गीता सार

    नीती अनीती

स्थळ – युद्धभुमी 2019, वेळ – गीता सार ऐकण्याची

“टु बी ऑर नॉट टू बी? करावे की न करावे? दॅट इज दि क्वेश्‍चन. कुणी घर देतं का घर…’ असा आर्त टाहो फोडून कसेबसे एक हक्‍काचे घर मिळवल्या नंतर आता खरी लढाई अस्तित्वाची सुरू होणार ही कल्पना सिंधुदुर्गच्या अर्जुनाला आल्यामुळे त्याने पुन्हा एकवार आपले धनुष्य काढले. एखादा बाण धनुष्यावर चढवावा या इराद्याने भात्यात हात घातला. पण हाय रे कर्मा, एक बाण सापडेल तर शप्पथ. आता युद्ध करावे तर कशाने व कुणाशी, हा यक्षप्रश्न उपस्थित झाल्याने तो गलितगात्र झाला. त्याची ही अवस्था बारामतीच्या कृष्णाने हेरली व तो मिश्‍किलपणे हसला. सिंधुदुर्गचा अर्जुन गुडघ्यावर बसला व बारामतीच्या कृष्णाला भक्तीभावाने वंदन केले.
‘हे मधुसुदना, काय करावे? विजयातही पराभव जाणवतो व पराभवातही विजयश्री मिळाल्याचा भास होतो. हे मुरलीधरा, काय ही अवस्था?’
‘हे वत्सा, आता खऱ्या अर्थाने तू परिपक्व झाला आहेस. उठसूठ धनुष्य उचलून नको तिथे नको त्याला बाण मारण्याची तुझी जुनी खोड कमी झाल्याचे बघून आनंद झाला. आता बघ तुझ्या जवळ बाणही शिल्लक नाही, बरं बाण ही मी उधार दिला असता; पण बाण मारावा तरी कुणास हा प्रश्न तुला नक्कीच पडला असणार.’
‘मनकवडा आहेस मुरलीधरा. आता कुणाशीही वितुष्ट घेण्यास मन धजावत नाही. भविष्यात आता कोण कधी कामी येईल व कुणाची मदत घ्यावी लागेल, याचा नेम नाही. त्यामुळे मनासारखे वागणे कठीण होऊन बसले आहे मुरलीधरा.’
‘हे अर्जुना, याला चक्रव्युव्हात अडकणे असे म्हणतात. खऱ्या महाभारतात ही वेळ अभिमन्यु म्हणजेच अर्जुनपुत्रावर आली होती. मात्र हे लचांड इथे तुझ्या मागे लागलेय, असे दिसते.’
‘परंतु हे चक्रव्युव्हाचे लचांड चिरंजीवांमुळेच लागले आहे ना? मार्ग सुचवावा मुरलीधरा.’
‘हे कौंतेया, आता युद्धाचा विचार सोडून दे, तह करायची सवय लाव.ते गांडिव धनुष्य काही काळ तुझ्या मुळगावी म्हणजे कोकणात ठेवून ये.आता फक्त या चक्रव्युव्हाचा विचार करं! असे बघ, तुझ्यामुळे दुखावलेल्यांनी आता एक डाव टाकला आहे. नाणार प्रकल्प तुझ्या एरियात सुरू करण्याची घोषणा हीच चक्रव्युव्हाची थीम आहे. प्रकल्पाला तू विरोध केलास तर तू विकासाचा शत्रु, अशी इमेज तयार होईल. प्रकल्पाचे स्वागत केलेस तर निसर्ग सौंदर्याचा मारक, कोकणचा खलनायक अशी तुझी छबी तयार होईल. म्हणजे चीत पण त्यांची व पट पण त्यांचीच. तुला स्टॅंड घेणे जड जाणार आणि हाच आहे चक्रव्युह.’
‘मधुसुदना, हे काम येरागबाळ्याचे नव्हे. यामागे कुणी महागुरू, विचारावंत, अनुभवी राजकारणी आहे यातं शंका नाही. चक्रव्युव्ह माझ्याच नशिबी का? कोण टपले आहे माझ्या वाईटावर?’
बारामतीचा कृष्ण मंदपणे हसतो ‘अर्जुना, सारेच तर टपले आहेत. किती छळलेस सर्वांना तू? जीव नकोसा करून टाकायचास. सर्वांनी मिळून गेम केला रे तुझा. सांभाळ. आणि या मागचा सुत्रधार कोण याचा विचार करीत बसू नको, गुरू आहे तो सर्वांचा. काय?’
बारामतीचा कृष्ण रथावर आरूढ होतो व क्षणार्धात रथ बारामतीच्या दिशेने धावू लागतो .

– हिमांशु


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)