“गहुंजे’वर महाबॅंकेकडून ताबा

नियमित प्रक्रिया असल्याचे बॅंकेकडून स्पष्ट : 69.50 कोटींचे कर्ज

पुणे – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या पुण्यातील गहुंजे मैदानाच्या कर्जाचे हफ्ते थकल्यामुळे बॅंक ऑफ महाराष्ट्राने ताबा घेतला आहे. बॅंकेने ही कारवाई आमची नियमित प्रक्रिया असल्याचे स्पष्ट केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या मैदानाच्या निर्मितीसाठी 69.50 कोटींचे कर्ज घेण्यात आले आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्र, कर्नाटक बॅंक, बॅंक ऑफ बडोदा आणि आंध्रा बॅंक या चार शाखांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला हे कर्ज मंजूर केले होते. या बॅंकांच्या मंडळाचे नेतृत्व बॅंक ऑफ महाराष्ट्र करत आहे. योग्य वेळेत हप्ते न भरल्यास मैदानाचा ताबा घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे बॅंकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हा प्रतिकात्मक ताबा असल्याने स्टेडियमवर होणाऱ्या नियमित सरावावर त्यांचा परिणाम होणार नाही.

या संदर्भांत बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता ही आमची नियमित प्रक्रिया असल्याचे स्पष्ट केले. साधारण तीन महिन्यांपेक्षा अधिक हफ्ते थकले की, बॅंकेचे रिकव्हरी डिपार्टमेंट कारवाई करत असते. त्याप्रमाणे ही कारवाई झाली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन हे आमचे जुने खातेदार आहेत. भारत क्रिकेट नियामक बोर्डाकडे (बीसीसीआय) त्यांचे पैसे अडकले आहेत. त्यामुळे त्यांना हफ्ते भरण्यास उशीर झाला आहे. हे पैसे मिळाले की, आम्ही बॅंकेत पैसे जमा करू, असे आश्‍वासन एमसीएने दिले असल्याचेही बॅंकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या संदर्भात बॅंकेचे शिष्टमंडळ बीसीसीआयला सुद्धा भेटणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

सध्या असोसिएशनने वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या सामन्यातून मिळालेला नफा बॅंकेकडे भरला आहे. ही रक्‍कम 4 कोटी 90 लाख रुपये इतकी आहे. आता उर्वरित रक्‍कम बीसीसीआय पाठवेल तेव्हा भरली जाईल, असे एमसीएचे सचिव रियाझ बागवान यांनी सांगितले.

असोसिएशनसमोर पैशांचा प्रश्‍न
सहारा इंडिया समुहाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसोबत 215 कोटींचा जाहीरातींचा करार केला होता. मात्र, सहारा समुहाने या करारातून माघार घेणे पसंत केल्यामुळे असोसिएशनसमोर पैशांचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआय आणि क्रिकेट प्रशासकीय समितीला संघटनेच्या हिस्स्यातला निधी तत्काळ देण्याची विनंती केली आहे. सध्या असोसिएशनने 4.5 कोटी रुपये बॅंकेकडे भरले असून कारवाई टाळण्यासाठी असोसिएशनला तत्काळ 12 कोटींची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)