गिलगीट-बाल्टिस्तानवर पाकिस्तान पेक्षा भारताचा दावा अधिक प्रबळ- राम माधव

भाजप नेते राम माधव यांचा दावा 

नवी दिल्ली: गिलगीट-बाल्टिस्तान या क्षेत्रावर पाकिस्तानपेक्षा भारताचा दावा अधिक प्रबळ आहे असे प्रतिपादन भाजपचे नेते राम माधव यांनी केला आहे. या भागावरील एका पुस्तकाच्या काल झालेल्या प्रकाशन सोहोळ्यात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ते म्हणाले की जम्मू आणि काश्‍मीरचे संस्थान जेव्हा भारतात विलीन झाले त्यावेळी या संस्थानाचा भाग असलेला गिलगीट आणि बाल्टिस्तान हा प्रदेश ब्रिटीश लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांनी खोडसाळपणे आणि बेकायदेशीरपणे पाकिस्तानच्या ताब्यात दिला आहे. विलिनीकरणाच्या आधी गिलगीट आणि बाल्टिस्तान हा प्रदेश जम्मू काश्‍मीर संस्थानाचा अविभाज्य भाग होता ज्यावेळी या संस्थानचे प्रमुख राजा हरिसिंग यांनी भारतात हे संस्थान विलीन करण्याचा निर्णय घेतला त्याच वेळी गिलगीट आणि बाल्टिस्तान भारतात विलीन होणे अपेक्षित होते पण तसे झाले नाही. तत्कालिन काही ब्रिटीश अधिकाऱ्यांनी परस्पर हा भाग पाकिस्तानात विलीन केला असे ते म्हणाले. आजही आम्ही हा भारताचाच भाग मानतो असे ते म्हणाले. आज या भागाला पाकिस्तानने आपला पाचवा प्रांत म्हणून मान्यता देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत त्याला भारताने प्रखर विरोध दर्शवला आहे.

1935 साली सोव्हीएत रशियाच्या प्रभावामुळे आणि त्यांच्याकडून ब्रिटीश साम्रज्यावर होणाऱ्या संभाव्य हल्ल्याच्या भीतीने ब्रिटीशांनी 60 वर्षांच्या लीजवर गिलगीट, बाल्टिस्तान हा प्रांत घेतला होता. पण नंतर त्यांनी हा लीज करार मोडला. त्यावर पर्यायी व्यवस्था होई पर्यंत हा भाग लष्करी संरक्षण पुरवण्याच्या नावाखाली महाराजा हरिसिंग यांच्याकडून तत्कालिन ब्रिटीश अधिकारी डब्यु.ए. ब्राऊन आणि कॅप्टन ए. एस. मॅथीसन यांच्या ताब्यात दिला. पण त्याच सुमाराला स्थानिक लोकांनी महाराजा हरिसिंग यांच्या विरोधात बंड सुरू केले. त्यानंतर 2 नोव्हेंबर 1947 रोजी मेजर ब्राऊन यांनी हा भाग पाकिस्तानला जोडण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यानंतर पकिस्तानी लष्कर आणि अदिवासींनी त्या भागाचा ताबा घेतला. आज या भूमीचा वापर भारतावर हल्ले करण्यासाठी होतो आहे असे माधव यांनी निदर्शनाला आणून दिले.

वास्तविक हा भाग ब्रिटीशांनी लीजवर घेतल्यानंतर त्याचा ताबा नंतर त्यांनी महाराजा हरिसिंग यांच्याकडे दिला होता. त्यामुळे तो जम्मू काश्‍मीर संस्थांनचाच अधिकृत भाग बनला होता. आणि हे संस्थान भारतात विलीन झाल्यानंतर त्या भागाचेही भारतात विलीनीकरण होणे आवश्‍यक होते पण ब्रिटीशांनी तो परस्पर पाकिस्तानला दिला आहे. या भागात आता पाकिस्तान विरोधातही आवाज उठवला जात आहे पण पाक लष्कराने तेथे मोठ्या प्रमाणावर नरसंहार आणि अत्याचार करून तो भाग आपल्या कब्जात ठेवला आहे. तेथील मानवाधिकार उल्लंघनाबाबत आज कोणीही आवाज उठवत नाही अशी खंतही माधव यांनी यावेळी व्यक्त केली. आता आम्ही या प्रश्‍नात मोठे लक्ष घालण्याचे ठरवले आहे असेही राम माधव यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)