गांधीजींचे नाव घेणारे सरकार सारे असत्याचेच प्रयोग करते: राधाकृष्ण विखे-पाटील

सेनेने दळभद्री सरकारमधून बाहेर पडून दाखवावे मग अयोध्येला जाण्याची नौटंकी करावी 
जळगाव: गांधीजींच्या आत्मचरित्राचे नाव “माझे सत्याचे प्रयोग’ आहे. मात्र गांधीजींचे नाव घेणारे हे सरकार सारे असत्याचेच प्रयोग करते आहे. मोदी स्वतःला चौकीदार म्हणवून घेतात. पण हे “जागते रहो’ म्हणण्याऐवजी “भागते रहो’ म्हणणारे चौकीदार आहे. म्हणूनच विजय मल्ल्या, निरव मोदी, मेहुल चोक्‍सी देश सोडून पळाले. आता नितीन संदेसरा नावाचा आणखी एक महापुरूष 5,700 कोटी रूपयांचा घोटाळा करून पळून गेला. पण पंतप्रधान एक शब्द बोलायला तयार नाहीत. या सरकारकडे जनतेच्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर नाही, असा टोला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगाविला आहे.
कॉंग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेचा दुसऱ्या टप्प्याची सुरुवात जळगाव येथील फैजपूर येथून झाली. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरही राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सडकून टीका केली. आधी या दळभद्री सरकारमधून बाहेर पडून दाखवा आणि मग अयोध्येला जाण्याची नौटंकी करा, असे शिवसेनेला सुनावले. शिवसेनेने आजवर 235 वेळा सरकारमधून बाहेर पडण्याचे इशारे दिले. पण शेवटपर्यंत सत्ता सोडली नाही. हे सरकार लोकविरोधी, शेतकरी विरोधी आहे असे शिवसेनेला वाटत असेल तर त्यांनी तातडीने बाहेर पडून दाखवावे, असे आव्हानच त्यांनी दिले.
विखे-पाटील म्हणाले, मोदी सरकार हे खोटारडे सरकार आहे. 100 गोबेल्स मेले असतील तेव्हा भाजपाचा जन्म झाला असेल. गोबेल्स हा हिटलरच्या कार्यकाळात मंत्री होता. एक खोटे शंभरदा बोलले की ते खरे होते, असे तो म्हणायचा. एकवेळ तो परवडला पण मोदी नाही, अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
देशाच्या आणि राज्याच्या सोडा पण जळगाव जिल्ह्यातील प्रश्नांवरही या सरकारकडे उत्तर नाही. भाजप जळगाव जिल्ह्याला न्याय देऊ शकणार नाही. एकनाथ खडसेंनी भाजपसाठी रक्त आटवले. पण जो पक्ष एकनाथ खडसेंचा होऊ शकला नाही, तो जळगाव जिल्ह्याचा काय होणार? असा सवाल करून स्व. मधुकरराव चौधरी यांच्या काळातील विकासाचे युग पुन्हा परत आणायचे असेल तर जळगाव जिल्ह्याने कॉंग्रेसला भरभरून पाठिंबा द्यावा, असे आवाहन विखे पाटील यांनी यावेळी केले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)