“गानवर्धन’चे “मुक्‍त संगीत चर्चासत्र’ 21 जुलैपासून

पुणे, – गायन, वादन व नृत्य या संगीताच्या तिन्ही शाखांच्या प्रचारार्थ गेली 39 वर्षे सातत्याने कार्यरत असलेल्या “गानवर्धन’ संस्थेने संगीत साधकांच्या चिंतनात वृद्धी व्हावी, म्हणून ललित कला केंद्र गुरुकुल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहयोगाने “मुक्‍त संगीत चर्चासत्र’ (निरूपणयुक्‍त संगीताविष्कार) आयोजित केले आहे. 21 ते 23 जुलै दरम्यान सायंकाळी 6 वाजता मनोहर मंगल कार्यायल, एरंडवणे येथे हे संपन्न होणार असून, ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे, तालवादक तौफीक कुरेशी व संगीतकार राहुल रानडे यांचा सहभाग आहे.
या “मुक्‍त संगीत चर्चासत्रा”ची संकल्पना संस्थेचे अध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी यांची असून उपक्रमाचे हे 36 वे वर्षे आहे. उद्‌घाटन डॉ. प्रभा अत्रे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून होईल. 21 जुलै या पहिल्या दिवशी “अंतस्वर ः माझ्‌या कविता, माझ्‌या बंदिशी’ या विषयाच्या माध्यमातून अमूर्ताला कवेत घेणारे सूर आणि अर्थाच्या नेमकेपणाजवळ जाणारे शब्द… या दोघांना बरोबर घेउन जाताना कविता व बंदिशी या अंतःस्वराच्या दोन मार्गावरील चिंतनाची ओळख सप्रयोग करुन देणार आहेत संवेदनशील ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे. त्यांच्याशी प्रा. प्रवीण दवणे संवाद साधणार असून तबला माधव मोडक व हार्मोनिअम सुयोग कुंडलकर अशी साथसंगत असणार आहे.
संगीतामध्ये लय आणि गती यांनी व्यापलेल्या ताल आणि तालवाद्यं यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. “तालवाद्य ः परंपरा ते फ्‌युजन’ या विषयाच्या माध्यमातून विशद करणार आहेत, तालवाद्यवादनातील पथप्रवर्तक असा लौकिक जागतिक स्तरावर प्राप्त करणारे उस्ताद अल्लारखॉं साहेब यांचे सुपुत्र व शिष्य म्हणजे तालवाद्यवादक तौफीक कुरेशी. आपल्या सप्रयोग सादरीकरणातून ते तालवाद्याचा प्रवास, जनमानसातील त्याचा प्रभाव रसिकांसमोर उलगडून दाखविणार आहेत. 22 जुलै रोजी संगीतकार राहुल रानडे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
पारंपरिकता, भावप्रधानता, सहजस्फूर्तता अशी वैशिष्टये असलेल्या भावसंगीतात संगीतकाराची भुमिका, विचार, मांडणी यांच्या प्रयोगशीलतेबाबत जागरुक असलेले आजचे आघाडीचे सर्जनशील संगीतकार म्हणजे राहुल रानडे. “मुक्‍त संगीत चर्चासत्रा”च्या रविवार 23 जुलैच्या समारोपसत्रात ते “संगीतकाराची सर्जनशीलता’ या विषयाच्या माध्यमातून आपले विचार सप्रयोग मांडणार आहेत. त्यांच्याशी अरुण नूलकर संवाद साधणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)