गारपिठीच्या पावसाने भातपिकाचे मोठे नुकसान

वाठार, दि. 27 (वार्ताहर) -वाठार व रेठरे बुद्रुक परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वार्‍यासह गारपिठीच्या पावसामुळे खरीप हंगामातील भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सध्या भात पिक हे काढणीला आले असून गारपिठीमुळे भूईसपाट झालेले हे पिक झडलेले असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकारी व पदाधिकारी यांनी या विभागातील नुकसानग्रस्त भात शेतीचे पंचनामे करुन त्या शेतकर्‍यांना तातडीची मदत मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.
वाठार, ता. कराड तसेच रेठरे बुद्रुक परिसरात काही दिवसापूर्वी अवेळी पडलेल्या वादळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले होते. संपूर्ण पावसाळ्यात जेवढा पाऊस पडला नाही. तेवढा पाऊस गत पंधरवड्यात वादळीवारा व गारांसह परिसरात पडला. यामुळे परिसरात ओढे, नाले तुडूंब भरुन वाहिले होते. या पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी संबधित विभागातील ग्रामविकास अधिकारी व कृषी अधिकारी यांनी वरिष्ठ पातळीवर माहिती देवून पंचनामे करणे अपेक्षित आहे. मात्र अद्यापही नुकसान झालेल्या पिकांचे पंचतामे झालेले नाही. ते व्हावेत अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
सध्या वाठार परिसरात खरीप पिकांची काढणीची कामे सुरु आहेत. गारपिटीच्या पावसाने शेतामधील भुईसपाट झालेले भात पिक पाहून बळीराजा हवालदिल झाला असून तोंडचा घास हिरावल्याची भावना शेतकरी वर्गामधून व्यक्त केली जात आहे. यासाठी शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे तातडीने करुन त्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)