या योजनेअंतर्गत देशातील हा पहिलाच प्रकल्प आहे, असेही शिवतारे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)