गांधींना भोवले सरकारी जागेतील अतिक्रमण 

निवाड्यांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा संदर्भ 

नगर: महापालिकेच्या निवडणुकीत अर्जाच्या छाननीत घेण्यात आलेल्या हरकतीत खासदार दिलीप गांधी यांचे पूत्र सुवेंद्र गांधी, त्यांची स्नुषा दिप्ती सुवेंद्र यांचे अर्ज बाद झाले आहे. गांधी यांना सरकारी जागेतील अतिक्रमण भोवले आहे. भारतीय जनता पक्षाचे चार अर्ज बाद झाले. यात प्रदीप परदेशी व सुरेश खरपुडे यांचा समावेश आहे. शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे, राष्ट्रवादीचे डॉ. योगेश चिपाडे यांचाही अर्ज बाद झाला आहे.

गांधी पूत्र आणि स्नुषाचा अर्ज अतिक्रमण “व्यक्ती’ संज्ञेनुसार बाद 

भाजपचे सुवेंद्र दिलीप गांधी यांच्या अर्जावर शिवसेनेचे गिरीष जाधव आणि राष्ट्रवादीचे नजीर अहमद अब्दुल रज्जाक यांनी हरकत घेतली होती. सुवेंद्र गांधी यांचे वडिल दिली गांधी यांनी कोठी रस्त्यावर अतिक्रमण केल्याची हरकत होती. या हरकतीवर सुवेंद्र यांनी खुलासा सादर केला होता. वादग्रस्त मिळकतीमध्ये 1982 पूर्वी कंपाऊंडसह बांधकाम आहे. हे बांधकाम आपण किंवा त्यांच्या कुटुंबियांचे नाही. या मिळकतीचा खरेदी व्यवहार 1994 मध्ये झाला आहे. सरोज दिलीप गांधी, छाया अशोक गांधी व संगीता अनिल गांधी यांनी या मिळकतीची खरेदी केलेली आहे. ही मालकी आपली नाही, असा खुलासा सुवेंद्र गांधी यांनी दिला आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी यांनी खुलाशाचे आवलोकन करत निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयातील निकालाचे संदर्भ दिले आहेत. त्यानुसार अतिक्रमण करणाऱ्या “व्यक्ती’ या संज्ञेमध्ये त्यांच्या कायदेशीर वारसांचा देखील समावेश होतो. सुवेंद्र गांधी यांनी खुलाशात हे बांधकाम 1982 पूर्वीचे आहे. त्यामुळे या मिळकतीशी संबंध नाही. परंतु या मिळकतीची खरेदी 1994 मध्ये झाली आहे. ही खरेदी सुवेंद्र यांची आई यांनी केल्याचे दिसते. आजतागायत ही मिळकत त्यांच्या मालकीची आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सुवेंद्र दिलीप गांधी हे अधिनियमाच्या कलम 10 (1), 10 (1ड) नुसार निवडणूक लढवण्यास अनर्ह ठरत असल्याचे स्पष्ट होते.

सुवेंद्र गांधी यांच्या पत्नी दिप्ती यांनी 11 (ड) मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या अर्जाच्या छाननीवेळी विजय आनंदा पटवेकर यांनी हरकत घेतली. सुवेंद्र यांच्या हरकतीप्रमाणेच ही हरकत होती. दिप्ती यांच्याकडूनही त्याचप्रमाणे खुलासा करण्यात आला होता. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचा आधार घेतला. त्यानुसार दिप्ती यांच्या सासूने ही मिळकत खरेदी केल्याचे आढळते आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार दिप्ती गांधी या अधिनियमाच्या कलम 10 (1), 10 (1ड) नुसार निवडणूक लढवण्यास अनर्ह ठरत आहेत.

बाळासाहेब बोराटे यांना नडला अनाधिकृत मोबाईल मोनोरा 

शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे हे प्रभाग 12 (अ) मधून अर्ज दाखल केला होता. त्यावर राष्ट्रवादीचे संजय घुले यांनी हरकत घेतली. बोराटे यांच्या माळीवाडा येथे दोन मिळकती आहेत. त्यावर अनाधिकृतपणे मोबाईल मनोरे आहेत. त्यासाठी कुठलीही परवानगी नाही. महापालिकेने हे मनोरे अनाधिकृत ठरवून ते काढण्याचा आदेश पारित केला आहे. त्याचप्रमाणे माळीवाडा येथील ब्राह्मणगल्ली येथील मिळकतीची घरपट्टीची रक्कम थकीत आहे. बोराटे यांची पत्नी चैताली यांच्या नावावर शहर सहकारी बॅंकेचे कर्ज दाखविण्यात आले आहे. संपता पतसंस्थेचे देय रकमेचा तपशील दिलेला नाही. त्यामुळे शपथपत्र हे खोटे सादर केलेले आहे, अशी हरकत घुले यांनी घेतली.

बोराटे यांनी यावर तोंडी खुलासा सादर केला. मोबाईल मनोरो बांधला असून, ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे. मालकीची मिळकत नसून त्यांच्या अवलंबिताची देखील नाही. घरपट्टी मिळकत उमेदवाराशी संबंधित नाही. थकबाकीसंदर्भातील नोटीस नाही. थकबाकी असल्यास अपात्र होण्याबाबतची अधिनियमात तरतूद नाही. यावर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेत बोराटे यांची माळीवाडी येथील मालमत्तेत वारस म्हणून नोंद आहे. मोबाईल मनोरे अनाधिकृतपणे उभारण्यात आलेले आहे. ते मनोरे काढण्याचा महापालिकेचा आदेशच आहे. या आदेशाविरोधात न्यायालयात दाद मागितलेली नाही. स्थगिती आणि रद्दचा कोणताही पुरावा नाही. त्यानुसार अधिनियमाच्या कलम 10 (1), 10 (1ड) नुसार निवडणूक लढवण्यास बाळासाहेब बोराटे हे अनर्ह ठरत आहेत.

डॉ. चिपाडे यांना वडिलांनी केलेले अवैध बांधकाम नडले 

राष्ट्रवादीकडून डॉ. योगेश चिपाडे यांनी प्रभाग क्रमांक 8 (ड) मधून अर्ज भरला होता. त्यांच्या अर्जावर विशाळ खाटे यांनी हरकत घेतली. डॉ. चिपाडे यांची महापालिकेकडे थकबाकी आहे. महापालिकेने अवैध बांधकामाबाबत शास्ती केलेली असून, त्याची थकबाकी आहे. हे बांधकाम डॉ. चिपाडे यांचे अवलंबित रमेश चिपाडे यांनी केलले आहे. शपथपत्रात मालमत्तेचा तपशील चुकीचा दिलेला आहे. अपुरी माहिती सादर केलेली आहे. डॉ. योगेश चिपाडे यांनी त्यावर खुलासा सादर केला. महापालिकेची थकबाकी अदा केलेली आहे. अनाधिकृत बांधकाम असलेली मिळकत ही मालकीची नाही. अवैध बांधकामाच्या शास्तीची रक्कम भरलेली आहे.

संकेतस्थळावर ऑनलाईनपद्धतीने अर्ज भरताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे ही माहिती भरता आलेली नाही. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दोन्ही बाजू ऐकल्यानंतर निकाल दिला. डॉ. चिपाडे यांना नामनिर्देश ऑनलाईन दाखल करताना अडचणी आल्या हे रास्त आहे. रमेश चिपाडे यांच्याकडून अवैध बांधकामाची शास्ती आकारल्याचे स्पष्ट होते. परंतु सदर बांधकाम नियमानुकूल केल्याचा कोणताही पुरावा सादर केलेला नाही. रमेश चिपाडे हे अवलंबित क्रमांक दोन असून त्यांनी केलेल्या अनाधिकृत बांधकामाबाबत त्यांना महापालिकेने शास्ती केलेली आहे. त्यानुसार अधिनियमाच्या कलम 10 (1), 10 (1ड) नुसार निवडणूक लढवण्यास बाळासाहेब बोराटे हे अनर्ह ठरत आहेत.

बाद उमेदवारांची न्यायालयाकडे धाव 

महापालिका निवडणुकीतील छाननी ही पूर्व तालीम ठरली. खासदार दिलीप गांधी यांचे पूत्र सुवेंद्र, स्नुषा दिप्ती यांच्यासह शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे, राष्ट्रवादीचे डॉ. योगेश चिपाडे यांचे अर्ज बाद झाले. भारतीय जनता पक्षाचे एकूण चार उमेदवारांचे अर्ज बाद झाले. भाजपला हा मोठा धक्का आहे. यातून सावरण्यासाठी भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी न्यायालयाची पायरी चढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे धाव घेतली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्णयाविरोधात अपील दाखल करण्याची तयारी या बाद उमेदवारांनी सुरू केली आहे. चौथा शनिवारी आणि रविवार हे सुटीचे दिवस आले आहेत. त्यामुळे अपील दाखल होईल की नाही ही शंकाच व्यक्त होत आहे. 

 

महसूल अधिकाऱ्यांचा मध्यरात्रीपर्यंत कथ्याकूट! 

अर्ज छाननीत दाखल झालेल्या हरकतींवर निर्णय किंवा निकाल देण्याची सर्व जबाबदारी निवडणूक निर्णय अधिकारी यांची होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महसूलचे उपजिल्हाधिकारी दर्जाच होते. महसूलच्या विविध अधिनियमांचा अभ्यास असलेले जाणकार त्यांच्याभोवती कार्यरत होती. मध्यरात्रीपर्यंत हरकतींच्या निकालावर कथ्याकूट सुरू होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार हे निवाडे देण्यात आले आहेत. त्यामुळे या निकालांचा दूरगामी परिणाम संभावतो आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर रंगलेले हे नाट्याला पोलीस देखील साक्षीदार होते. शहर पोलिसांनी त्यासाठी बंदोबस्त वाढविला होता. निकाल बाहेर येईपर्यंत पोलिसांचे मनोबल काहीसे अस्थिर झाले होते. परंतु महसूलच्या निकालानंतर पोलिसांनी शहरभर बंदोबस्त वाढविला होता. 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
125 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
4 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)