गांधी पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येलाच कॉंग्रेसमध्ये वाद

वेगवेगळ्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांकडून अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन

नगर – महात्मा गांधी पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येलाच शहर जिल्हा व ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे पदाधिकारी आमने-सामने आले आहेत. गांधी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीने कार्यकर्ते कोठेही अभिवादन कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात, असे सांगून वादावर पडदा घालण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु या वादामागे शहर जिल्हाध्यक्षपदाची रस्सीखेच असल्याचे मुख्य कारण आहे.
गांधी पुण्यतिथीनिमित्त सर्वत्र सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक संघटनांतर्फे कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कॉंग्रेस पक्षाला महात्मा गांधी हे प्रिय आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गांधी यांच्या जयंती आणि पुण्यतिथीला विशेष अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु या महामानवाच्या उद्याच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येलाच नगर शहर जिल्हा व ब्लॉक कमिटीमध्ये वाद उफाळून आला आहे. या दोन्ही पदाधिकाऱ्यंनी स्वतंत्र कार्यक्रमाचे आयोजन करून वेळ मात्र एकच दिली आहे. त्यामुळे वादाची किनार आहेच, असे कार्यकर्त्यांमध्ये बोलले जाऊ लागले आहे.

शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीने गांधी पुण्यतिथीनिमित्त उद्या (बुधवारी) सकाळी साडेदहा वाजता लालटाकी रोडवरील कालिका प्राईड येथील कॉंग्रेस कार्यालय सकाळी साडेदहा वाजता अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रभारी शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना, तसे मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता समाज माध्यमांवर संदेश दिले आहेत. चव्हाण यांच्या या संदेशापाठोपाठ ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी सायंकाळी साडेसहा वाजता संदेश पाठविले आहेत. वाडियापार्क येथे अभिवादन कार्यक्रम सकाळी साडेदहा वाजता होईल, असे त्यात म्हटले आहे.

या दोन्ही संदेशामध्ये चव्हाण आणि भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या संदेशामध्ये कार्यक्रमाची वेळ एकच आहे. त्यामुळे शहर जिल्हा कॉंग्रेसमधील कार्यकर्त्यांमध्ये वादाची ठिणगी कायम आहे, असे स्पष्ट होते. या ठिणगीमागे शहर जिल्हाध्यक्षपदाची रस्सीखेच असल्याचे सांगितले जात आहे.

महात्मा गांधी हे महामानव आहेत. या महामानवाच्या कार्याला अभिवादन करणे मोठेच आहे. ते कोणीही कोठेही करू शकतो. ब्लॉक कमिटीच्या अध्यक्षांमुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हा खोडसाळपणाला पुढील आठ दिवसांत उत्तर मिळून जाईल.

– दीप चव्हाण, प्रभारी शहर जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस
 
महात्मा गांधी यांचा पुतळा वाडियापार्क येथे आहे. तिथे अभिवादनासाठी सर्व संघटना एकत्र येतात. त्यामुळे ब्लॉक कमिटी अध्यक्ष या नात्याने कार्यकर्त्यांना अहवान केले आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षकांनी शहराचे प्रभारी अध्यक्षांचे अधिकार गोठावले आहेत. त्यामुळे त्यांना अधिकार नाही.

– बाळासाहेब भुजबळ, ब्लॉक अध्यक्ष, कॉंग्रेस 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)