10 ते 15 बैलगाडा मालकांच्या विरोधात गुन्हा दाखल
मंचर- सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली असतानाही गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथील घाटात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी सात ग्रामस्थांसह इतर दहा ते पंधरा बैलगाडा मालकांच्या विरोधात मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी विजय विलास कराळे, गौरव रामदास गावडे, सचिन बबन गावडे, कैलास भगवंत गावडे, देवराम बाळकृष्ण गावडे, भास्कर बाबासाहेब जगताप, संदीप भाऊसाहेब गायकवाड यांच्यासह इतर दहा ते पंधरा बैलगाडा मालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी राजेंद्र हिले यांनी फिर्याद दिली आहे.
शनिवारी (दि. 18) मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांना गावडेवाडी येथे बैलगाडा शर्यती सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी त्या बंद करण्यास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ पांचाळ आणि पोलीस कर्मचारी सुधाकर जाधव यांना सांगितले. त्यानुसार पोलीस पथक घाटात गेले असता तेथे बैलगाडा शर्यती सुरू होत्या. त्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.