गवळी गॅंगच्या नऊ जणांविरोधात गुन्हा

मंचर-लोणी (ता. आंबेगाव) येथील व्यापाऱ्याला दुकानात मारहाण करून आणि दुकानाची तोडफोड करून पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गवळी गॅगच्या 5 जणांसह त्याच्या 4 साथीदारांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दीड लाख रूपयांची खंडणी देऊनही धमक्‍यांमुळे त्रस्त झालेल्या व्यापाऱ्याने मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मंचर पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना बुधवार (दि. 25) पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
मोबीन मुजावर, सूरज यादव, ओमकार पंचरास अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात खंडणी मागितलेला व्यापारी आजारी असल्याने उपचारासाठी बाहेर गेला होता. 5 फेब्रुवारीला व्यापाऱ्याच्या भावाकडे पाच लाख रूपयांची खंडणी मागण्यात आली. त्यावेळी गवळी गॅंगच्या 10 ते 12 जणांनी व्यापाऱ्याच्या देशी दारूच्या दुकानात जाऊन तोडफोड व मारहाण केली. सीसीटीव्ही तोडून मारहाण करण्यात आली. तोडफोडीत दुकानाचे 40 हजार रूपयांचे नुकसान झाले होते. व्यापारी उपचार घेऊन घरी आल्यानंतर त्याला हा प्रकार सांगण्यात आला. 7 फेब्रुवारीला आशा गवळी हिचा चुलत भाचा मोबीन मुजावर याने धमकी दिली. “आम्ही मम्मी-डॅडीची माणसे आहोत. तुमची परिस्थिती चांगली आहे. पाच लाख रूपये द्या अन्यथा गंभीर परिणाम होतील.’
गवळी गॅंगच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी हा व्यापारी निघाला होता. मात्र भीतीपोटी तो पुन्हा माघारी फिरला. 17 फेब्रुवारीला परत व्यापाऱ्याला फोन आला, “पैसे दगडी चाळीत पाठवून द्या’ असे मोबीन मुजावर त्यांना म्हणाला. त्याप्रमाणे संबंधित व्यापारी, त्याचा मित्र असे दोघेजण दगडी चाळीत जाऊन तेथील गाईच्या गोठ्यात मोबीन मुजावर याला भेटून 50 हजार रूपयांची खंडणी देण्यात आली. पुन्हा खंडणीच्या उर्वरीत पैशाची मागणी करण्यात आली. वडगाव पीर यात्रेच्या दरम्यान 10 ते 12 मार्चला मोबीन मुजावर याने पुन्हा धमकी देऊन पैशांची मागणी केली. एका पतसंस्थेतून एक लाख रूपये काढून व्यापाऱ्याने खंडणी संबंधिताकडे दिली. “राहिलेले साडेतीन लाख रूपये कधी देणार’ अशी दमदाटी करण्यात आली. त्यादरम्यान चंदनगर येथील व्यापारी ड्रायफूट्‌स व्यापारी यांनी खंडणीप्रकरणी गवळी गॅंगच्या 6 जणांविरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यामुळे धीर आल्याने लोणी येथील व्यापाऱ्याने मंचर पोलिसांत गवळी गॅंगच्या विरोधात फिर्याद दिली.
मंचर पोलिसांनी मोबीन मुजावर, सूरज यादव, ओमकार पंचरास, अमीर मुजावर, गोरक्ष पोखरकर, इजाज व त्याचे 4 ते 5 साथीदार यांच्या विरोधात दुकानाची मोडतोड व मारहाण करणे, फोनवरून धमकी देणे, खंडणी मागणे हे गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील मोबीन मुजावर, सूरज यादव, ओमकार पंचरास यांना मंचर पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना बुधवार (दि. 25) एप्रिलपर्यंतची पोलीस कोठडी घोडेगाव न्यायालयाने दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)