“गावकी-भावकी’चे राजकारणच ठरले सरस

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे राहुल जाधव तर उपमहापौरपदी सचिन चिंचवडे यांची निवड झाली. त्यामुळे विजयोत्सवात भंडाऱ्याची एकच उधळण झाली. मात्र, या भंडाऱ्याची थाप खाली बसते ना बसते तोच उमेदवारी निवडीवरून “गावकी-भावकी’च्या राजकारणाचीच शहरात चर्चा रंगली आहे. महत्त्वाच्या पदांवर निवड करताना स्थानिक नेत्यांच्याच शब्दाचा मान राखला जातो. शहराबाहेरील कार्यकर्त्यांना महत्त्व दिले जात नसल्याच्या नाराजीचा सूर भाजपमधून आळवला जात आहे.

आशिया खंडातील सर्वात “श्रीमंत’ महापालिका अशी ओळख असलेल्या महापालिकेची सत्ता भाजपने काबीज केल्यानंतर सत्तासुंदरी आपल्याकडेच ठेवण्यासाठी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्षमण जगताप आणि भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांच्यात खऱ्या अर्थाने सत्तासंघर्ष सुरु झाला. त्यामुळे शहराचे जुन्या पुणे-मुंबई महामार्गाची सीमा ठरवत शहराची सरळ-सरळ दोन भागांत विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येकाच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी न करण्याची या दोन्ही पुढाऱ्यांचे अलिखित नियम आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेतील कार्यकारी आणि नामधारी पदे वाटपात राजकीय समीकरणे ठरविण्यात आली. त्यानुसार इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असलेले महापौर पद लांडगे गटाला मिळविण्यात यश आले. तर महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या सीमा सावळे यांच्या माध्यमातून जगताप गटाने आपल्याकडे ठेवल्या. मात्र, सत्ता समीकरणात सव्वा वर्षानंतर स्थायीचे अध्यक्षपद लांडगे समर्थकाला देणे अपेक्षित असताना आमदार जगताप यांना हे पद आपल्या समर्थकाकडेच ठेवण्यात यश आल्याने आमदार लांडगेंसह त्यांचे समर्थक चांगलचे खवळले. या कारणावरुन तत्कालीन महापौर नितीन काळजे आणि स्थायी सदस्य राहुल जाधव यांनी तडकाफडकी आपल्या पदाचे राजीनामे दिले. मात्र, हे बंड पेल्यातील वादळ ठरले.

दरम्यान, राजकीय समीकरणांतर्गत महापौरपदासाठी दुसऱ्या उमेदवाराचा शोध सुरु झाल्यानंतर चिंचवडचे पारडे जड असल्याचे जाणवू लागल्याने लांडगे समर्थकांची अस्वस्थता वाढू लागली. माळी समाजाने राहुल जाधव यांना संधी देण्याची आग्रही मागणी केली. त्यापाठोपाठ खानदेशवासियांनी नगरसेवक नामदेव ढाके यांच्या नावाचा आग्रह धरला. तर शत्रुघ्न काटे यांची राजकीय महत्वाकांक्षा देखील सर्व इच्छुकांना आपल्या राजकीय कारकिर्दीसाठी अडसर ठरण्याचा धोका वाटत होता. मात्र, महापौरपदासाठी आमदार लांडगे यांनी आपले राजकीय वजन वापरत राहुल जाधव यांच्या नावाला वरिष्ठ पातळीवरुन मंजुरी आणली. त्यामुळे आमदार जगतापांसह त्यांचे समर्थक नाराज झाले. त्याचाच परिणाम महापौर निवडणुकीत दिसून आला. गटबाजीमुळेचे या निवडणुकीसाठी भाजपने “व्हीप’ बजावून देखील शत्रुघ्न काटे, रवी लांडगे आणि तुषार कामठे हे अनुपस्थित राहिले. मात्र, या तीनही नगरसेवकांवर कारवाई करण्याची धमक सभागृह नेते दाखविणार नाहीत, हे उघड सत्य आहे.

निष्ठावंतांना तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार
महापालिकेत भाजपची सत्ता असूनही निष्ठावंतांना मात्र महत्त्वाची पदे मिळत नसल्याची आजपर्यंतची तक्रार आहे. यामध्ये महापौरपद, स्थायी समिती अध्यक्ष, निवडीत निष्ठावंतांचे म्हणणे देखील ऐकून घेण्याच तसदी घेतली जात नाही. किरकोळ पदांवर त्यांची बोळवण केली जात आहे. पात्र असूनही नामदेव ढाके यांना महापौरपदी संधी न दिल्याची सल निष्ठावंतांसह खानदेशवासियांना आहे. मात्र, सध्या तरी हे दोन्ही घटकांसमोर आत्मचिंतन करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. शेवटी महापौर पदाच्या निवडीत गावकी-भावकीचे राजकारणच सरस ठरल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)