गीता धार्मिक नाही, शैक्षणिक संस्थांमध्ये तिचे वाटप करणे चूक नाही – विनोद तावडे

मुंबई – भगवत गीता हा धार्मिक ग्रंथ नाही. ती एक जीवन पद्धती आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये गीता वाटप करणे चुकीचे नाही असे प्रतिपादन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले आहे. अन्य धर्मियांची पुस्तके सुद्धा शैक्षणिक संस्थांमध्ये वितरीत करता येऊ शकतील पण ती फूकट उपलब्ध झाली पाहिजेत असेही त्यांनी नमूद केले आहे.

गिरगाव येथे सुरू करण्यात आलेल्या भक्तीवेदांत विद्यापीठ संशोधन केंद्राचे तावडे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की आज कोठेही शैक्षणिक संस्थांमध्ये गीता वाटण्यास सुरूवात केली की भाजप शिक्षणाचे भगवेकरण करीत असल्याची टीका केली जाते. प्रसार माध्यमांमधूनच हा चुकीचा प्रचार केला जातो असे ते म्हणाले. त्यामुळे आज गीतेचे वाटप करणे हे एक पाप ठरले आहे आणि ते जातीयतेचे लक्षण मानले गेले आहे. आपण या मानसिकतेतून कधी बाहेर येणार असा सवाल त्यांनी केला. आज अगदी पहिलीतल्या मुलालाही आयुष्यातल्या अनेक बाबी गीतेच्या माध्यमातून शिकवता येऊ शकतील असे ते म्हणाले. गीता, उपनिषद आणि वेद हे काही धार्मिक ग्रंथ नव्हेत. ते तत्वज्ञान आणि वैज्ञानिक आधारावरील लिखाण आहे. हे लिखाण केवळ मंदिरांपुरतेच मर्यादित राहता कामा नये, तर आपल्या जीवन पद्धतीचा ते एक भाग असले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली.

जर कुराण आणि बायबलच्याही प्रती मोफत मिळाल्या तर त्याहीं शैक्षणिक संस्थांमधून वितरीत करता येऊ शकतील असेही त्यांनी यावेळी नमूद केले. भिवंडीतील भक्तीवेदांत ट्रस्टने गीतेच्या मोफत प्रती उपलब्धकरून दिल्या असून त्यांनी त्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वितरीत करण्याची इच्छा व्यक्‍त केली. त्यानुसार आम्ही शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना त्यासाठी मदत करण्याची सुचना केली होती.

प्रत्यक्ष गीतेचे वाटप गीता भक्तच करणार होते. पण त्यावरून नाहक वादंग माजवले गेले असे त्यांनी नमूद केले. आजच्या युवापिढीच्या शिक्षणाच्या संबंधात बोलताना ते म्हणाले की आजच्या युवकाला सध्याच्या पद्धतीत केवळ माहिती पुरवली जाते. पण या युवापिढीला वेदांच्या संबंधात सखोल ज्ञान दिले गेले पाहिजे त्याद्वारे हे युवक साऱ्या जगात बदल घडवू शकतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)