गाव तेथे अभ्यासिका सुरू करावी

उमाजी नाईक ट्रस्टचे मुख्यमंत्री व ग्रामविकासमंत्र्यांना साकडे

नीरा- विद्यार्थी तसेच तरुण वर्गासाठी गावोगावी अभ्यासिका निर्माण केली जावी तसेच गावोगावी स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांनी युक्त असे ग्रंथालय उभे केले जावे, अशी मागणी नरवीर राजे उमाजी नाईक सामाजिक विकास ट्रस्टच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे. तसेच ट्रस्टने याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना पाठविले आहे.
आजकाल नोकरीच्या कमी होत चाललेल्या संधी आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर येणारे अर्ज यांचे व्यस्त प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तरुण रोजगाराच्या वाटा शोधत मोठी धडपड करताना दिसतात. भरतीसाठी विविध परीक्षा देतात. मात्र, त्यांना संदर्भ पुस्तके तसेच साहित्यासाठी पुण्या-मुंबई सारख्या शहरात जाऊन राहावे लागत आहे. पालक आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी पोटाला चिमटा घेऊन हा भार पेलत आहेत. अनेक तरुण-तरुणी हुशार असताना केवळ पुस्तके व साहित्यांच्या अभावी यशस्वी होत नसल्याने हे चित्र बदलण्यासाठी शासनाने पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
14व्या वित्त आयोगाचा निधी आता थेट पंचायतींना देण्यात येत आहे. ग्रामविकास आराखड्याच्या माध्यमातून गावातील अनेक विकास कामांचा समावेश पंचायतीकडून आराखड्यात केला जातो. त्याप्रमाणे या आराखड्यात अभ्यासिका व ग्रंथालयाचा समावेश केल्यास गावातील तरुणांना एक व्यासपीठ उपलब्ध होऊ शकते. राज्यात सुमारे 12 हजारांच्या वर ग्रंथालये आहेत. गेल्या काही वर्षांपासून नवीन ग्रंथालयांची नोंदणी प्रक्रिया बंद असल्याने देणगीच्या माध्यमातून अनेक जण नवीन ग्रंथालये सुरू करीत आहेत. त्यातच नोंदणीकृत असलेली अनेक ग्रंथालये लहान खोलीत असून केवळ रोजची वर्तमानपत्रे वाचण्यासाठी या ग्रंथालयांचा वापर होताना दिसत आहे. सध्या तरुणांना त्यांच्या ध्येयाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी विविध स्पर्धा परीक्षा, सर्व प्रकारच्या भरती संदर्भातील पुस्तकांचा ग्रंथालयात समावेश असणे आवश्‍यक आहे. मात्र, असे होताना दिसत नाही. त्यामुळे शासनाने नोंदणीकृत ग्रंथालयात भरतीच्या दृष्टीने पुस्तके व संदर्भ साहित्य पुरवावे तसेच नवीन ग्रंथालयांना नोंदणीची वाट मोकळी करून गावोगावी ग्रंथालय व अभ्यासिका तयार केल्या जाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
14व्या वित्त आयोगाच्या निधीतून शिक्षणासाठी ठराविक प्रमाणात निधी खर्च करावा असे आदेश राज्य शासनाने दिल्यावर अनेक अंगणवाड्या, प्राथमिक व माध्यमिक शाळांना ग्रामपंचायतींनी मदत केली. त्याप्रमाणे आता तरुणांना त्यांच्या ध्येयाप्रत घेऊन जाण्यासाठी तसेच माध्यमिक शाळेपासून वाचनाची व स्वनिर्मितीची आवड लागावी यासाठी गावोगावी अभ्यासिका व ग्रंथालय सुरू करण्याची मागणी ट्रस्टकडून करण्यात आली आहे.

  • आजचा तरुण देशाचे भविष्य आहे; परंतु नोकरी किंवा काम मिळविण्यासाठी त्याची प्रचंड धडपड सुरू असून केवळ योग्य मार्ग व पुस्तके मिळत नसल्याने अनेकांना अडचणी येत असल्याचे दिसल्यावर हा विषय शासनापर्यंत पोहोचवत आहे. वास्तविक, ग्रंथालय व अभ्यासिका शिक्षणाशी संबंधीत असल्याने त्यांच्या बांधणीसाठी व साहित्य खरेदीचा समावेश आराखड्यात करण्यास काहीच हरकत नाही. याविषयी ग्रंथालय संचनालयाशी पत्रव्यवहार करणार आहोत.
    – संजय चव्हाण, अध्यक्ष, नरवीर राजे उमाजी नाईक सामाजिक विकास ट्रस्ट, गुळुंचे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)