गिरवी येथे बापलेकीचा निर्घृण खून

अटकेनंतर संशयित आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
फलटण,  (प्रतिनिधी) –
फलटण तालुक्‍यातील गिरवी येथे वडिलांसह दोन वर्षाच्या मुलीचा खून केल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी घडली. खूनप्रकरणी पोलिसांनी मृताच्या चुलतभावास अटक केली आहे. किरण उर्फ पंकज भुजंगराव कदम (वय 32) व कार्तिकी किरण कदम असे खून झालेल्या बाप लेकीचे नाव आहे. मात्र, खुनाच्या घटनेनंतर संशयित आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने त्याची प्रकृतीही चिंताजनक असल्याने त्याला फलटण येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
किरण उर्फ पंकज भुजंगराव कदम हे मुलगी कार्तिकीला घेऊन शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घराशेजारी असणाऱ्या शेतात गुरांसाठी मका आणण्यासाठी आपल्या दुचाकीवरुन गेले होते. मात्र, बराच वेळ होऊनही ते पुन्हा घरी परतले नाहीत. त्यामुळे घरातील व्यक्तींनी व नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, मक्‍याच्या शेतात शोध घेत असताना कुटुंबियांना रक्ताचे डाग आढळून आले. या प्रकारामुळे कुटुंबिय भांबावून गेले. मात्र शेतात किरण आणि कार्तिकी कुठेच आढळून आले नाहीत. शेवटी शेतात असलेल्या विहिरीत पाहिले असता किरण कदम व कार्तिकी या दोघा बापलेकीचा मृतदेह एका पोत्यात आढळून आला.
मुलीच्या तोंडात तिच्या अंगावरील टि शर्ट कोंबून तिचा गळा दाबून मृतदेह पोत्यात टाकण्यात आला होता. तर किरण यांच्या मानेवर व अंगावर वार आढळून आले. घटनेचे गांभीर्य ओळखून नातेवाईकानी तात्काळ फलटण ग्रामीण पोलिसांत संपर्क साधून घडल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत चौकशी केली असताना आकाश सदाशिव कदम (वय अंदाजे 19) यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यांच्याकडे माहिती विचारली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे अधिक चौकशीसाठी पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. प्रथम त्याने पोलिसांना चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांना आकाश कदम यांच्यावर दाट संशय आल्यानंतर पोलिसी हिसका दाखवताच त्याने एक कुऱ्हाड पोलिसांच्या स्वाधीन केली. यानंतर त्यास अटक करून घेऊन जात असताना संशयिताने विषारी कीटकनाशक प्राशन केले. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ संशयित आरोपीस फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
प्राथमिक उपचारानंतर त्याची प्रकृती बिघडल्याने त्यास फलटण येथील एका खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, फलटण उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अभिजित पाटील, फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदनाचे काम सुरू होते. या घटनेचा रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
मृत किरण कदम यांच्या पश्‍चात एक मुलगा, आई, वडील, पत्नी असा परिवार आहे. संशयित आकाश कदम हा त्यांच्या घराशेजारी राहत होता. घरगुती कारणातून त्याने दुहेरी हत्याकांड केल्याचे समजते. आकाश कदम हा आयटीआयचे लोणंद येथे शिक्षण घेत असून त्यांच्यावर यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समजते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)