गिरीश बापटांनी घेतले अधिकाऱ्यांना फैलावर

प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बैठक : कामे धिम्यागतीने सुरू असल्याचे समोर

पुणे – नदीसुधार प्रकल्प आणि चोवीस तास समान पाणीपुरवठा हे प्रकल्प धिम्या गतीने सुरू असून ते वेळेत पूर्ण करण्याबाबत खासदार गिरीश बापट यांनी महापालिका आयुक्‍तांसह प्रमुख अधिकारी, प्रकल्प प्रमुख यांना शुक्रवारी फैलावर घेतले. तसेच, प्रकल्प पूर्ण न झाल्यास जबाबदारी निश्‍चित करून निलंबित करण्याचा इशाराही दिला.

महापालिकेतील प्रलंबित प्रकल्पांसंदर्भात बापट यांनी शुक्रवारी घोले रोड वॉर्ड ऑफिस येथे बैठक घेतली. याला महापौर मुक्‍ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृहनेते श्रीनाथ भीमाले, स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे, आयुक्‍त सौरभ राव यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.

जायकाऐवजी आता त्याला मुळा-मुठा सुशोभिकरण प्रकल्प अथवा योजना असे संबोधण्यासंबंधिच्या सूचना नुकत्याच केंद्रीय वने, हवामान बदल आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केल्या होत्या. त्यानुसार या प्रकल्पाचे, चोवीस तास समान पाणीपुरवठा योजना, एचसीएमटीआर या प्रकल्पांसंदर्भात बापट यांनी या बैठकीत चर्चा केली. भिमाले आणि डॉ. धेंडे यांनी या बैठकीविषयी माहिती दिली.

भैरोबानाला, नायडू, वारजे आणि खराडी येथे मैलापाणी शुद्धीकरण केंद्रासाठी चारशे कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा प्रस्ताव जायका कंपनीकडे रिव्हॅल्युएशनसाठी गेला आहे. या आठवड्यात त्यांच्याकडील परवानगी मिळून जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात या कामांचे जावडेकरांच्या हस्ते भूमिपूजन होईल, असे भिमाले यांनी सांगितले. ऑगस्टपर्यंत चारही कामांची सुरुवात केली जाणार आहे. या कामांचा दर दोन महिन्यांनी जावडेकर स्वत: आढावा घेणार असल्याचे भिमाले यांनी नमूद केले.

व्ही. जी. कुलकर्णी यांच्या नेतृत्त्वाखाली 11 अधिकाऱ्यांची नेमणूक
जायका प्रकल्पांतर्गत नदीपात्रात 48 शौचालये बांधण्यात येणार असून, त्यासाठी जागा निश्‍चिती करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महापालिकेतील पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांच्या नेतृत्त्वाखाली 11 अधिकारी नेमले आहेत. त्यावर महापालिका आयुक्‍तांचा अंकुश असणार आहे, अशी माहिती भीमाले यांनी दिली. चोवीस तास पाणी पुरवठा योजनेतील 82 पाणी साठवण टाक्‍यांपैकी सुमारे 65 टाक्‍यांचे काम सुरू झाले आहे. त्याचाही आढावा घेण्यात आला. उर्वरित 17 टाक्‍यांसंदर्भाती अडचणी सोडवण्यासाठी खास माणूस नेमून पाठपुरावा करावा, अशा सूचना बापट यांनी आयुक्‍तांना दिल्याचे भीमाले म्हणाले. मेट्रोच्या कामाचाही बापट यांनी आढावा घेतला. मेट्रोच्या कामाच्या स्पीडबाबत बापट यांनी समाधान व्यक्‍त केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)