गावागावांत वेअर हाऊस व कोल्ड स्टोरेज उभारणार

ना. सदाभाऊ खोत : शेतकरी मालाला योग्य भाव मिळण्यासाठी कृषी पणन व्यवस्थेत बदल

कराड – शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा आणि चांगले आर्थिक दिवस यावेत, यासाठी पणन व्यवस्था मजबूत करण्यासाठी भाजीपाला नियमन मुक्तीचा निर्णय शासनाने घेतला आहे. थेट ग्राहकांना माल विकण्यासाठी ग्राहक ते व्यवस्था निर्माण केली. यापुढे प्रत्येक गावात कोल्ड स्टोरेज, वेअर हाऊसेस व्हावेत, यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राज्याचे कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित यशवंतराव चव्हाण कृषी महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मोहनराव माने, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, आत्माचे संचालक अनिल बनसोडे, कृषी विस्तार संचालक विजय घावटे, विभागीय कृषी सहसंचालक दशरथ तांबोळी, जिल्हा कृषी अधिक्षक सुनिल बोरकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, रयत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, सातारा जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सहकार्याने कृषी विभागाने यावर्षीचे राज्यातले पहिले भव्य कृषी प्रदर्शन भरविले आहे. या प्रदर्शनातून ग्रामीण शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या घामातून पिकलेले धान्य जनतेला योग्य किंमतीत मिळावे, म्हणून धान्य महोत्सव सुरु केला आहे. तसेच गावोगाव अनेक शेतकरी आपल्या शेतीत अभिनव प्रयोग करतात. अशा प्रयोगांची देवाणघेवाण व्हावी. शेतीसाठीचे नवे तंत्रज्ञान कळावे, त्यापुढे जावून शेतकऱ्याला एक हक्काची बाजारपेठ मिळावी, या भुमिकेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे शासन या कृषी महोत्सवाकडे पाहते असे सदाभाऊ खोत यांनी यावेळी सांगितले.

शेतजमिनी अधिकाधिक पाण्याखाली याव्यात, यासाठी शासन जलयुक्त शिवार अभियान ही अतिशय महत्वाकांक्षी योजना आखली. मागेल त्याला शेततळे, पाण्याचा थेंब न थेंब वाचला पाहिजे, यासाठी मोठ्या प्रमाणात ठिंबकसाठी वर्षभर ऑनलाईन पध्दतीने अनुदान दिले जात आहे.

निर्यातीला चालना देण्यासाठी पणन मंडळाच्या माध्यमातून शासनाचे सातत्याने प्रयत्न सुरु असल्याचेही खोत यांनी यावेळी सांगितले. शेतीत उत्पादन वाढविण्यासाठी शेतीत गुंतवणूक वाढली पाहिजे, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमीच आग्रही आहेत. त्यातूनच मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे राज्यात झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यापुढे शेतकऱ्याला लागवड करण्यापूर्वीच त्या मालाची बाजारातील किंमत निश्‍चित कळेल, अशी व्यवस्था निर्माण होण्याची गरज असून असे झाले तर त्याला काय पिकवायचे आणि काय पिकवायचे नाही याचे नियोजन करता येईल. त्यातून नवयुवक शेतीकडे वळेल असे विचारही त्यांनी यावेळी व्यक्त केले. या कृषी प्रदर्शनाचे अतिशय भव्य आणि नियोजनबध्द आयोजन केल्याबद्दल जिल्हाधिकारी आणि प्रशासनाचे कौतुक केले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना एका छताखाली त्याची माल विकण्याच्या सुविधेबरोबर शेतीतले नवे तंत्रज्ञान, नवे प्रयोग, कृषी प्रक्रिया उद्योग एका छताखाली मिळणारा हा कृषी महोत्सव शेतकरी, ग्राहक यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकरी. बेरोजगार तसेच नव युवकांना कृषी पुरक व्यवसाय व उद्योग सुरु करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे कर्जाची मागणी करावी असे आवाहनही त्यांनी या निमित्ताने केले.

जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी या कृषी प्रदर्शना मागची भूमिका विषद करताना शेतकरी हा केंद्रबिंदू माणून या कृषी महोत्सवाची रचना करण्यात आल्याचे सांगितले. जवळजवळ 400 स्टॉल असलेल्या या महोत्सवात कृषी माल, औजारे, कृषीच्या विविध योजनांची माहिती असलेले स्टॉल असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रदर्शनात 24 ते 28 नोव्हेंबर पर्यंत विविध कृषी विषयावर व्याख्यान, मुलाखती, गटचर्चा होणार आहेत. तसेच या ठिकाणी जलयुक्त शिवार, पर्यावरणपूरक अभ्यासासाठी शालेय विद्यार्थ्याना बांधावर नेवून रोप आणि झाडांच्या बियांची लागवड, गट शेती प्रयोग आणि औजारातून शेतीचा विकास हे चार मॉडेल उभे केल्याचे सांगितले.या प्रदर्शनाचा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्‍वेता सिंघल यांनी केले.

लोकराज्य स्टॉलला मंत्र्यांची भेट
उद्‌घाटन केल्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सर्व स्टॉलची पाहणी केली. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्य स्टॉलला भेट दिली. चार वर्षेपूर्ती आणि शेतकऱ्यांच्या यशकथेवर आधारित लोकराज्य पाहिला. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल त्यांच्या समवेत होत्या. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे वतीने महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त प्रकाशित केलेल्या महाराष्ट्र आणि महात्मा गांधी मान्यवरांच्या लेखांचे संग्रहाचे पुस्तक जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी ना. खोत यांना यावेळी भेट दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)