गाडीची काच फोडून दोन लाख चोरण्याचा प्रयत्न फसला

गाडीशेजारी पडलेला काचांचा चुरा.

तहसील कचेरीसमोरील घटना, नागरीकांची सतर्कता

कराड, दि. 5 (प्रतिनिधी) – कारची काच फोडून गाडीत ठेवलेल्या दोन लाख रुपयांवर डल्ला मारण्याचा चोरट्यांचा प्रयत्न सोमवारी दुपारी नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला. हा प्रकार येथील तहसीलदार कार्यालयाच्या समोरील रस्त्यावर घडला.
याबाबतची माहिती अशी, सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शेरे (ता. कराड) येथील मारूती निकम हे गौण खनिज महसुलाचे 2 लाख रुपये भरण्यासाठी बँकेतून पैसे काढून त्यांच्या बलेनो कारमधून सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तहसील कार्यालयात आले होते. निकम यांनी कार तहसीलदार कार्यालयासमोरील रस्त्यालगत पार्क केली. यावेळी मित्र भेटल्याने निकम मित्रांसमवेत चहा पिण्यासाठी नजीकच्या हॉटेलमध्ये गेले. दरम्यान, कारजवळ काच फुटल्याचा मोठा आवाज झाल्याने आजूबाजूचे लोक कारच्या दिशेने धावले. लोक कारकडे धावत येत असल्याचे पाहून कारजवळ थांबलेल्या दोन युवकांनी मोटरसायकलवरून पोबारा केला. संबंधित युवकांनी काच फोडून कारमधील काहीतरी चोरण्याचा प्रयत्न केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
दरम्यान, पळापळ झाल्याने मारूती निकम हेही मित्रांसमवेत गाडीकडे आले असता त्यांना गाडीच्या पुढील डाव्या बाजूची काच फुटल्याचे दिसले. मात्र, गाडीतील दोन लाखाची रक्कम सुरक्षित असल्याचे पाहून त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या घटनेबद्दल बोलताना निकम म्हणाले, गौण खनिजचा महसूल जमा करण्यासाठी मी आताच बँकेतून दोन लाख रुपये काढून आलो आहे. ती रक्कम मी गाडीत ठेवली होती. चोरट्यांनी याच दोन लाखावर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, काच फुटल्याचा आवाज आणि नागरिक सावध झाल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला आणि ते पसार झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)