गावठी गायींची सेंद्रिय शेतीला साथ

मंगेश पाटे
खोडद-विषमुक्‍त भाजीपाला आणि अन्नधान्य मिळत असल्याने सेंद्रिय शेतीला दिवसेंदिवस जास्त महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे. रासायनिक खतांकडे दुर्लक्ष करत बहुतांशी शेतकरी सेंद्रिय शेती करू लागले आहेत. तसेच गावठी गायींचे पालन करण्याकडेही खोडद, मांजरवाडी, आर्वी (ता. जुन्नर) परिसरातील शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात सेंद्रिय शेतीचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे एरवी गावठी गायींकडे दुर्लक्ष करणारे शेतकरी आज शेण, गोमूत्र आणि पोषक दुधासाठी गावठी गायींचे जतन करू लागल्याचे चित्र या परिसरात दिसत आहे. बहुसंख्य शेतकरी रासायनिक खातांना बाजूला ठेऊन सेंद्रिय शेतीची कास धरू लागले आहे. रासायनिक खत औषधे व कीटकनाशक फवाऱ्यामुळे शेतजमीन नापिक होऊन पिकाची प्रतवारी घसरू लागली आहे. यामुळे आता सेंद्रिय शेती ही लहान शेतकऱ्यांपासून मोठ-मोठ्या बागायतदारांपर्यंत केली जात आहे.
जुन्नर तालुक्‍यात गावोगावी सेंद्रिय शेतीचे सल्ला केंद्र खासगी शेतकऱ्यांमार्फत सुरू झाले आहे. या सेंद्रिय शेतीला जोड म्हणून गावठी गाई पालनाकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढल्याने हे शेतकरी 1 ते 10 गावठी गाई पाळू लागले आहेत. या गायींचे दूध आरोग्यास चांगले असल्यामुळे या दुधाला 70 रुपये प्रति लिटर प्रमाणे भाव मिळत आहे. तर गावठी गाईच्या तुपाला 2 हजार प्रति किलो असा भाव मिळत आहे. शेतीसाठी गोमूत्राची व शेणाची मात्रा रामबाण समजली जात असल्याने या गाईच्या गोमूत्रालाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गावठी गाईचे गोमूत्र व शेण लिंबाच्या पाल्याचा रस 15 दिवस एकत्र ठेऊन हे मिश्रण शेतात टाकून मशागत केल्यास मोठ्या प्रमाणावर उत्पादन निघत असल्याने खोडद परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी सेंद्रिय खत व दूधासाठी गावठी गाई पाळण्यास सुरुवात केली आहे.

 • गावठी गायीला 50 ते 60 हजार दर
  शेतकऱ्यांच्या गावठी गाई पाळण्याच्या कलामुळे या गाईच्या तसेच लाल भाडूशी गायींच्या किमती 60 हजार रुपयापर्यंत जाऊन पोहचल्या आहे. तरीही सेंद्रिय शेती करताना गावठी गाईंचा खूप चांगल्याप्रकारे उपयोग होतो. त्यामुळे जुन्नर तालुक्‍यात तरी गायींना मागणी वाढली आहे. गायींची झपाट्याने होणारी कमी होणारी संख्या ही भाववाढीला कारणीभुत आहे.
 • गोठ्यात पुन्हा दिसतेय गावठी गाई
  गावठी गाय विविध प्रकारे उपयोगी पडत आहे. त्याबाबत सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यामुळे गायींच्या शेण, दूध, तुपाला चांगला भाव मिळत आहे. या गायींच्या गुणधर्माची समाजामध्ये जनजागृती होत असल्याने पून्हा गोठ्यांमध्ये गावठी गाई दिसू लागल्या आहेत. तसेच गावाकडील शेतकऱ्यांप्रमाणेच शहरातील सुशिक्षित वर्गाला सुद्धा या गावठी गायींचे आकर्षण वाटू लागले आहे.
 • गावठी गायींची सध्या तरी गणना केलेली नाही. त्यामुळे किती वाढ झाली ते सांगता येत नाही. मात्र 2012च्या पशुगणनेनुसार तालुक्‍यात 12 हजार 308 गावठी गाई होत्या. पण दिवसेंदिवस गावठी गायींच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे.
  – अविनाश जाधव, तालुका विस्तार अधिकारी, जुन्नर
 • बैलगाडा शर्यतींसाठी लागणाऱ्या बैलांसाठी गावठी गायी पाळल्या जायच्या. मात्र, शर्यतींवर बंदी असतानाही आता गावठी गाई पाळण्यात येत आहेत. गायींचे दूध, तूपासाठी मागणी वाढली असल्याने संख्या ही वाढत आहे.
  – विकास तोडकर, शेतकरी, नारायणवाडी

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)