गावाजवळचा झरा अनमोलसा….

माझं गाव महाराष्ट्र-गोव्याच्या सीमेलगत. भारताच्या पश्‍चिम किनारपट्टीतलं जुन्या काळात सुंदरवाडी नावाने सुप्रसिद्ध असे. आताच्या सावंतवाडी तालुक्‍यात. हा महाराष्ट्रातील शेवटचा गोव्याला लागून असलेला तालुका. त्यामुळे आम्ही सीमा भागात राहणारे.

आमच्या गावाआधी बांदा हे ‘चांदा ते बांदा’ (चंद्रपूर ते बांदा) या म्हणण्याच्या पद्धतीमुळे तसे सर्वांना परिचित गाव. आपण गोव्यात जाताना आता नव्या महामार्गाने जातो. आधी जुन्या महामार्गावरून जाणाऱ्यांना आमची गावं माहीत असावीत.
जुन्या मुंबई – गोवा महामार्गाला (क्रमांक 124) लागून असलेल्या हाताकडे म्हणजेच कुंब्रल फाट्याकडून दोन वाटा जातात. तिथे डावीकडे धनगरवाडी आहे. अवघ्या 22 घरांची वस्ती.

-Ads-

पण तब्बल 22 घरं, घरं कसली धनगरांचे बसके वाडे आहेत. तिथे पक्की बांधलेली घरं मोजकीच बघायला मिळतात. संडास नाहीतच. बहुदा आमच्या घरात बांधलेला दुसरा किंवा तिसरा संडास असेल. जिथे घरगुती वापरासाठीची पाणीपुरवठ्याची टाकी नव्हती. मग संडासात ओतायला पाणी कुठून येणार?

कोकणात काय पाणी मुबलक आहे असे सगळे म्हणतात. तिथे जगताना याची दुसरी बाजू ठळकपणे मनावर कोरली गेली. बाहेरून दिसतं त्याहून जग खूप वेगळं आहे. या घरांसाठी एकच झरी आहे. तिथून सगळे पाणी भरून नेतात. फक्त पिण्यासाठीच नाही तर घरात आंघोळ करायला, वापरायला जेवढे पाणी लागेल तितके. मी सहज वाकून जात होते. हातात लहानसा म्हणजे तरी दीड लीटर पाणी बसेल असा तांब्या होता. आम्ही पाणी भरायला झरीवर गेलो होतो. (मी पुण्यात स्वारगेट पोलीस कॉलनीत लहानाची मोठी झाले. तिथेही पाणी टॅंकरने यायचे.) त्यामुळे गावी गेल्यावर शेतावरच्या घरी पाणी झरीवरून भरायचे. त्यात वावगं किंवा आपण वेगळे काही कष्ट घेतोय असं कधी वाटायचे नाही.

झऱ्याच्या पाण्याला धार किती? शब्दशः लहान लेकराची करंगळी एवढीच. उन्हाळा असेल तर पातळ ताट घेऊन पाणी तपेला, कळशी किंवा हंड्यात ओतावं लागतं. या धनगरवाडीवर राहणाऱ्यांच्या जगायला अत्यावश्‍यक अशा पाण्याची सोय करण्यात प्रशासन ढिम्म होतं. मोठेपणा नाही पण बाबांनी आमच्या शेतातील जागा देऊन पाण्याची टाकी उभारायला मोकळेपणाने मदत केली. आता घरोघरी पाण्याचा नळ आहे.

सुरुवातीला आमच्या शेतात जितकी रोपं लावली आहेत त्यांना जगवणारी झर म्हणून अजूनही ती आम्हाला प्यारी आहे. शेतात कामाला येणाऱ्यांसोबत आम्ही झरीवर जायचो. त्यांची मुलं लीलया एखादी कळशी, हंडा वरपर्यंत आणत. त्यावेळी आम्ही तो मोठा तांब्या भरून जपत जपत वरती यायचो. घरापर्यंत आलो की त्या तांब्यातलं पाणी पिऊन सावलीला बसायचो.

एका बिल्डिंगचा मजला चढावा इतकी आतमध्ये ही झर आहे. तिथून 15 मिनिटांनी माझं शेत येतं. नैसर्गिकपणे दगडांची ठेवण आहे. तेच ते जिने. वर्षानुवर्ष हे लोक तिथे जगत आहेत. या पाण्यामुळे कधीच कुठली साथ पसरल्याचे ऐकिवात नाही.

त्या गावाची तऱ्हाच न्यारी. आरोग्य केंद्र वेगळ्या गावात. शाळा अजून वेगळ्या गावात. तर रेशनिंग दुकानसुद्धा तिसऱ्या गावात. सरकारची कृपा आहे म्हणून लोक लढत सावरत एकमेकांना आधार देत तरीही शेती बागायती फुलवत आहेत. होय आम्ही कोकणचे आहोत.

– नम्रता देसाई 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)