गावठणांची ड्रोनद्वारे मोजणी रखडली

शासनाकडून मान्यता मिळेना : जलद, अचूक मोजणी शक्‍य


50 वर्षांत केवळ 3 हजार गावठाणांची मोजणी


प्रस्ताव मंजूर केल्यास मोजणी होणार 3 वर्षांत

पुणे – पुरंदर तालुक्‍यातील सोनोरी या गावाची मोजणी ड्रोनच्या सहाय्याने करण्याचा देशातील पहिला प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्यातील चाळीस हजार गावठाणांची मोजणी याच पद्धतीने करण्याचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाने दिला आहे. मात्र, सहा महिने उलटले तरी या प्रस्तावास शासनाकडून अजूनही मान्यता मिळाली नाही. हा प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रस्तावास शासनाने मान्यता दिली तर राज्यातील गावठाणांची जलद आणि अचूक मोजणी करणे शक्‍य होणार आहे.

जमिनीची मोजणी अत्याधुनिक पद्धतीने करण्याच्या दृष्टीने भूमी अभिलेख विभागाकडून नवनवीन प्रयोग राबविले जात आहे. सध्या “इटीएस’ मशीनच्या माध्यमातून मोजणीचे काम केले जाते. मात्र, त्यासाठी लागणारा कालावधी मोठा आहे. दिवसेंदिवस मोजणीसाठी दाखल होणाऱ्या अर्जांचे संख्याही मोठी आहे. या पार्श्‍वभूमीवर ड्रोनच्या सहाय्याने मोजणी करण्याचा प्रयोग भूमी अभिलेख विभागाकडून सोनोरी येथे राबविण्यात आला होता. त्यामध्ये अचूक आणि पारदर्शक पद्धतीने मोजणीचे काम झाले. त्यामुळे या माध्यमातून मोजणी करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती भूमी अभिलेख विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाला केली होती. त्या प्रस्तावास परवानगीदेखील मिळाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, हा प्रयोग यशस्वी झाल्याने ग्रामविकास विभागाने पुढाकार घेत अशा प्रकारे राज्यातील चाळीस हजार गावठाणांची मोजणी ड्रोनच्या माध्यमातून करावी, असा प्रस्ताव राज्य सरकारला दिला आहे. मात्र, त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही. मध्यंतरी अधिवेशनातही हा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी शासनाकडून ड्रोनद्वारे गावठाणांची मोजणी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगण्यात आले.

या प्रस्तावास राज्य सरकारने मान्यता दिली, तर या गावांची मोजणी तीन वर्षांत करणे शक्‍य होणार आहे. राज्यातील 43 गावठाणांपैकी गेल्या 50 वर्षांत केवळ 3 हजार गावठाणांची मोजणी पूर्ण झाली आहे. ड्रोनच्या माध्यमातून केल्यास तीन वर्षांत 40 गावठाणांची गावांची मोजणी करणे शक्‍य होणार आहे.

गावठांची मोजणीमुळे होणारे फायदे
– जागा मालकांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार
– मालकी हक्काचा ठोस पुरावा निर्माण होणार
– बॅंका अथवा अन्य संस्थांकडून कर्ज मिळणे सोयीचे होणार
– ग्रामपंचायतींच्या मिळकत करात वाढ होण्यास मदत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)