गावची प्लॅस्टिक बंदी (कलंदर)

 – उत्तम पिंगळे 

सर्वत्र प्लॅस्टिक बंदी लागू झालेली पाहून सरपंच हंबीररावांनी आपल्या गावात सर्व ग्रामस्थांच्या वतीने एक सभा बोलावली. साधारणत: सत्तर एक पुरुष व तीस-पस्तीत बायका सभेला हजर असतात. सुरुवातीला बाई माणसांत काहीतरी कुजबूज सुरू असते. अगोदर नोटाबंदी, आता प्लॅस्टिक बंदी असं कधी होतं का? वगैरे… एका सदस्याने हात वर करून सांगितले की आपल्या मनात काही शंका असल्या तर नंतर सदस्यांना विचारा. आता सरपंच काय म्हणतात बघा. सरपंचांनी सांगितले की आपल्या गावी आपण प्लॅस्टिकचीबंदी कशी करायची त्याचा विचार करूया. एवढ्यात एक विरोधी सदस्य म्हणे की आपण आपल्या येथे बंदी नाहीच केली तर काय होईल? काही दंड बिंड, पावती नको. सर्वांनी त्याला खुळ्यात काढला की सरकारने बंदी लावली मग ती आपल्याला आपोआपच लागू आहे. आणि मग आपल्याला प्लॅस्टिकचा माल कुठून येईल?

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मग एक अलिखित नियमावली सुरू झाली. भाजीपाल्यासाठी कापडी पिशवी, दळण व नॉनव्हेजसाठी चक्क डब्बे. एकमेव हॉटेलवाल्याने कुणाला पार्सल हवे असल्यास डबा आणावा म्हणून सांगितले. फोनवरील ऑर्डरसाठी डबे आणून वेगळा चार्ज लावला जाईल. कापडवाल्याने कागदी पिशवी वापरण्याचे ठरवले आहे. दूधवाल्याने पातेलं वा डबा तयार ठेवण्यास सांगितले. शालेय मुलांसाठी पंचायतीतर्फे स्कूल बॅग देता येईल का? याची शक्‍यता पाहण्यात येत आहे. सरपंचांनी प्लॅस्टिक हे एक जडलेले व्यसन असून यातून हळूहळू बाहेर यायला पाहिजे असे (कागद वाचून) सांगितले.
मधेच कुणीतरी म्हणाला की शहरात बऱ्याच ठिकाणी उसाचा रस व नीरा प्लॅस्टिक पिशवीतून पार्सल देतात तसेच हॉटेलमधून प्लॅस्टिकचे डबे देतात त्यांचे काय होणार? तेव्हा सरपंच म्हणाले की, आपण आपल्या गावापुरता विचार करू. शहरात अनेक ‘डोकेबाज’ लोक आहेत ते बघतील काय कराचे ते. तरी पण बंदी अचानक आल्याने सगळीकडे खूप मोठा गोंधळ होईल असे सर्वांनाच वाटत होते. सरपंचांनी कुणाला शंका असतील तर नंतर विचारा म्हणून सांगितले. सभा संपली सांगून सर्वांना चहा पिण्यासाठी थांबण्यास सांगितले.
गावातील हॉटेलवाल्या रघूने एकशे वीस कटींग चहा आणले होते.

साधारण दोन डझन नवे ग्लास व दहा पंधरा स्टीलच्या वाट्या यातून तो पटापट सर्वांना चहा देत होता. स्टीलच्या बादलीतून पटकन विसळून चहा देत होता. आता प्लॅस्टिक बंद म्हणून नवीन ग्लास वाट्या आणल्या त्याचा जास्त चार्ज लागेल असं म्हणून चहा देत होता. सर्व बायाबापडे बरोबर बरोबर म्हणून मान डोलवत होते. मग सरपंचांनी बिल विचारले. एकशेवीस चहाचे सहा प्रमाणे सातशे वीस रुपये हवे पण काचेचे ग्लास व वाट्यांमुळे आता आठ प्रमाणे नउशे साठ झाले. रघु खूषच झाला. कारण नवे ग्लास व वाटी खर्चापैकी पहिल्याच बैठकीत त्याला दोनशे चाळीस रुपये जादा मिळाले. आता रेट हाच राहील. दिल्ली दिशेकडे बघत त्याने ‘स्वच्छ भारतच्या’ ‘चहावाल्याचे’ आभार मानले कारण त्याच्यासारख्या चहावाल्यांना प्लॅस्टिक बंदीने आता जादा फायदा मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)