गायक, रसिकांच्या मेळ्याने “सवाई’वर “चार चॉंद’

पुणे – गेले चार दिवस असणारा उत्साह..वाद्य आणि गायकांचे घुमणारे आवाज..डोलणाऱ्या प्रेक्षकांच्या माना.. “वन्स मोअर’ची दाद.. श्रोत्यांनीही धरलेला ताल..सुट्टीचा दिवस असल्याने रसिकांची वाढती गर्दी..आणि मैफिलीसाठी असणारे “वाह’..असे वातावरण रविवारीही पाहायला मिळाले. निमित्त होते, 66 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे.

महोत्सवाची सुरूवात अर्शद अली आणि अमजद अली यांच्या राग “शुद्ध सारंग’ने झाली. त्यानंतर त्यांनी “बाजे रे मुरलिया बाजे’ हे लोकप्रिय भजन सादर केले. “ज्ञानियांचा राजा गुरू महाराज’या अभंगाने समारोप केला. प्रशांत पांडव (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), दीपक गलांडे व सत्यवान पाटोळे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राग “गौड सारंग’प्रस्तुत करत अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी या भगिनींनी गायनाची सुरूवात केली. त्यांना स्वप्नील भिसे (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम) आणि अमृता शेणॉय-कामत व प्रियांका मयेकर-भिसे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

प्रसिद्ध वीणावादक निर्मला राजशेखर आणि व्हायोलिनवादक इंद्रदीप घोष यांचे सहवादन झाले. त्यांनी राग “हंसध्वनी’मधील “वातापि गणपती भजेहं’ या गणेशवंदनेने आपल्या वादनाला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी राग “चारुकेशी’मधील काही रचनाही सादर केल्या. त्यांना पं. रामदास पळसुले (तबला), तंजावुर मुरगा भूपती (मृदंगम्‌) आणि दिगंबर शेडुळे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

मेवाती घराण्याचे प्रसिद्ध गायक संजीव अभ्यंकरांनी महोत्सवाचे पूर्वार्ध अधिकच बहारदार केले. त्यांनी राग “पूर्वी’ सह राग “शुद्ध बरडी’ सादर केला. “बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल’ हा अभंग स्वरचित चालीत सादर करून त्यांनी गायनाचा समारोप केला. त्यांना अजिंक्‍य जोशी (तबला), मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम), अश्विनी मिसाळ (तानपुरा), धनंजय म्हसकर व बिलिना पात्रा (गायनसाथ), अपूर्व द्रविड (टाळ) यांनी साथसंगत केली.

त्यानंतर प्रतीक चौधरी यांनी रसिकांशी मराठीत संवाद साधत सुरूवातीलाच दाद मिळवली. त्यांनी आपल्या शैलीत राग “मारवा’ सादर केला. त्यांना उस्ताद रफीउद्दीन साबरी (तबला), वैशाली कुबेर (तानपुरा) यांनी साथ केली. “मी पुण्यामध्ये 24 वर्षांनंतर आलो. त्यावेळी देबु चौधरींच्या बरोबर आलो होतो. 12 वाजेपर्यंत संगीत ऐकणारा पुण्याचा रसिक हा जगासाठी आदर्श आहे,’ अशा भावना यावेळी चौधरी यांनी व्यक्त केल्या.

मान्यवरांची हजेरी…
66 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, अभिनेते सुबोध भावेंसह आदी दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)