गाऊटचा संधिवात आणि आयुर्वेद उपचार

रक्‍तातील बिघाड झाल्यामुळे होणाऱ्या सांधेदुखीच्या प्रकारापैकी एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार म्हणजे गाऊटचा संधिवात. या विकाराची कारणे कोणती? यावर आयुर्वेदिक उपचार कसे केले जातात? याची माहिती आपण घेणार आहोत.
गाऊट म्हणजे नक्‍की काय?
विविध कारणांनी ज्यावेळी रक्‍तातील प्युराईनच्या चयापचय क्रियेत बिघाड होऊन रक्‍तातील “युरिक ऍसिड’ या घटकाचे प्रमाण 7 मि.ग्रॅ. पेक्षा जास्त होते आणि परिणामी तयार होणारे विविध क्षार सांध्याच्या आतील भागावर व स्नायूंमध्ये साठू लागतात आणि सांधे सुजून दुखू लागतात. त्या संधिवाताच्या प्रकाराला “गाऊट’चा संधिवात म्हणतात.
गाऊटची कारणे कोणती असतात?
रक्‍तात तयार होणारे युरिक ऍसिड रोज ठरावीक प्रमाणात शरीरातून लघवीवाटे उत्सर्जित होत असते. ज्यावेळी हे उत्सर्जन व्यवस्थित होत नाही, अशा वेळी त्याचे रक्‍तातील प्रमाण वाढते उदा. स्थूलपणा, वाढलेले वजन, उच्च रक्‍तदाब, रक्‍तातील चरबीचे प्रमाण जादा असणे, लघवीला साफ होत नसणे, किडनीचे विकार, अतिमद्यपान, काही रासायनिक औषधांचे दुष्परिणाम, अति प्रवास, पाणी कमी पिणे इ. कारणामुळे युरिक ऍसिड उत्सर्जन पुरेसे होत नाही. त्याचे रक्‍तातील प्रमाण वाढू शकते.
काही वेळा रक्‍तात युरिक ऍसिडची प्रमाणापेक्षा जास्त उत्पत्ती होते व त्याचे प्रमाण वाढल्याचे आढळते. हिमोलायटिक, ऍनिमिया, सोरायसीस या विकारामुळे होणारे रक्‍तातील बिघाड, चयापचय क्रियेतील दोष, काही वेळा हार्मोन्समधील असंतुलन यामुळे युरिक वाढून गाऊटचा संधिवात होऊ शकतो.
आयुर्वेदाने वर्णन केलेल्या “वातरक्‍त ‘ या विकाराची गाऊट या विकाराचे साम्य आढळून येते. अतितिखट, आंबट, तळलेले, मसालेदार, पित्त वाढवणारे पदार्थ वारंवार मांसाहार, अतिमद्यपान करणाऱ्या व्यक्‍तींनी अतिप्रवास, अतिव्यायाम, धावपळ, कष्टाची कामे जास्त केल्यास या विकाराची उत्पत्ती होते. अशी कारणमीमांसा आयुर्वेदाने सांगितली आहे.
गाऊटमुळे कोणत्या तक्रारी होतात?
रक्‍तातील युरिक ऍसिडचे प्रमाण जास्त वाढलेले असताना अतिव्यायाम, अतिप्रवास, कोणताही अपघात होणे, शस्त्रक्रिया, वजन कमी होणे, अतिमद्यपान, अतिमासांहार यापैकी कोणतेही कारण घडल्यावर सांध्याच्या विविध तक्रारी सुरू होतात. पायाच्या अंगठ्याचा सांधा या ठिकाणी सुज येते. तीव्र वेदना होऊ लागतात. कालांतराने पायाचा घोटा, गुडघे, कोपर या सांध्यामध्ये देखील आजार पसरू शकतो. तीव्र वेदना रात्रीच्या वेळेस अधिक वाढत असतात. सांधा सुजलेला लालसर व गरम असतो. कालांतराने ही सूज कमी होते. काहीवेळा त्यावरील त्वचेची साले जातात. काही रुग्णात बारीक ताप, भूक न लागणे, निरुत्साह, अंगदुखी अशा तक्रारी जाणवत असतात.
विकार जास्त दिवस राहिल्यानंतर नंतरच्या काळात वेदना आणि जखडलेपणा वाढत जातो. सूज कमी-जास्त होत असते. निम्म्या रुग्णात नाक, डोळ्याच्या पापण्या यांना कडकपणा येऊ लागतो. क्वचित तळहातांवर पांढरट रेषा आढळून येतात.
गाऊटचे दुष्परिणाम
गाऊटच्या विकारात याच जोडीला मुतखडा होणे, किडनीचे काम कमी होणे, स्थूलपणा वजन वाढणे, रक्‍तदाब जास्त राहणे अशा तक्रारी होऊ शकतात.
गाऊटच्या संधिवातावरील उपचार
गाउटच्या संधिवाताचे निदान झाल्यावर अनेकजणांना सुरुवातीला वेदनाशामक औषधे दिली जातात. वेदना तीव्र असताना स्टिराईडस्‌ही काही वेळा दिली जातात. याचबरोबर रक्‍तातील युरिक ऍसिडचे उत्पादन कमी करणारी व युरिक ऍसिडचे उत्सर्जन वाढविणारी अशी रासायनिक औषधे दिली जातात. याने अनेकांना आराम पडतो. पण पथ्य नीट न सांभाळल्यास पुनःपुन्हा त्रास होत असतो. काहींना वेदनाशामक औषधांची सवय लागलेली असते तर काहींना साईड इफेक्‍ट होत असतात.
गाऊटवरील आयुर्वेदिक उपचार
गाऊटच्या संधिवातावर उपचार करताना रुग्णाचे वय, वजन, प्रकृती, आहाराचे स्वरूप, प्रवासाचे प्रमाण, व्यसने पूर्वी झालेले उपचार, शरीरातील इतर विकार, सुरू असणारी इतर रासायनिक औषधे, ताणतणाव यांची सखोल माहिती घेऊन दोषाचे अधिक्‍यानुसार प्रकारनिश्‍चिती करून सांघिक उपचार सुरू केले जातात. पंचकर्म, औषधी उपचार आणि पथ्य मार्गदर्शन असे त्यांचे स्वरूप असते.
औषधी उपचार
दोषाधिकाऱ्याचा विचार करून गुडूची, चंदन, निरगुंडी, शतावरी, त्रिफळा, रास्ना, एरंड, कोकीलांक्ष, सारीवा, मंजिष्ठा, निग्ब, कांचनार, वरुण, गोखरू, दशमुळ, गुगुळमुळे, इ. पासून तयार झालेली संयुक्‍त औषधे वापरली जातात. त्रास जास्त असताना भौक्‍तिक, चंद्रपुटी प्रवाळ, गुळवेल सत्त्व यांचाही वापर केला जातो. सांध्याला असणारी सूज कमी करण्यासाठी तीव्र अवस्थेत सूज कमी करणाऱ्या वनस्पतींचे सांध्यावर लेप लावणे फायद्याचे असते.
पंचकर्म उपचार-
औषधी तेलाने हलकासा मसाज करून नंतर स्वेदन केल्यानंतर तैलबस्ती, धृतबस्ती, निरुह बस्ती, विरेचनकर्म, रक्‍तमांक्षण, या पंचकर्म उपचारांचा गरजेनुसार ठरावीक काळ वापर केला जातो.
विकाराची तीव्रता कमी झाल्यानंतर देखील पोटातील घ्यावयाची काही औषधे थोडी दीर्घकाळ चिकाटीने सुरू ठेवणे फायद्याचे असते.
गाऊटमध्ये टाळण्याचा आहार
गाऊटच्या विकाराबाबत त्रास पुनःपुन्हा होऊ नये म्हणून पथ्य पालनाला जास्त महत्त्व आहे.
दही, लोणचे, अतितिखट पदार्थ, मसालेदार पदार्थ, तळलेले पदार्थ, आंबवलेले पदार्थ, वारंवार मांसाहार, अंडी, मद्यपान, उन्हात काम, जागरण, जास्त उभे राहणे, अतिप्रवास, अतिव्यायाम सदैव टाळणे महत्त्वाचे असते. मोरावळा, कोकम सरबत, लिंबू सरबत, दूध, तूप, गुलकंद, द्राक्षे, डाळींब, धान्याचे पाणी या गोष्टी नियमित आहारात ठेवाव्यात.
थोडक्‍यात गाऊटच्या विकारावर आयुर्वेदिक उपचारांनी आणि पथ्य पालनाने उत्तम नियंत्रण ठेवता येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)